कोणताही कार्यक्रम किंवा खास समारंभ असो साडी नेसण्याचा सध्या ट्रेंडच सुरू आहे. मुलींना साडी नेसण्याची हौसच असते. त्यातच परंपरागत चालत आलेल्या साडी नेसण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साड्या नेसल्या जात आहे. साडीच्या लूकमध्येही अनेक बदल झाले आहेत. पण साडीची आवड कधीही कमी झाली नाही. अगदी ऑफिसमध्ये साडी नेसण्यापासून ते शाळा अथवा कॉलेजमध्ये 'सेंडॉफ'पर्यंत साडी नेहमीच महिलांचे सौंदर्य वाढवत असते. साडी हा जितका साधा लूक समजला जातो तितकाच साडीमध्ये तुमचा लुक वेगळा दिसतो आणि सर्वांपेक्षा उठावदार दिसतो. पण सर्वात जास्त त्रास होतो तो साडी नेसण्याचा. बऱ्याच जणींना साडी कशी नेसायची हा प्रश्न नेहमी पडतो. आम्ही तुम्हाला इथे साडी कशी नेसायची आणि नक्की कशी निवडायची याची माहिती देणार आहोत.
आपल्या शरीराचा आकार आधी समजून घ्या
प्रत्येकीच बॉडीशेफ हा वेगवेगळा असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची साडी घेताना आणि नेसताना काही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जी साडी दुसऱ्या स्त्रीला चांगली दिसत असेल तीच साडी तुम्हालाही शोभेल असं नाही. त्यामुळे सर्वात आधी आपल्या शरीराचा आकार कसा आहे ते समजून मगच साडीची खरेदी करा. तुम्ही जर प्लस साईज असाल तर कॉटनच्याऐवजी तुम्ही शिफॉन साडी अथवा इटालियन सिल्क फॅब्रिक साडी नेसू शकता. तुम्ही जर बारीक असाल तर तुम्ही नेटची साडी अथवा बनारसी, कॉटन साडी नक्की वापरू शकता. तुमची आवड कशीही असली तरीही सहसा साडी ही बॉडीशेफनुसार नेसणंच जास्त चांगलं.
रंग
रंगाचा प्रभाव हा तुमच्या व्यक्तिमत्वावर पडतो. जेव्हा तुम्ही साडी खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही सर्वात पहिले फॅब्रिक बघता पण त्याचबरोबर त्याचा रंग कोणता आहे हे देखील आपण पाहतो. साडीच्या रंगाची निवड स्किन टोनप्रमाणे करायला हवी. जर तुमची त्वचा थोडी डार्क असेल तर तुम्ही पेस्टल कलर, सावळ्या रंगासाठी तुम्ही जांभळा, मरून आणि गोऱ्या रंगासाठी हिरवा, वांगी, गडद लाल अथवा निळा असे रंग वापरले तर तुम्हाला नक्की सूट होतील. तुम्ही या रंगाचा वापर करून नक्की पाहा. साडी कोणतीही असो तुम्ही या रंगाची वापरली तर तुमच्या समारंभामध्ये नक्कीच तुम्ही अधिक उठावदार दिसाल.
नवा ट्रेंड फॉलो
पदर काढताना सरळ आणि उल्टा पदर या दोन्ही पद्धती असतात. पण तुम्हाला तुमच्या साडीचा लुक अधिक फॅशनेबल करायचा असेल तर तुम्ही फ्यूजन लुक पण ट्राय करू शकता. सध्या हा लुक ट्रेंडमध्ये आहे. साडी ही टॉप, बेल्ट अथवा शर्टासह तुम्ही नेसू शकता. त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजच वापरायला हवा असं काही नाही. फक्त याचा ताळमेळ नीट बसवता यायला हवा. तुम्ही तुमच्या फॅशनप्रमाणे साडी नेसू शकता.
