रामायणाची समर्पकता

रामायण या महाकाव्यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अलीकडेच इंडोनेशियातील बाली या राज्यात झालं. मुस्लिम देश अशी ओळख असलेल्या इंडोनेशियातील बाली राज्यात हिंदू संस्कृतीही तितक्याच अगत्याने जपली जात आहे. धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्मसमभावाचं हे अनोखं उदाहरण आहे. हिंदी, इंग्रजी भाषेतील व्याख्यानांचा बालीनी भाषेत अनुवाद करून संपन्न झालेल्या या चर्चासत्रात रामायणाचे विविध पैलू उलगडण्यात आले.
रामायणाची समर्पकता
नवशक्ति -अक्षररंग
Published on

- विशेष

- डॉ. निर्मोही फडके

रामायण या महाकाव्यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अलीकडेच इंडोनेशियातील बाली या राज्यात झालं. मुस्लिम देश अशी ओळख असलेल्या इंडोनेशियातील बाली राज्यात हिंदू संस्कृतीही तितक्याच अगत्याने जपली जात आहे. धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्मसमभावाचं हे अनोखं उदाहरण आहे. हिंदी, इंग्रजी भाषेतील व्याख्यानांचा बालीनी भाषेत अनुवाद करून संपन्न झालेल्या या चर्चासत्रात रामायणाचे विविध पैलू उलगडण्यात आले.

पाचूच्या रंगाचं एक बेट. निळ्याशार, नितळ समुद्रावर तरंगणारं. एरव्ही अशा रमणीय स्थळी मस्तपैकी फिरायला जाणंच योग्य. पण चक्क एक ‘आंतरराष्ट्रीय चर्चासत्रा’साठी तिथे निमंत्रित केलं गेलं, तेव्हा अर्थातच खूप आनंद झाला. हे बेट होतं ‘बाली’ आणि चर्चासत्राचा विषय होता ‘रामायण’. 

इंडोनेशियातील बालीमधीलआयजीबी सुग्रीव स्टेट हिंदू विश्वविद्यालय तसेच यायासन धर्म स्थापनम् आणि भारतातील मुंबईमधील मणिबेन नानावटी महाविद्यालय यांनी संयुक्तपणे बाली, इंडोनेशिया येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मानवता आणि सामाजिक विज्ञान चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या चर्चासत्रासाठी आम्ही १० भारतीय, एक अमेरिकास्थित भारतीय, काही इतर देशांतून आलेले, तसेच इंडोनेशियातील अभ्यासक निमंत्रित होतो. 

मानवता आणि सामाजिक विज्ञान (ह्युमॅनिटिज अँड सोशल स्टडीज) या विद्यापीठीय विषय-विभागाच्या अंतर्गत आयोजित या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर करण्यासाठी दिलेला विषय वेगळा आणि आव्हानात्मक होता. तो होता, ‘आधुनिक समाजातील गुंतागुंतीसाठी दिशादर्शक ठरणारी रामायणाची समर्पकता’. या मुख्य विषयाच्या अंतर्गत विविध उपविषय दिले होते. त्यामधून अभ्यासकांनी स्वतःचे विषय निवडले. यामध्ये रामायणाचा विविध प्रकारे तौलनिक अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला गेला.

एक अभ्यासक, लेखक, शिक्षक आणि वाचक म्हणूनही मला रामायण-महाभारत हे विषय कायमच औत्सुक्याचे, संशोधनाचे आणि सतत अभ्यासनीय वाटतात. दोन्हीही महाकाव्यंच. दोन्ही ग्रंथांनी जागतिक पातळीवर केवळ साहित्यच नव्हे, तर इतर अनेक ज्ञानशाखांवरही शतकानुशतकं आपला प्रभाव टाकलेला आहे. म्हणूनच रामायणाच्या संदर्भात साहित्य, तत्त्वज्ञान, लोकसंस्कृती, आधुनिक जीवनशैली इत्यादी विविध विषयांवर या चर्चासत्रात मांडणी करायची आहे, हे कळल्यावर आनंद झाला. 

जिथे रामायणासंबंधीचा हा ज्ञानजागर करायचा होता, ते बाली हे इंडोनेशियातील राज्य ‘हिंदू संस्कृती’, ‘रामकथा’ आणि ‘पुराकथां’ या तीन गोष्टींशी आपली नाळ आजही घट्ट जुळवून जगत आहे. या चर्चासत्रासाठी विद्यापीठाने दिलेल्या सर्व उपविषयांमधून इथली सांस्कृतिक, सामाजिक विचारसरणी प्रतिबिंबित झाली होती. ‘रामायण’ हा येथील संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि इथल्या समाजाच्या जगण्यात तो एकसंघपणे झिरपला आहे, हे अधोरेखित करावंसं वाटतं.

