रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे की पिऊ नये? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते आणि काय आहेत फायदे-तोटे?

काहींच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूधाचे सेवन केल्यास कफचा त्रास संभवतो तर काहींच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास आरोग्य सुदृढ होते. चला जाणून घेऊया दूध पिण्याची चांगली वेळ कोणती?
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे की पिऊ नये? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते आणि काय आहेत फायदे-तोटे?
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

आपल्या भारतीय परंपरेत आहार विहाराचे नियम अतिशय काळजीपूर्वक सांगितले आहे. यामध्ये कोणत्या ऋतूत काय खावे इथ पासून ते सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण कसे असावे याविषयी अनेक नियम सांगितले आहेत. आयुर्वेदातही याविषयी विस्तृत वर्णन मिळते. अनेक जण हेल्दी नाश्ता म्हणून सकाळच्या जेवणात दुधाचा समावेश करतात. तर काही जण रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. मात्र, दूध कधी प्यावे याचेही काही नियम आहेत. काहींच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूधाचे सेवन केल्यास कफचा त्रास संभवतो तर काहींच्या मते रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास आरोग्य सुदृढ होते. चला जाणून घेऊया दूध पिण्याची चांगली वेळ कोणती?

दुधात कोणकोणते घटक असतात?

आहारतज्ज्ञांच्या मते दूध हा एक परिपूर्ण आहार आहे. दूध हा कॅल्शिअमचा मोठा स्रोत आहे. सोबतच यामध्ये व्हिटामिन अ आणि व्हिटामिन बी१२ हे देखील असते. तसेच पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी क्षार देखील यात असतात. शरीराला पोषण देणारी अनेक तत्वे दुधात असतात. सोबतच दुधातील अमिनो अॅसिड हा खूप महत्त्वाचा घटकही असतो.

रात्री दूध पिणे फायदेशीर

आयुर्वेद तसेच भारतीय परंपरेत दूध रात्री झोपण्यापूर्वी पिणे हे उत्तम मानले आहे. याची अनेक कारणे देण्यात आली आहेत. दुधातील अमिनो अॅसिड अर्थात ट्रीप्टोफॅन हे महत्त्वाचे घटक आहे. यामुळे शरीरात मेलाटोनीन हे शांत झोप येण्यासाठी उत्तम असलेल्या हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया होते. तर सेरेटोनिन हार्मोन ज्यामुळे मन शांत होते हे देखील तयार होण्यास मदत मिळते. परिणामी व्यक्तिला शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे रात्री दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे.

ओजस निर्मिती होते

रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे सेवन केल्यानंतर शरीरातील ओजस वाढते. या ओजसमुळे आनंद, समाधानाच्या भावना वाढतात. शरीराला ताकद मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कफचा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याने कफ तयार होण्याची समस्या असते. त्यामुळे ते रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे टाळतात. त्याऐवजी दुधात हळद टाकून दूध प्यावे. हळदी ही उष्ण आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. तसेच ते कफ, सर्दी, खोकल्यासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे रात्री हळद टाकून दूध प्यावे जेणेकरून तुम्हाला कफचा त्रास होणार नाही.

दूध कसे आणि कधी प्यावे?

दूध शक्यतो चांगले उकळून नंतर कोमट झाल्यावर प्यावे. फार थंड दूधही पिऊ नये. तर जेवणानंतर किमान एक तासाने दूध प्यावे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये, असे आयुर्वेद सांगते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in