
शालेय वयात असताना मुलं कायम खेळत असतात. त्यांची शारीरिक हालचाल जास्त असते. धावणे, पळणे, उड्या मारणे, उंचावर चढणे अशा क्रिया जास्त घडत असतात. त्यामुळे मुलांचा आहार सकस असायला हवा. मात्र, अनेक मुलांना लवकर थकणे, अशक्तपणा जाणवतो. त्यांच्या आहारात प्रोटीन्सची कमतरता, असू शकते. लहान मुलांच्या आहारात प्रोटीनची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचा समावेश करा. जाणून घ्या, लहान मुलांसाठी प्रोटीनयुक्त आहार कोणता...
'या' पदार्थांमधून मिळते प्रोटीन
दूध आणि दुधाचे पदार्थांमध्ये प्रोटीन भरपूर मात्रेत असते. याशिवाय सोयाबीन तसेच कडधान्य यामधूनही मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते.
मुलांचा आहार कसा असावा?
सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्याचे प्रमाण जास्त असायला हवे. तसेच वरण-भात, दाल खिचडी, मखाना, दही-पोहे, असा आहारही देऊ शकतात. सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. सकाळच्या नाश्त्यात मुलांच्या आहारात उसळींचं प्रमाण जास्त असणे चांगले असते.
दुपारचे जेवण
लहान मुलांच्या दुपारच्या जेवणात सर्व प्रकारचे पदार्थ असावेत. यामध्ये कच्चे सॅलड असावे. सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीटरूट इत्यादी फळभाज्या असाव्या. चपाती, हिरव्या भाज्या यांच्यासह कोशिंबीर देखील असावी. यामुळे मुलांना परिपूर्ण आहार मिळतो.
संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स
संध्याकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये गोड पदार्थ जसे की गूळ-शेंगदाणे, खोबरं, राजगिऱ्याचे लाडू, तिळाचे लाडू, असा आहार असावा. याशिवाय फळांचा देखील समावेश असावा.
रात्रीच्या जेवणानंतर दूध
रात्रीचे जेवण थोडे हलके असू द्यावे. मात्र, जेवणानंतर मुलांना दूध अवश्य द्यावे. दुधामुळे शक्ती मिळते. बल वाढते. मुलांना झोप चांगली लागते. मुलांच्या वाढीसाठी दूध अत्यंत आवश्यक असते. शक्य असल्यास लहान मुलांना दुधात सुका मेवा जसे की बदाम, चारोळी, विलायची, सुके खोबरे, पिस्ता इत्यादी घालून हे दूध प्यायला द्यावे. यामुळे मुलांची केवळ शारीरिक वाढ चांगली होत नाही तर बौद्धिक विकासही होतो.