
Piles-Fissure-Fistula या आजारांमध्ये अनेक वेळा डॉक्टर आहारातून बटाटा वर्ज्य करण्यास सांगतात. मात्र, बटाट्याची भाजी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ हा आपल्या दररोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्या आहारात त्याचा समावेश असतोच असतो. मग अशावेळी बटाट्याला वर्ज्य करणे फार अवघड होऊन बसते. इथे बटाट्याला काही पर्याय दिले आहेत. या पर्यायांचा आहारात तुम्ही सहजपणे समावेश करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या आणि हटके पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
कच्च्या केळींची भाजी
कच्ची केळी हा बटाट्याला सर्वोत्तम पर्याय आहेत. कारण केळी हे बारमाही उपलब्ध असणारे फळ आहे. कच्ची केळी बाजारात सहजपणे उपलब्ध होतात. तसेच ते तुमच्या खिशाला परवडणारे असतात. या कच्च्या केळींची अगदी बटाट्या प्रमाणेच भाजी करता येते. तसेच मसाले भात किंवा अन्य पदार्थांमध्ये देखील त्याचा सहज उपयोग करता येतो. याशिवाय बटाट्या प्रमाणेच कच्च्या केळींची अनेक प्रकारे भाजी बनवता येते. कच्ची केळी कट करून त्याची रस्सा भाजी, सुकी भाजी करता येते. तसेच बटाट्याप्रमाणेच तुम्ही केळीचा पराठा देखील बनवू शकता. सोशल मीडियावर तुम्हाला कच्च्या केळींपासून बनवता येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि पदार्थांच्या रेसिपी सहज उपलब्ध आहेत. हे बनवायला देखील अगदी सोपे आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी डॉक्टरांनी जर बटाट्याला आहारातून वर्ज्य करायला सांगितले असेल तर कच्च्या केळीपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
सुरण
सुरण ही कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. तसेच ही भाजी फक्त बटाट्याला उत्तम पर्यायच नाही तर Piles-Fissure-Fistula या आजारांमध्ये ही भाजी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम देखील मिळतो. सुरणाच्या भाजीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. या भाजीमुळे पाचनक्रिया सुरळीत होते. पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत करते. याशिवाय यात अँटीऑक्सीडेंट आणि बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. सुरण देखील भाजी मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध असतात. त्यामुळे सुरणाच्या भाजीचा दैनंदिन आहारात समावेश केल्यास तुम्हाला बटाटा वर्ज्य करणे फारसे जड जाणार नाही.