मुंबईचे डॉ. रवींद्र कात्यायन यांनी ‘रामलीला की परंपरा’ या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. रामलीलेच्या इतिहासाबद्दल त्यांनी आधी मांडणी केली. त्यानंतर सचल-अचल रामलीला, रंगमंचीय रामलीला, मूक दृश्य आणि छाया-प्रकाशाच्या सहाय्यानं होणारी रामलीला, मुखवट्यांची रामलीला, मैदानावरील रामलीला, कम्बोडियामधली रामलीला इत्यादी विविध प्रकारच्या रामलीलांविषयी त्यांनी रोचक माहिती दिली. 

आसामहून आलेल्या डॉ. पुष्पा सिंग यांनी ‘वर्तमानकाळात रामाची समर्पकता’ या विषयासंबंधी विचार मांडताना राम शब्दाच्या व्युत्पत्तीसह, अर्थासह आणि रामाच्या व्यक्तिविशेषासह आजच्या काळात या गुणविशेषांना अंगी बाणवण्याचं महत्त्व प्रतिपादित केलं. तुलसी रामायणातल्या रचनांच्या सुश्राव्य सादरीकरणाचीही त्यांच्या विवेचनाला सुंदर जोड होती. 

भोपाळहून आलेल्या डॉ. जवाहर कर्नावट यांनी ‘रामायण के माध्यम से भारतीय संस्कृति का वैश्विक प्रसार’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. रामायणाचा मौखिक प्रवास, वाल्मिकी रामायण, जैन रामायण, बौद्ध रामायण याबद्दल थोडक्यात सांगून त्यांनी ‘रामचरितमानस’च्या वैश्विकतेबद्दल मांडणी केली. ती करताना त्यांनी देवनागरी लिपीचं महत्त्व, रामचरितमानसचं सर्वदूर पोहोचणं, पूर्व आशियाई देशांतल्या रामायणाचं महत्त्व, रशियन-पोलिश भाषांमधले रामायणाचे अनुवाद याबद्दलही विचार मांडले.

वसईच्या प्रा. अमृता जोशी यांच्या शोधप्रबंधाचं शीर्षक होतं, ‘रामायणा: अ लिजंड ऑफ प्रिन्स रामा - ॲन ॲनालिसीस ऑफ अ क्रॉस कल्चरल ॲडाॅप्शन, एक्सप्लोरिंग नरेटिव्ह, एस्थेटिक्स ॲन्ड कल्चरल इम्पॅक्ट.’ या विषयाच्या अंतर्गत त्यांनी ‘अ लिजंड ऑफ प्रिन्स रामा’ या इंडो-जपानी ॲनिमेशन फिल्मच्या संदर्भात रामकथेचा नव्या मनोरंजन क्षेत्रावर असणारा परिणाम वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे मांडला. त्यातले दोन मुद्दे चिंतनीय आहेत. एक म्हणजे अशा संवेदनशील असणाऱ्या (किंवा उगीच अतिसंवेदनशील केलेल्या) साहित्यकृतीचं माध्यमांतर करताना सामाजिक आणि राजकीय घटकांकडून निर्मात्यांची, कलाकारांची केली जाणारी अडवणूक. तसंच दुसरा मुद्दा हा की, अशा निर्मितीनंतर ‘हे मूळ साहित्यकृतीचं जसंच्या तसं चित्रण नसून त्यात काल्पनिक स्वातंत्र्य घेतलं आहे’, असं निर्मात्याला जाहीर करायला लागणं. या गोष्टी मूळ साहित्यकृतीच्या सांस्कृतिक स्थानाला, तिच्यावरून बेतलेल्या कलाकृतीच्या सौंदर्यात्मक आकृतिबंधाला, समाजाच्या एकूणच जाणिवांच्या प्रगल्भतेला काहीशा मारक ठरू शकतात, हे आज आपण सतत अनुभवत आहोत. कला किंवा चित्रपट क्षेत्र आणि रामायण यासंदर्भात  ‘माध्यमांतर’ या आजच्या महत्त्वाच्या विषयावरच यावेळी चर्चा झाली.

वसईच्याच प्रा. फिजा यांनी ‘मिथॉज ॲन्ड ॲडाप्शन: रामायणा टु रामाकिअन’ या विषयावरील शोधनिबंधाची मांडणी केली. यामध्ये त्यांनी मूळ भारतीय रामायण ग्रंथाची मुळं पूर्व आशियाई देशांत, विशेषतः थायलंडपर्यंत कशी पसरत गेली याचा आढावा घेतला. थायलंडमधील ‘रामाकिअन’ या ग्रंथाचा ‘वाल्मिकी रामायणा’शी असलेला सहसंबंध काही महत्त्वाच्या घटकांच्या आधारे त्यांनी तौलनिक अभ्यास पद्धतीने मांडला. यातल्या अनेक उदाहरणांपैकी एक उद्धृत आहे, ‘रामाकिअन या ग्रंथातली राम ही व्यक्तिरेखा बुद्धविचारांना प्रसृत करते.’ 

