
गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे
दिल्लीच्या बालगृहात शिक्षण घेत, नंतर स्व:बळावर लंडनमध्ये शिष्यवृत्ती मिळवत, पुन्हा आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ घट्ट रोवत पालकांचे छत्र हरपलेल्यांच्या स्वप्नांना बळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी भारतकन्या म्हणजे पूजा उदयन. पूजा आजची पहिली दुर्गा आहे. ही केवळ तिच्या एकटीच्या यशाची कहाणी नाही, तर हजारो मुलांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या संस्थेची यशोगाथा आहे.
मराठी हिंदू आई आणि मुस्लिम वडील यांच्या पोटी जन्मलेल्या पूजा हिचा जन्म दिल्लीतील मयुर विहारमधला. ती अवघी सहा वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. पूजाला एक मोठी बहीण आणि भाऊ होता. काही काळ आत्याने तिन्ही भावंडांना सांभाळले, परंतु आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्याने आत्याने त्यांना ग्रेटर कैलाश येथील ‘उदयन केअर’ या संस्थेत दाखल केले. तिथून पूजाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली.
उदयन केअर बालगृहाचा आधार घेत पूजाने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ‘बॅचलर इन सोशल वर्क’ या पदवीमुळे तिला काही सामाजिक संस्थामध्ये काम करायची संधी मिळाली. पूजा 'उदयन' असे नाव घेऊनच ती आर्थिक प्रगतीच्या वाटेवर आपली दमदार वाटचाल करू लागली. पूजाने सहा वर्षे एका संस्थेच्या ‘सीएसआर’ विभागात काम केले. या काळात मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांसोबत ती जोडली गेली. या अनुभवातून तिला समाजसेवेच्या क्षेत्रात खोलवर काम करण्याची प्रेरणा मिळाली.
एकीकडे तुटपुंज्या पगाराची नोकरी दुसरीकडे पुढच्या शिक्षणाची तयारी करीत असताना पूजाने ब्रिटनच्या प्रतिष्ठित आणि अवघड समजल्या जाणाऱ्या 'चेवनिंग स्कॉलरशिप'साठी अर्ज केला. या शिष्यवृत्तीकरिता १६९ देशांमधून ६९,००० लोकांनी अर्ज केला होता. त्यापैकी फक्त १६ जणांची निवड झाली. त्यात पूजा होती. या शिष्यवृत्तीच्या मदतीने २०२१ मध्ये पूजाने एसओएस युनिव्हर्सिटी, लंडन येथून ‘MSc Development Studies’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ती म्हणते, ‘लंडनमध्ये शिकताना मला समाजसेवा आणि विकासक्षेत्राची सखोल समज मिळाली. जगभरातील अनाथ मुले कोणत्या अडचणींना सामोरे जातात हे पाहिले आणि ठरवले या मुलांसाठीच आपल्याला ठोस असे काहीतरी करायचे आहे.'
ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छत्र नाही अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम ती (सीएलएएन) या संस्थेच्या माध्यमातून करत आहे. मुलांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही, तर मुलांना आत्मनिर्भर बनवून समाजात सक्षम ओळख निर्माण करून देण्यावर तिचा भर आहे. विशेषतः १५ ते १८ वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करून पूजा त्यांना जीवनकौशल्य आणि रोजगारासाठी प्रशिक्षण देत आहे. तसेच दिल्लीतील महिला व बालकल्याण विभागातही तिच्या संस्थेच्यावतीने या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमके काय करता येईल, यावर तिचे निवेदन, सल्ला देणे, अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणे चालू आहे. पूजा म्हणते, 'या कार्याचे स्वरुप व्यापक करून देशातील सर्व बालगृहातील मुलांनी एकत्र यावे, संघटित व्हावे यासाठीही आमचे प्रयत्न चालू आहेत.'
‘सीएलएएन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना
खरंतर पूजा लंडनमध्येच स्थायिक होऊ शकली असती. मोठ्या पगाराची तिला नोकरीही मिळाली असती. पण तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन तिने अनाथ मुलांसाठी 'केअर लिव्हर्स ॲडव्होकसी नेटवर्क' (सीएलएएन) नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. पूजा अवघी ३० वर्षांची आहे, पण तिला अनुभवातून मिळालेली समज प्रगल्भ आहे.