झोप आरोग्यासाठी महत्त्वाची पण...जाणून घ्या खूप जास्त झोपण्याचे तोटे

हल्ली झोपण्याच्या सवयी फारच बिघडत चालल्या आहेत. काही जण शरीराला किमान ५ तास झोप पुरेशी आहे, असे म्हणत कमी झोप घेतात. तर काहींना ८ तास झोपही पुरेशी होत नाही. काही जण खूप जास्त झोपतात. त्यांना ८ ते १० तास झोपण्याची सवय असते. जाणून घ्या यामागील कारणे आणि तोटे...
झोप आरोग्यासाठी महत्त्वाची पण...जाणून घ्या खूप जास्त झोपण्याचे तोटे
Freepik
Published on

झोप ही शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. २४ तासापैकी ८ तास झोपण्यासाठी असावे, असे आदर्श जीवनशैली मानते. मात्र, हल्ली झोपण्याच्या सवयी फारच बिघडत चालल्या आहेत. काही जण शरीराला किमान ५ तास झोप पुरेशी आहे, असे म्हणत कमी झोप घेतात. तर काहींना ८ तास झोपही पुरेशी होत नाही. काही जण खूप जास्त झोपतात. त्यांना ८ ते १० तास झोपण्याची सवय असते. जाणून घ्या यामागील कारणे आणि तोटे...

आदर्श झोप कशी असावी?

सामान्यपणे रात्री लवकर झोपावे आणि पहाटे लवकर उठावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. यामुळे आरोग्य उत्तम राहते. कार्यक्षमता वाढते. तुमच्या शरीराला किती तास झोप आवश्यक आहे हे तुम्ही किती श्रम करता यावर अवलंबून असते. मात्र, सर्वसामान्यपणे किमान ६ तास ते जास्तीत जास्त ८ तास झोप घेणे चांगले असते. मात्र, तुम्ही यापेक्षा कमी झोपत असाल किंवा यापेक्षा जास्त झोप तुम्हाला येत असेल तर मात्र याचे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. जाणून घ्या खूप जास्त वेळ झोपण्याचे तोटे.

खूप जास्त झोपण्याचे तोटे

डोके जड पडणे

खूप जास्त झोप घेणाऱ्या व्यक्तीचे झोपेतून उठल्यानंतर डोके जड पडते. तसेच डोके दुखण्याचीसुद्धा शक्यता असते.

वजन वाढणे

खूप जास्त झोपण्याचा सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे वजन वाढते. तुमचे वजन योग्य आहार घेऊन, व्यायाम करूनही कमी होत नसेल तर तुम्ही किती तास झोपता यावर लक्ष द्यायला हवे. अतिरिक्त झोपेमुळे वजन वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

अॅक्टिव्हनेस कमी होतो

खूप जास्त झोपणारी व्यक्ती फार जास्त अॅक्टिव्ह नसते. अशा व्यक्ती त्यांचे दैनंदिन कामकाज खूप हळूहळू करते.

पचनक्रिया मंदावणे

अतिरिक्त झोपेमुळे पचनक्रिया मंदावते. परिणामी झोपेतून उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न होण्याच्या तक्रारी उद्भवतात. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

भविष्यात मधुमेह होऊ शकतो

जास्त झोप घेणाऱ्या व्यक्तींना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते.

जास्त झोप येण्याची कारणे

जास्त झोप येण्यामागे कामाचा अतिरिक्त तणाव, दिवसा अतिविचार करणे, मनातून दुःखी किंवा उदास असणे याशिवाय जीवनसत्त्वाची कमतरता विशेष करून ड जीवनसत्त्वाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत.

काय करावे उपाय?

जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अतिरिक्त थकवा जाणवू शकतो. यासाठी शरीरात जीवनसत्त्व क आणि ड योग्य प्रमाणात असायला हवे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून योग्य आहार घ्यावा. ज्यामुळे शारीरिक थकवा कमी होतो. त्यामुळे झोपेचे तास कमी होवून गुणवत्ता वाढते. तसेच तणाव आणि अतिविचारातून मुक्त होण्यासाठी प्राणायाम करावा. यामुळे विचारांची गती कमी होते. कायम आनंदी राहावे. त्यासाठी तुमचे आवडीचे छंद जोपासावे. आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत संवाद साधावा. यामुळे माणसाचे मन आनंदी राहते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in