

'लग्न' हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या खास दिवशी प्रत्येक नवरीला सर्वात सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी अनेक मुली बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु, खरे सौंदर्य आणि चमक आतून येत असते. म्हणूनच, लग्नापूर्वी तुमची त्वचा आणि शरीर आतून निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसायचे असेल तर या नैसर्गिक पेयांचा दररोजच्या आहारात नक्की समावेश करा.
हळदीचे दूध
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेन्टरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेची जळजळ आणि डाग कमी करण्यास मदत करतात. हळदीचे दूध प्यायल्याने केवळ त्वचा स्वच्छ होत नाही तर शरीर निरोगी राहते.
कोमट लिंबू पाणी
दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करणे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि थोडे मध मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. लिंबूमधील व्हिटॅमिन सी त्वचेला उजळवते आणि मुरुमे कमी करण्यास मदत करते. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
बीट आणि गाजराचा रस
बीट आणि गाजराचा रस हा नवरीसाठी सर्वोत्तम पेय मानला जातो. बीट रक्त शुद्ध करते आणि गाजरातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर नैसर्गिक गुलाबी चमक आणतात. दररोज या रसाचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
नारळ पाणी
नारळ पाणी हे एक नॅचरल हायड्रेटर आहे. हे शरीराची पाण्याची कमतरता दूर करुन त्वचेला आतून मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. लग्नापूर्वी दररोज नारळ पाणी प्यायल्याने तुमची त्वचा फ्रेश आणि हेल्दी दिसण्यास मदत होते.
आवळा रस
आवळा हा 'व्हिटॅमिन सी' चा एक सर्वोत्तम स्रोत आहे. आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचेतील कोलेजन वाढते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. लग्नाच्या किमान ३०-४५ दिवस आधी या पेयाचा तुमच्या दररोजच्या आहारात समावेश करा. यामुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होईल.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)