पाहा थायरॉइडची 'कोणती' आहेत लक्षणे
थायरॉइडसंबंधी आजारांचे प्रकार आणि उपाय
हायपो थायरॉइडिसीम : थायरॉइडसंबंधी सर्वसामान्य आजार म्हणजे हायपो थायरॉइडीसीम हा आहे, यामध्ये विभिन्न कारणांमुळे थायरॉइड ग्रंथीची काम करण्याची क्षमता कमी होत जाते. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते ८०-९० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो.
लक्षणे : चेहऱ्यावर सूज येणे, सुस्ती वाटणे, जास्ती झोप येणे, हात-पाय दुखणे, बद्धकोष्ठता, मनाची चलबिचल आणि उदास वाटणे, महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे आणि थोड्या प्रमाणात वजन वाढणे ही साधारण लक्षणे दिसून येतात.
उपचार : या प्रकारच्या हायपोथायरॉइडिसीमची उपचार पद्धती अतिशय सोपी असते. जेवढ्या प्रमाणात शरीरात टी४ संप्रेरकाची कमतरता आहे, तेवढ्या प्रमाणात ते गोळीच्या माध्यमातून दिले जाते आणि नियमितपणे रक्ततपासणी करून त्यांचे प्रमाण योग्य राखले जाते. त्यामुळे हायपो थायरॉइडिसीम हा आजार नसून एक कमतरता आहे. एकदा ती कमतरता गोळीद्वारे भरून काढली की रुग्ण एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू करू शकतो.
हायपरथायरॉइडिसम
हायपो थायरॉइड विपरीत जो आजार असतो, त्यास हायपर थायरॉइडिसम असे संबोधले जाते, ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी गरजेपेक्षा अधिक वेगाने काम करते. परिणामी शरीरातील टी३ आणि टी४ संप्रेरकांचे प्रमाण वाढते आणि टीएसएच कमी होते.
लक्षणे : हात-पाय थरथर कापणे, वजन कमी होणे, वारंवार शौचास होणे, छातीमध्ये धडधड जाणवणे, खूप घाम येणे ही लक्षणे दिसतात. काहींमध्ये डोळे सुजणे, डोळे लाल होणे असे त्रासदेखील होऊ शकतात. या प्रकारच्या थायरॉइड आजाराची व्याप्ती साधारण लोकसंख्येमध्ये एक टक्का आहे.
उपचार : थायरॉइड विपरीत काम करणारी गोळी, रेडिओअॅक्टिव्ह आयोडिन थेरपी अथवा शस्त्रक्रिया अशा उपचारपद्धती अवलंबल्या जातात. याव्यतिरिक्त थायरॉइड ग्रंथीमध्ये गाठी होणे (गॉयटर), थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर, थायरॉइड स्थानभ्रष्ट असणे (एक्टोपिक थायरॉइड) हे आजार असू शकतात. त्यांचे उपचार रुग्ण आणि तपासणी अहवालांपरत्वे वेगवेगळे असू शकतात.
थायरॉइडचे योग्य निदान आवश्यक
हल्ली सगळीकडे थायरॉइड तपासणीचे पेव फुटले आहे. जरा वजन वाढले, थकवा जाणवतो, केस गळतात, मासिक पाळी अनियमित आहे अशी लक्षणे दिसून आली की थायरॉइड तपासण्या केल्या जातात. आणि मग पॅकेजच्या नावाखाली भरमसाट तपासण्या केल्या जातात आणि जरा कुठे टीएसएचचे प्रमाण वर-खाली दिसले की सर्व समस्यांचे खापर थायरॉइडवर फोडले जाते. त्यामुळे थायरॉइडची गोळी सुरू करण्याआधी तुमच्या सध्याच्या व्याधी खरेच थायरॉइडमुळे आहेत का हे तज्ज्ञांकडून तपासून घेणे अनिवार्य आहे.
सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे सध्या अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. यामध्ये थायरॉइड या आजाराचा समावेश आहे. थायरॉइड ही मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. शरीर किती वेगाने ऊर्जा खर्च करते, शरीरात किती प्रोटिन तयार होतात आणि अन्य हार्मोन्सच्या बाबतीत शरीर किती संवेदनशील आहे, या बाबींवर या ग्रंथीचे नियंत्रण असते. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान ट्रायओडोथायरॉनाईन (टी-३) आणि थायरॉक्सिन (टी-४) हे दोन प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स विशिष्ट शारीरिक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. थायरॉइडचे सुप्त थायरॉइड (हायपो थायरॉइडिझम) किंवा जागृत थायरॉइड (हायपर थायरॉडिझम) असे दोन प्रकार असून, ते व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही वयात होऊ शकतात.