
- शब्दरंग
- सोनाली कुलकर्णी
पुस्तकं, पुस्तकांचं वाचन आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देत असतं. म्हणूनच रील्सच्या जगात रमायचं का वाचन करत समृद्ध व्हायचं? हा प्रश्न उपस्थित करत सजग वाचक असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
‘अलीकडेच माझ्या ‘सो कुल-टेक पार्ट २’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं, तेव्हा मी माझ्या पुस्तकासाठी झालेली गर्दी पाहून थक्क झाले. माझ्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने मी ठिकठिकाणी जातेय, वाचनालयांमधून आमंत्रणं येताहेत आणि या प्रत्येक ठिकाणी मी माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल बोलतेय... कारण मला हे महत्त्वाचं वाटतंय. पुस्तकांबद्दल बोललंच पाहिजे... त्यांच्या विश्वात गेलं पाहिजे...’
जागतिक पुस्तक दिन! खरं तर रोजच पुस्तक दिन असला पाहिजे. किमान वरचेवर तरी असला पाहिजे. नाही का? वाचन ही वैयक्तिक आवड असली तरी पुस्तकं वाचणं ही आपली गरजही आहे. वाचनाचे अनंत फायदे आहेत, तोटा मात्र एकही नाही. वाचनामुळे व्यक्ती सुसंस्कृत, सुजाण, ज्ञानी आणि बहुश्रुत होते. वाचनाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची सांस्कृतिक, वैचारिक जडण-घडण होते. आपला बौद्धिक विकास घडतो. या सगळ्या फायद्यांसोबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला एक नवं विश्व मिळतं. पुस्तकातल्या प्रतिमा, त्या व्यक्तिरेखा कायम आपल्यासोबत राहतात, मनात घर करतात. आपण त्यातून खूप काही शिकत जातो. आज आपल्या बहुतेकांचं आयुष्य खूप धावपळीचं, व्यस्ततेचं, अगदी वेगवान झालं आहे. आपल्याला कुणालाही आपल्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात डोकावून बघायला वेळ नाही. त्यांच्या जीवनात त्यांना काही समस्या, काही प्रश्न तर नाहीत ना? कसं चाललंय समोरच्याचं आयुष्य? हे जाणून घ्यायला अवधी नाही. पण पुस्तकं मात्र आपल्याला साथ देतात. आपण त्यांच्यात रमून जातो, पुस्तकांच्या विश्वातले एक होऊन जातो. पुस्तकं आपले मित्र आहेत. म्हणूनच वाचायला तर हवंच..
मला वाचनाची आवड खूप लहानपणीच लागली. आई-बाबांना वाचनाची आवड होती. माझ्या लहानपणी मी दैनिकं, मासिकं, साप्ताहिकं आणि पुस्तकं तर वाचलीतच, पण मी पोथ्या देखील वाचल्या. मला तेव्हापासूनच वैविध्यपूर्ण वाचनाची आवड होती. मी अनेक वाचनालयांची सदस्य झाले होते आणि त्या सगळ्या वाचनालयांतून मी नानाप्रकारची पुस्तकं आणून वाचत असे. वाचनालयात गेल्यावर मला हवं असलेलं पुस्तक शोधायची माझी धडपड असे. कधी ग्रंथपालांना मला हवं असलेलं पुस्तक काढून ठेवायला सांगत असे. हवं असलेलं पुस्तक मिळालं, की कधी एकदा ते वाचेन असं मला व्हायचं. भगतसिंग वाचनालय, नगर वाचन मंदिर या सगळ्या वाचनालयांची मी सदस्य होते. या सगळ्या वाचनालयांतून मी खूप आवडीने आणि चौफेर वाचन केलं. तेव्हाचा तो काळ आजच्यासारखा धकाधकीचा नव्हता. धावपळ नव्हती. बालपणी आणि पुढे शाळा-कॉलेजमधल्या दिवसांत अगदी कुठेही सायकलने जाता येत असे. प्रवासात वेळ फारसा जात नव्हता. स्पोर्ट्ससाठी खूप वेळ द्यावा असं देखील काही नव्हतं. अभ्यास आणि वाचन याला माझ्या घरात अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यामुळे अगदी झोकून देऊन मी वाचन केलं. तरीही तेव्हा इच्छा असूनही मला ब्रिटिश कौन्सिल वाचनालयाची मेंबरशिप घेता आली नाही, याची रुखरुख वाटत असे. काही गोष्टी राहून जातात. तसंच हेही.
अर्थात, अभिनय क्षेत्रात आल्यापासून वाचन थोडं कमी झालं. सकाळी घरातून निघाले की प्रवासात ईमेल चेक करणं, व्हाट्सॲप मेसेजेसची उत्तरं देणं, ज्यांना फोन करायचे राहिलेत त्यांना फोन करणं, फोन रिसिव्ह करणं अशी कामं चालू असतात. यात बराच वेळ जातो. त्यामुळे या दरम्यान वाचन करणं शक्य नसतं. घरी आल्यावर शक्यतो रात्री झोपण्याआधी मी वाचन करते. हा नियम मात्र अजूनही टिकून आहे. घरी आल्यावर पूर्ण वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा, असं वाटतं. पण ते शक्य होत नाही. कारण स्क्रिप्ट्स वाचायची असतात, पण आवर्जून रात्री झोपण्याआधी आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचायला घेते. निद्रेच्या अधीन होण्याआधी काही पानं वाचते. हल्ली काही वर्षे हाच वाचनाचा परिपाठ बनला आहे. ज्यांचं लेखन मला आवडतं ते लेखक बहुतेक मराठीतले आहेत. माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत शांता शेळके, पु. ल. देशपांडे, हृषिकेष गुप्ते, मुकुंद टाकसाळे, गौरी देशपांडे, आशा बगे ही सगळी मंडळी आहेत.
पुस्तकं नियमित वाचल्याने मनाची एकाग्रता वाढते, हा माझा अनुभव आहे. वाचनाने माझ्या मनाला शांतपणा आला. मन निर्णय घेण्यास सक्षम झालं. एखाद्या शांत डोहाप्रमाणे मन शांतचित्त झालं.
माझे पती नचिकेत यांना देखील वाचनाची आवड आहे. ते देखील रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतात. आमची मुलगी कावेरी ही देखील आमच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे. तिला जे आवडेल ते पुस्तक ती वाचत असते. नव्या पिढीला वाचनाची आवड नाही, असं म्हणतात. पण नवी पिढी किंडलवर वाचते. अर्थात, निर्बुद्धपणे रील्स पाहण्यातही त्यांचा बराच वेळ जातो. पण तरीही नव्या पिढीची वाचनाची आवड कमी होतेय, असं मला वाटत नाही. आमच्यासारखे जे हार्ड कोअर वाचक आहेत, तसे वाचक नव्या पिढीतही दिसतात. वाचन कधीही हद्दपार होणार नाही हे नक्की. कारण वाचन ही जितकी आवड आहे, तितकीच ती गरजही आहे. कारण रील्स बघण्याने कसलाही मानसिक-बौद्धिक विकास होणं शक्य नाही.
माझा पूर्ण विश्वास आहे.. पुस्तकाचं जग, त्यांचं आयुष्य बहरत राहील...ते कधीही कोमेजणार नाही. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, हे निश्चित! रील्सच्या जगात आपण, आपली पुढील पिढी हरवणार नाही, याची काळजी घेत पुस्तकांच्या जगात गेलं पाहिजे. तरच आपलं जग आनंद आणि ज्ञान याने भरून जाईल.
ज्येष्ठ सिने अभिनेत्री
शब्दांकन - पूजा सामंत