साडी नेसताना पेटिकोट बेंबीजवळ बांधा
साडी नेसताना जास्तवर पेटिकोट बांधू नका. तसंच पेटिकोट जास्त खालीही बांधू नये. परफेक्ट लुकसाठी तुम्ही पेटिकोट हा बेंबीजवळ बांधा जेणेकरून साडी बेंबीजवळ तुम्ही खोचू शकाल. साडीवर नेसल्यास तुमची उंची कमी दिसू शकते. साडी ही नेहमी बेंबीजवळ अथवा थोडी खालीच नेसायला हवी. तुम्हाला हवं असेल तर पोट तुम्ही साडी नेसताना कव्हर करू शकता. तुम्हाला जर पोट दाखवायला आवडत नसेल तर तुम्ही साडीच्या काठाने पोट झाकू शकता. ती पद्धतदेखील तुम्ही शिकून घेऊ शकता. युट्यूबवर अनेक व्हिडिओ असतात त्यानुसार तुम्ही एकदा त्याचे टेक्निक शिकून घेऊ शकता अथवा घरात ज्यांना साडी नेसवता येत असेल त्यांच्याकडून एकदा हे टेक्निक शिकून घेऊ शकता. त्याशिवाय आम्ही केलेला एक व्हिडिओदेखील आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तो पाहून तुम्ही साडी नेसायला शिकू शकता.
नव्या ट्रेंडमधील साडी कशी नेसावी
साडीच्या निऱ्या कमी काढा
बऱ्याचदा साडी मोठी असते तेव्हा निऱ्या जास्त काढण्यात येतात. पण जास्त निऱ्या काढल्या तर साडीची शोभा निघून जाते. तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण जर तुम्हाला साडीचा परफेक्ट लुक हवा असेल तरत तुम्ही साडीच्या निऱ्या या कमी काढायला हव्यात तसंच लक्षात ठेवा की, निऱ्या बारीक काढा जेणेकरून कंबर आणि पोटजवळ साडी फुललेली दिसून येणार नाही. कारण असं झालं तर साडीमुळे तुम्ही अधिक जाडे दिसू शकता.
पिनअप करा नीट
परफेक्ट लुकसाठी साडी नेसणं जितकं महत्त्वाचं आहे तितकीच साडी पिनअप करणंही महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर साडी नेसल्यानंतर फ्री आणि सोयीस्कर वाटायला हवं असेल तर तुम्ही साडीला व्यवस्थित पिन लावायला हवी. तुम्ही पदराला एक पिन लावा. त्यानंतर तुम्ही निऱ्या काढल्या की साडी पिन लावा आणि पोट लपवण्यासाठी तुम्ही जो काठ काढणार असलात तर ब्लाऊज आणि काठ अशी एक पिन तुम्ही दिसणार नाही अशी तुम्ही लावू शकता.
सैल साडी नेसू नका
काही महिलांना तुम्ही पाहिलं असेल तर त्या साडी सैलसर नेसतात. त्याचा अर्थ असा आहे की ती साडी नीट घट्ट नेसण्यात आलेली नाही. साडी सैल नेसल्यास, ती खराब दिसते. तसाच तुमच्या शरीराचा आकारही खराब दिसतो. साडीचा परफेक्ट लुक हवा असेल तर तुम्ही साडी थोडी कसून बांधावी. कारण तुम्ही दिवसभर नेसणार असाल तर चालण्याफिरण्यात साडी सैल पडते.
ब्लाऊजही महत्त्वाचं
साडीइतकाच ब्लाऊजही महत्त्वाचा आहे. साडीसाठी मॅचिंग आणि स्टायलिश ब्लाऊज हा सध्याचा ट्रेंड आहे. तसंच ब्लाऊजचं फिटिंगही व्यवस्थित असायला हवं. कंबरेपक्षा अधिक उंचीवर ब्लाऊज ठेऊ नका. यामुळे लुक खराब होऊ शकतो. शिवाय आजकाल लांब ब्लाऊज जास्त ट्रेंड्समध्ये आहेत. तुम्ही याचा वापर करून तुमच्या साडीला एक परफेक्ट लुक देऊ शकता.
योग्य पेटिकोट
तुमच्या शरीराचा आकार योग्य दिसावा यासाठी नेहमी साडीच्या आतील पेटिकोट हा फिटिंगचा असायला हवा. यामुळे तुम्हाला स्लिम आणि सेक्सी लुक मिळतो. तुम्हाला साडी नेसायची सवय नसेल तर तुम्ही फ्लेअर्ड पेटिकोट अजिबात घालू नका. पेटिकोटसाठी सहसा लिजी बिजी फॅब्रिक असलेले वापरल्यास, तुम्हाला सोयीचे ठरेल. त्यामुळे चालताना तुमचा पाय अडकणार नाही. त्याशिवाय तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल.