सार्वजनिक मोबाईल चार्जिंग सेंटर करू शकतात घात; ‘ज्यूस जॅकिंग’चा हल्ला, मोबाईलवर मारेल डल्ला

प्रवासाची योजना आखत असाल तर मोबाईल फोन आणि इतर पोर्टेबल डिव्हाईसची बॅटरी संपली की रिचार्ज कसे करायचे, हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. मग तुम्ही विमानतळ किंवा हॉटेलच्या लॉबीत मिळणाऱ्या मोफत ‘यूएसबी पोर्ट चार्जिंग स्टेशन’वर तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करत असाल तर यापुढे ‘ज्यूस जॅकिंग’पासून सावधान.
सार्वजनिक मोबाईल चार्जिंग सेंटर करू शकतात घात; ‘ज्यूस जॅकिंग’चा हल्ला, मोबाईलवर मारेल डल्ला
Published on

मुंबई : प्रवासाची योजना आखत असाल तर मोबाईल फोन आणि इतर पोर्टेबल डिव्हाईसची बॅटरी संपली की रिचार्ज कसे करायचे, हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. मग तुम्ही विमानतळ किंवा हॉटेलच्या लॉबीत मिळणाऱ्या मोफत ‘यूएसबी पोर्ट चार्जिंग स्टेशन’वर तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करत असाल तर यापुढे ‘ज्यूस जॅकिंग’पासून सावधान. तुम्ही कधीही ‘ज्यूस जॅकिंग’चे बळी ठरू शकता.

परदेश प्रवासाहून येणाऱ्या विक्रांत शेट्टी यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने त्यांनी घाईघाईत बँकॉक विमानतळावरील सार्वजिक चार्जिंग स्टेशनवर आपला मोबाईल चार्ज केला आणि ते आरामात मुंबईत पोहोचले. घरी जाईपर्यंत त्यांचा ईमेल हॅक करून स्कॅमरने त्याचा पासवर्ड बदलला आणि अनेकांना आपण अडचणीत असून एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करा, असा ईमेल त्यांच्या ॲड्रेसमधील त्यांच्या अनेक परिचितांना पाठवला. शेट्टी परदेश प्रवासात असल्याचे ठाऊक असलेल्या अनेकांनी तत्काळ त्या खात्यात रक्कम पाठवली. मुंबईत आल्यावर शेट्टी यांचे त्या निकटवर्तीयांशी बोलणे झाले तेव्हाच सारा प्रकार त्यांना समजला.

‘ज्यूस जॅकिंग’ हा सार्वजनिक ‘यूएसबी चार्जिंग स्टेशन’शी संबंधित सायबर सुरक्षा धोका आहे. हॅकर्स डेटा चार्ज आणि ट्रान्स्फर करणाऱ्या यूएसबी पोर्टचा गैरफायदा घेऊ शकतात. ते अशा चार्जिंग स्टेशनवर ‘मालवेअर’ लोड करू शकतात. जेणेकरून ते चार्ज होत असताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये प्रवेश करू शकतात. हे ‘मालवेअर’ तुमचे डिव्हाईस लॉक करू शकतात अथवा वैयक्तिक डेटा आणि पासवर्ड थेट सायबर गुन्हेगाराकडे पाठवू शकतात. गुन्हेगार नंतर त्या माहितीचा वापर ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा इतर स्कॅमरना विकण्यासाठी करू शकतात. ‘ज्यूस जॅकिंग’पासून सावध राहण्यासाठी ‘एसी पॉवर आऊटलेट’ वापरल्याने तुम्हाला कोणतेही संभाव्य धोके टाळता येतात. म्हणून प्रवास करताना कायम स्वतःचे एसी, कार चार्जर आणि यूएसबी केबल्स सोबत बाळगा. विश्वसनीय पुरवठादाराकडून डेटा पाठवण्यापासून किंवा प्राप्त करण्यापासून रोखणारी, फक्त चार्जिंगसाठीची केबल वापरा. जर तुम्ही तुमचे डिव्हाईस यूएसबी पोर्टमध्ये प्लग केले आणि तुम्हाला ‘डेटा शेअर करा’, ‘या संगणकावर विश्वास ठेवा’ अथवा ‘केवळ चार्ज करा’ असे विचारणारा प्रॉम्प्ट दिसला तर नेहमी ‘केवळ चार्ज करा’ या पर्यायाचीच निवड करा.

काय कराल?

  • चार्जर सोबत ठेवा : संभाव्य छेडछाड टाळण्यासाठी तुमचा स्वतःचा चार्जर आणि केबल वापरा.

  • प्रॉम्प्ट पडताळणी करा : ‘या डिव्हाइसवर विश्वास ठेवा’ प्रॉम्प्टपासून सावध रहा आणि फक्त विश्वसनीय स्त्रोतांकडूनच स्वीकारा.

  • एसी आऊटलेट निवडा : शक्य असेल तेव्हा मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल आऊटलेट निवडा.

काय टाळाल?

  • सार्वजनिक पोर्ट टाळा : अज्ञात किंवा सार्वजनिक ‘यूएसबी पोर्ट’ किंवा केबल वापरू नका.

  • अनोळखी व्यक्तींपासून सावध : बॅटरी उतरली तरी डिव्हाईस अनोळखी व्यक्तीकडे चार्जिंगसाठी देऊ नका.

logo
marathi.freepressjournal.in