
आपल्या भारतीय संस्कृतीत निरोगी जीवन जगण्याला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. भारतीय परंपरा सांगते की जीवन असे जगा की डॉक्टर किंवा वैद्याकडे जाण्याची गरजच पडणार नाही. त्यासाठी अनेक चांगल्या आरोग्य सवयींचे नियम आयुर्वेद, योगशास्त्र इत्यादी ग्रंथांत सांगण्यात आले आहे. याशिवाय जुणे जाणते लोकही आपल्या अनुभवातून आपल्याला कायम असे सल्ले देत असतात की जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील. आपल्याकडे जेवणानंतर शतपावली करण्याची पद्धत आहे. यामुळे आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. जाणून घेऊ या शतपावली म्हणजे काय? का करावी शतपावली?
शतपावली म्हणजे काय?
शतपावली म्हणजे जेवणानंतर १०० पावलं चालणे.
शतपावली का करावी?
जेवणानंतर लगेचच बसल्याने किंवा झोपल्याने शरीराला अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे जेवणानंतर शतपावली करणे उत्तम असते. त्याचे आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.
शतपावली करण्याचे फायदे
पचन सुधारते
जेवणानंतर पचनक्रिया लगेचच सुरू झालेली असते. शरीरातील अन्न व्यवस्थित पचण्यासाठी शतपावली केल्यामुळे मदत मिळते. शतपावली करताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे पचन सुधारते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
शतपावली केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
वजन नियंत्रणात
जेवणानंतर शरीराची हालचाल झाल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. परिणामी चरबी वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
हृदय निरोगी राहते
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणे हा अत्यंत फायदेशीर व्यायाम आहे. जेवणानंतर १०० पावले चालल्याने हृदयाच्या कार्याची गती सुधारते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
झोप चांगली येते
अनेकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते. अशा लोकांनी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी. पचन प्रक्रिया सुधारल्याने शरीर जड पडत नाही आणि झोप चांगली लागते.
मूड फ्रेश होतो
माणसाचे विचारचक्र कायम सुरू असते. त्याच प्रमाणे ते जेवताना ही सुरू असते. त्यामुळे जेवण केल्यानंतर शतपावली केल्यामुळे विचारांची गती कमी होते. परिणामी मूड फ्रेश होतो आणि फ्रेश वाटते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)