मुंबईच्या प्रा. प्रवरा सोनवणे यांच्या शोधनिबंधाचा विषय होता, ‘तुलसीदासांच्या रामचरितमानसचा आधुनिक काळाशी असलेला सहसंबंध’. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी भक्तिपरंपरेचा भारतीय जनमानसावर असलेला परिणाम आणि वास्तव जीवनातला संघर्ष हा मुख्य घटक इतर अनेक उपघटकांच्या मदतीने अधोरेखित केला. मानसच्या शब्दाशब्दांतून झिरपलेला भक्तिरस आणि प्रतलावर येणारं जीवन-तत्त्वज्ञानाचं नवनीत याबद्दल त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केलं.

मी सादर केलेल्या शोधनिबंधाचा विषय होता, ‘लिटररी ॲनालिसिस ऑफ द रामायणा’. या विषयावरील शोधनिबंधाची मांडणी करताना मी ‘वाल्मिकी रामायण ही एक साहित्यकृती’ या मुख्य विषयाच्या आधारे कथानक, व्यक्तिरेखा, संवाद, वातावरण निर्मिती, निवेदकाचं महत्त्व, रचना शैली, भाषासौंदर्य, प्रभाव या इतर मुद्द्यांबद्दल विवेचन केलं.  

अमेरिकास्थित डॉ. इंद्रजीत शर्मा यांनी ‘रामायणाचा परदेशातील संस्कृतींवर प्रभाव’ या विषयावर शोधनिबंध सादर केला, तर डॉ. बनवारीलाल जाजोडिया यांनी ‘आधुनिक समाजातील गुंतागुंतीच्या विषयांवर रामायण कसे मदत करू शकते’, याबद्दल विवेचन केलं. 

प्रत्येक शोधनिबंधाच्या विवेचनानंतर त्याबद्दल खुली चर्चा केली गेली. प्रश्न विचारले गेले. ज्यामध्ये तिथल्या महाविद्यालयांमधले प्राध्यापक, विद्यार्थी, निमंत्रित अभ्यासक सहभागी झाले होते. माझ्या शोधनिबंधाच्या विवेचनासाठी बालीनी भाषेचा, समाजशास्त्राचा आणि कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. पुटु आंद्रे हे समन्वयक होते. काही मुद्दे मुलांना इंग्लिशमधूनही नीटसे स्पष्ट होणार नाहीत, असं त्यांना जिथे जिथे वाटलं, तिथे तिथे ते त्यांचा अनुवाद बालीनी भाषेत करत होते आणि विद्यार्थ्यांच्या बालीनी भाषेतल्या शंका माझ्यापर्यंत पोहोचवत होते. इंग्लिश नीट समजत नाही, याबद्दल त्यांना कमीपणा वाटत नव्हता, हे मी केलेलं निरीक्षण. 

रामकथा ही तिथल्या मुलांना शालेय पातळीपासूनच माहीत असते, सांगितली जाते. माहितीरूपात काही प्रमाणात अभ्यासक्रमातही असते. तरीही जागतिक पातळीवर महाभारत अधिक लोकप्रिय का? असा प्रश्न तिथल्याच एका प्राध्यापकांनी उपस्थित केला. त्यावर रामायणातली आदर्शवादी जीवनाची संकल्पना आणि महाभारतातली मानवी स्वभावांची करकरीत टोकं दाखवणारी, वास्तववादी जीवनाची संकल्पना याबद्दल आम्ही चर्चा केली. 

आम्हा काही जणांच्या शोधनिबंधांचं लेखन हे हिंदीमध्ये होतं. काहींनी आपला निबंध हिंदीतच सादर केला. त्याचा अनुवाद तिथल्या स्थानिक बालीनी भाषेत लगेचच केला गेला. मी माझ्या शोधनिबंधाचं लेखन हिंदीत केलं होतं, मात्र त्याचं संपूर्ण विवेचन मी इंग्लिशमधून केलं. इथे भाषेविषयीचा एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. आम्हाला ज्या विद्यापीठानं चर्चासत्रासाठी निमंत्रित केलं होतं तिथले विद्यार्थी, प्राध्यापक आणि कुलगुरूही त्यांच्या ‘बालीनी’ या स्थानिक भाषेत बोलत होते. इतकंच नव्हे, तर तिथली त्यांची भाषणंही ‘बालीनी’ भाषेतच झाली. सूत्रसंचालनही ‘बालीनी’ भाषेत होतं, फक्त आमच्यासारख्या बाहेरच्या निमंत्रितांसाठी दुसरा सूत्रसंचालक इंग्लिशमध्ये बोलत होता.

