नवे स्त्रीसूक्त : वुई आर प्राऊड अँड हॅपी सिंगल

नुकताच जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन होऊन गेला. या काळात देशभर, जगभर महिलांचे विविध कार्यक्रम झाले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराबाबत नेहमीच बोललं जातं. पण महिलांचं जगणं बदलत आहे, काहीजणी पुढे येत नवे स्त्रीसूक्त रचत आहेत, याचीही नोंद घेण्याचा हा काळ आहे.
नवे स्त्रीसूक्त : वुई आर प्राऊड अँड हॅपी सिंगल
Published on

- समाजमनाच्या ललित नोंदी

- लक्ष्मीकांत देशमुख

नुकताच जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन होऊन गेला. या काळात देशभर, जगभर महिलांचे विविध कार्यक्रम झाले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराबाबत नेहमीच बोललं जातं. पण महिलांचं जगणं बदलत आहे, काहीजणी पुढे येत नवे स्त्रीसूक्त रचत आहेत, याचीही नोंद घेण्याचा हा काळ आहे.

लेट अस कॉल आवरसेल्वज् प्राऊडली सिंगल.’

आपण स्वतःला अभिमानाने सिंगल-एकल म्हणवून घेऊ या!

नवी दिलीच्या एका आलिशान कॉन्फरन्स हॉलमध्ये फेसबुकवर सक्रिय असणाऱ्या ‘स्टेटस सिंगल’ या समूहाच्या दोन डझन महिलांचे दिलखुलास हास्यविनोद चालले होते. त्यातील एक होती श्रीमोई पियू कुंडू. ती आपला टोस्ट उंचावत म्हणाली, “आपण आता स्वतःला विधवा, अविवाहित किंवा डिवोर्सी म्हणवून घेणं थांबवूया. हे शब्द बिचारेपणा दर्शविणारे आहेत. आपण बिचाऱ्या एकाकी बायका नाही आहोत. आपण आनंदी, सिंगल-मिंगल बायका आहोत. सो, लेट अस चिअर्स!”

“चिअर्स!” साऱ्या उपस्थित महिला आपले टोस्ट उंचावत एक स्वरात म्हणाल्या आणि वातावरणात एक फसफसतं व प्रसन्न हसू पसरलं.

एका इंग्रजी वेब पोर्टलवरल्या गीता पांडे यांच्या लेखातला हा उतारा आहे. भारतात मुलींना परंपरागत चांगली बायको व उत्तम आई बनविण्यासाठीचे संस्कार घरोघरी केले जातात. त्या भारतात आता किमानपक्षी मेट्रो शहरात स्वेच्छेने एकल-सिंगल राहणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पत्रकार, वकील, आयटी, बँक आदी क्षेत्रात काम करणाऱ्या व करिअरबाबत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या स्त्रियांना आता स्व-विकासाला तिलांजली देत संसारातलं दुय्यमत्व आणि घुसमट नकोशी झाली आहे. तिला तिच्या क्षमतेप्रमाणे करिअर करायचं आहे, उंच भरारी मारायची आहे. त्याआड भारतीय विवाहसंस्था येतेय, तर तिचा अडसर बाजूस सारला पाहिजे, या निष्कर्षांप्रत ही स्त्री आली आहे. बाहेर कितीही मोठ्या पदावर ती असू दे, पण स्त्रीनंच स्वयंपाक केला पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे आणि मुलं वाढवली पाहिजेत, या पुरुषी मानसिकतेतून बाहेर यायला भारतीय पुरुष आजही तयार नाही. याउलट सुशिक्षित व स्वतःचं उत्तम करिअर असणारी स्त्री रोजच्या जगण्यात तशीच संसारात समता मागत आहे. ती पुरुषी वर्चस्व मान्य करायला तयार नाही. म्हणून विवाह न करणे, विवाहात घुसमट व लैंगिक अत्याचार होत असतील तर ते सहन न करता सरळ घटस्फोट घेत स्वतंत्र होणं आणि मनाप्रमाणे जगणं ती स्वीकारू लागली आहे किंवा पती निधनानंतर छान एकटं जगणं जगू लागली आहे. हे आता भारतीय शहरांमधलं बऱ्यापैकी व्यापक चित्र आहे.

शहरी स्त्रीचं स्वावलंबी जगणं व स्वतंत्र विचार यामुळे पवित्र विवाह संस्था धोक्यात आली आहे, अशी ओरड करण्याचा पुरुष वर्गाला काही अधिकार नाही. संसारात व सहजीवनात एक वरचढ (म्हणजे पुरुष) व एक दबलेला (म्हणजे स्त्री) असा सत्ता संघर्ष आजवर भारतीय स्त्रियांनी संस्कारांच्या नावे सहन केला. स्त्री म्हणजे वात्सल्यमूर्ती, स्त्री म्हणजे गृहलक्ष्मी, तिच्या हातात निसर्गत: पाककला आहे, ती स्वयंपाक करताना अन्नपदार्थात आपलं प्रेम व माया मिसळून अन्न अधिक पौष्टिक व रुचकर करते, ती अनंत काळाची माता असते... अशी कितीतरी मिथकं स्त्रीला घराच्या चार भिंतीच्या आत ठेवण्यासाठी रचली गेली. स्त्रीने बंडखोरी न करता नवऱ्याची सत्ता सहन करावी, आपलं दुय्यमत्व स्वीकारावं, याकरिता या मिथकांची मदत झाली. आता सार्वजनिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्री केवळ पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर अनेक ठिकाणी अग्रेसरही आहे. मग तिने का संसारात समतेची अपेक्षा का क‌रू नये? का तिने ऑफिस करून स्वयंपाक करण्याची व मुलं वाढविण्याची जबाबदारी एकटीनेच पेलावी? पुरुषाने तिला बरोबरीच्या नात्याने घरकामात मदत का करू नये? हा प्रश्न ती आज अधिक मोठ्या स्वरात विचारत आहे आणि असे प्रश्न विचारणाऱ्या महिलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

आजची भारताची सावित्रीची कर्तबगार लेक बदलली आहे. माझ्या देहावर माझी मालकी आहे, असे ती ठामपणे सांगत आहे आणि विवाहांतर्गत होणाऱ्या बलात्काराला नकार देत आहे. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे पण ठोठावतेय, एकल वा सिंगल जगण्याचा मार्ग स्वीकारतेय. याचे प्रमाणही आता बरेच वाढले आहे. पंचवीस ते पंचेचाळीस या वयोगटातील एकल स्त्रियांचे प्रमाण २०११च्या जनगणनेनुसार सुमारे साडेसात कोटी इतके होते, आता ते दहा कोटींच्या वर गेले असण्याची शक्यता जाणकार संख्याशास्त्रज्ञ वर्तवतात.

‘हर जिंदगी’ या वेबपोर्टलवर ‘व्हाय आय ॲम बेटर ऑफ बीईंग अ सिंगल वूमन?’ (मी एकल म्हणून राहणे का चांगले आहे?) या शीर्षकाच्या लेखातील कृती पुरवर या स्त्रीने व्यक्त केलेला अनुभव प्रातिनिधिक आहे. ती म्हणते, “मी अठ्ठावीस वर्षांची एकल स्त्री आहे आणि सुखी आहे. मी आईवडील व भावंडांसोबत राहते. मी विवाहसंस्थेच्या विरुद्ध आहे असे नाही, पण मी एकल राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी जर सक्षम आहे, एकटी असतानाही समाधानी आहे, तर विवाहासाठी अगतिक होऊन कोणतीही तडजोड का करू? पुढेमागे जर मला अनुरूप व समतेने वागणारा मि. परफेक्ट भेटला तर कदाचित विवाहाचा विचार करेनही. पण आज मी ‘सिंगल स्त्री’ म्हणून मजेत जगते आहे. आय डोन्ट रिग्रेट फॉर माय डिसिजन!”

भारतातील तसेच जगातील एकविसाव्या शतकातील स्त्री बदलली आहे का? नाही. तिच्यात स्त्रीत्वाचे सारे गुण आहेत, पण धार्मिक आणि वैवाहिक कर्तव्य म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व मिटवून घ्यायला ती आता तयार नाही. व्यक्तिवाद हा जर आजचा युगधर्म असेल तर केवळ पुरुषानेच त्याचा लाभ का घ्यावा? स्त्रीने का स्वतःवर प्रेम करू नये? का स्वतःच्या शरीराचे व मनाचे लाड करू नयेत? आजही विवाह व घर नामक पुरुषीवर्चस्व कायम असणाऱ्या समाजसंस्थेत तिला स्वत:वर प्रेम करता येत नसेल, तर लग्न करून संसार हा केलाच पाहिजे व मुलांना जन्म देऊन कृतार्थ मातृत्व मिरवलंच पाहिजे, या पुरुषांनी रचलेल्या मिथकातून ती आता बाहेर पडत आहे. म्हणूनच आज एकल स्त्रियांचं प्रमाण वाढत आहे. संसार ही केवळ पुरुषाची सोय आणि प्रिव्हिलेज असेल व स्त्रीसाठी ती केवळ गुलामी असेल, तर आजची सुशिक्षित व स्वावलंबी स्त्री ते मान्य करणार नाही. स्त्रीचं नाही तर आपलंच चुकत आहे, याची जाणीव पुरुषांना केव्हा होणार? हाच खरा प्रश्न आहे.

अलीकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘Mrs’ (मिसेस) या चित्रपटात स्त्रीची घर व पुरुषप्रधान व्यवस्थेने लादलेले पत्नीपणाचे ओझे वाहताना कशी परवड होते हे फार प्रभावीपणे दाखवले आहे, तर ‘क्वीन’ या सिनेमात लग्न मोडलेली एक आधुनिक मुलगी रडत न बसता आधी ठरल्याप्रमाणे हनिमूनला एकटीच जाते व ती ट्रिप मस्त एन्जॉय करते, कोणताही न्यूनगंड न बाळगता. एकदाच मिळणारं आयुष्य नीट मजेने जगलं पाहिजे, हा संदेश हा सिनेमा देतो. हा विचार पुरोगामी व स्त्रीवादी नाही, असं कोण म्हणेल? प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, स्वतःची स्पेस मिळालीच पाहिजे आणि स्वतःवर बेहद्द प्रेम करीत गिल्ट न बाळगता एकटेपणा एन्जॉय करता आला पाहिजे. आजवर पुरुषांनी हा असा एकटेपणा उपभोगला. तो आता काही प्रमाणात स्त्री उपभोगत आहेत, हे चांगले आहे. त्यामुळे पुरुष बदलाच्या व समतेच्या प्रक्रियेला पुढील काळात वेग येईल.

अर्थात कधी कधी स्वप्रेम हे टोकाला जाऊ शकते आणि मग ‘सोलोगामी’सारखे समाज मान्यतेला धक्का देणारे प्रकार घडतात. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ ला एक विचित्र वाटणारी बातमी आली. वडोदराच्या क्षमा बिंदू या तरुणीने चक्क विधिवत स्वतःशीच विवाह केला होता. अगदी हळद, मेहंदी आणि हो, हनिमूनसहित सांग्रसंगीत स्वतःशीच विवाह केला, ज्याला इंग्रजीत आता ‘सोलोगामी’ म्हटलं जातं. आपण ‘सोलोगामी’ विवाह का केला, याबाबत बिंदू जे बोलली ते एकविसाव्या शतकाचं नवं ‘स्त्रीसूक्त’ आहे. ती म्हणते, “स्वतःशी विवाह करून मी माझं आयुष्य स्वप्रेमाला, सेल्फ लव्हला समर्पित केलं आहे. सोलोगामी विवाह म्हणजे स्वतःला केलेली कमिटमेन्ट आहे. म्हणजे काय? तर स्वतःच्या इच्छेने सुंदर जगणे व विकसित होणे होय. हा माझा स्वतःला आहे तसं स्वीकारण्याचा मार्ग आहे. या विवाहाने मी माझ्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक असे जे घटक आजवर मला नकोसे वाटत होते ते सारे मी या लग्नाने जसे आहेत तसे स्वीकारले आहेत. म्हणून ‘सोलोगामी’ विवाह माझ्यासाठी स्वतःला आहे तसं आनंदाने व तक्रार न करता स्वीकारण्याचा व त्यावर भरभरून प्रेम करण्याचा मार्ग आहे. मला हेच सांगायचं आहे की, मी स्वतःला आहे तसं स्वीकारलं आहे. हे स्वप्रेम आहे.”

आपण सारे कुणीतरी ठरवलेल्या मापदंडातून बहुतेकवेळा सौंदर्याची व्याख्या ठरवतो. उदा. गोरा रंग, चाफेकळी नाक इत्यादी आणि मग आपल्याला मिळालेल्या देहाला न स्वीकारता कुढत जगतो. क्षमाने सोलोगामी विवाह करत अशा मानसिकतेला चांगलाच धक्का दिला आहे. स्त्री बदलते आहे, आनंदाच्या वाटेवर पाऊल ठेवते आहे. साहिल लुधियानवी जे म्हणतो,

“ये पल उजाला हैं, बाकी अंधेरा हैं,

ये पल गवाना ना, ये पल ही तेरा हैं...”

हे आजच्या स्त्रीने ओळखलं आहे.

ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

logo
marathi.freepressjournal.in