आमच्यासह तिथल्या स्थानिक अभ्यासकांनीही शोधनिबंध सादर केले. त्यातला ‘बालीची पारंपरिक केकक नृत्यशैली आणि रामायण’ हा विषय उत्सुकता वाढवणारा होता. हे नृत्य करताना कोणतंही वाद्य वाजवलं जात नाही. नर्तक तोंडानं वेगवेगळे आवाज काढत पदन्यास करतात आणि रामकथा सादर करतात. दृक‌्श्राव्य माध्यमातून सादर झालेला हा शोधनिबंध जागतिक लोकनृत्याबद्दलच्या माहितीत भर घालणारा होता. त्याबद्दल अधिक शोध घेणार आहेच.

विद्यापीठाच्या ऑडिटोरियममधल्या व्यासपीठावर दोन्ही बाजूला दोन देवीसदृश मूर्ती, ज्या तिथल्या बागेतच उमललेल्या फुलांनी साकारलेल्या होत्या. समोर फुलांची सुंदर सजावट. स्वागतासाठी विद्यार्थिनींचं भरतनाट्यमसदृश नृत्य सादरीकरण. निवेदनात सरस्वतीचा उल्लेख आणि ‘ॐ स्वस्ति अस्तु’ असं म्हणत तिथल्या प्रत्येकाच्या भाषणाचा आरंभ, तर समारोप ‘ॐ स्वस्ति अस्तु’ किंवा ‘ॐ शांति शांति’ या उद्गारांसह.

चर्चासत्राच्या या दोन दिवसांत रामकथेचा निखळ, कलात्मक आणि बौद्धिक आनंद देणाऱ्या बालीवासीयांसाठी मनापासून... ‘ॐ स्वस्ति अस्तु!’

रामायण अभ्यास आणि बाली संस्कृती

इंडोनेशिया या आपल्या देशाचा धर्म, विचारसरणी, भाषा इत्यादी एक आणि त्याच देशाचा एक भाग असूनही आपलं सगळं वेगळं, असं आहे बालीचं स्वरूप. बालीच्या रस्त्यारस्त्यांवर, चौकांमध्ये, घरांच्या अंगणात आपल्याला राम, सीता, लक्ष्मण, हनुमान इत्यादींची शिल्पं, मूर्ती दिसतात. रामकथेतले प्रसंग कलात्मकतेनं मूर्तींच्या रूपात जिवंत झालेले आपण पाहतो. त्यांच्याच जोडीला गौतम बुद्ध आणि हत्ती, सिंह, गाय इत्यादी प्राण्यांची कलात्मक शिल्पंही दिसतात. घराघरांत, अंगणात, प्रवेशद्वारांतून आत गेल्यावर समोर गणपतीची कातळातली किंवा संगमरवरी मूर्ती, त्याच्या पुढ्यात इवलंसं का होईना पाण्याचं तळं, त्यात हमखास एक कासव तरंगताना दिसतंच.

घरांच्या, दुकानांच्या दगडी, लाकडी उंबरठ्यांवर, रस्त्यांमधल्या, लहानमोठ्या चौकातल्या शिल्पांसमोर, मूर्तीसमोर पानांपासून, केळीच्या, बांबूच्या खोडांपासून बनवलेल्या सजावटी आणि केळीच्या पानाच्या तुकड्यांवर ठेवलेला भाताचा घास, हे दृश्यही दिसतं. ही लोकसंस्कृतीनं बहाल केलेली कलात्मकता. पण ती ‘कमर्शिअल’ वाटली नाही. अबोलपणे ती बालीच्या सुंदरतेत भर घालत होती. तिला अवाजवी धार्मिक, सांस्कृतिक महत्त्वही दिलेलं इथे दिसलं नाही. आधुनिक विचारांचे वारे या बेटावरही वाहत असतीलच. पर्यटन किंवा टुरिझम या क्षेत्रामुळे इथे आर्थिक संपन्नता वाढू लागली असेलच. मात्र इथल्या सहज जगण्यात इथल्या ‘रामकथे’चा इतिहास सरलपणे मिसळून गेल्याचं जाणवलं. तिचा विविध ‘धंद्यां’साठी वापर करून त्यातून आर्थिक, राजकीय लाभ करून घेण्याच्या भन्नाट कल्पना इथे राबवल्या जात नसाव्यात.

लेखक, भाषा-संशोधक, व्याख्याता.

nirmohiphadke@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in