आजची दुर्गा : जिल्हाधिकारी होण्याच्या स्वप्नासाठी धडपड; स्वतःला प्रगल्भ करण्याचा ध्यास

लहानपणीच अनाथ झालेल्या सोनाली पवार-साळुंखे यांनी विविध कामे करून आपले शिक्षण पूर्ण केले. आयुष्यात टक्के टोणपे खात तिने स्वत:ला घडवण्याचा ध्यास घेतला आहे. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आता जिल्हाधिकारी होण्याचा ध्यास तिने घेतला आहे.
आजची दुर्गा : जिल्हाधिकारी होण्याच्या स्वप्नासाठी धडपड; स्वतःला प्रगल्भ करण्याचा ध्यास
Published on

आजची दुर्गा : सोनाली पवार-साळुंखे

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे

लहानपणीच अनाथ झालेल्या सोनाली पवार-साळुंखे यांनी विविध कामे करून आपले शिक्षण पूर्ण केले. आयुष्यात टक्के टोणपे खात तिने स्वत:ला घडवण्याचा ध्यास घेतला आहे. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर आता जिल्हाधिकारी होण्याचा ध्यास तिने घेतला आहे.

सोनालीचे वडील वारले. त्यानंतर तिची आईही सहा महिन्यांत वारली. ती ६ वर्षांची असतानाच पोरकी झाली. तिच्यासोबत तिचा लहान भाऊही होता. सोनाली मूळची कर्नाटक निप्पाणी येथील. काही दिवस आजीकडे ही भावंडे राहत होती. वडिलांकडील इतर नातेवाईकांनी या दोघांना सांभाळण्यास नकार दिला. मग हे दोघेही आपल्या मामाच्या गावी पुण्याला आले. काही महिने दोघेही तिथे राहिले. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मामाने दोघांना पुण्याच्या शिवाजीनगर निरीक्षणगृहात पाठवले. काही दिवसांतच सोनालीला निरीक्षणगृहातून सेवा सदनमध्ये दाखल केले. पण तिथूनही आठवीत असताना तिची बदली होऊन अनाथ हिंदू आश्रम या पुण्यातील संस्थेत ती आली. तिथून तिचे खऱ्या अर्थाने शालेय शिक्षण चालू झाले.

सोनाली म्हणते, 'माझे आईवडील वारल्यानंतर आम्हा दोघांचे शिक्षण बंद झाले होते. मी खरंतर कन्नड शाळेत शिकत होते आणि एकदम पुण्यात आल्यावर तेही दोन एक वर्षांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. मला भाषेमुळे खूप अडचणी आल्या. दोनतीनदा मी एकाच इयत्तेत बसायचे. अभ्यासाचा सूर सापडल्यावर मला नेमके १८ व्या वर्षांनंतर संस्था सोडावी लागली. तेव्हा माझी जेमतेम दहावी पूर्ण झाली होती. मामाकडे मी राहायला जाऊ शकत नव्हते. दहावीनंतर त्याच संस्थेच्या वतीने बाहेर ठिकाणी एका हॉस्पिटलच्या केअर सेंटरला काम करून मी सहा महिन्यांचा 'सहाय्यक नर्सिंग'चा कोर्स पूर्ण केला. त्या केअर सेंटरला आम्हाला खूपच राबवून घ्यायचे. वेळेवर जेवण नाही, शिक्षण आणि राहण्याचा-जेवणाचा खर्च ते लोक करताहेत म्हणून मला तेथील केलेल्या कामाचे पैसे मिळायचे नाहीत. उलट जास्त काम, अपमानकारक बोलणी वाट्याला यायची. हा कोर्स पूर्ण होण्यासाठी मी तिथे थांबले. कोर्स पूर्ण झाला, सर्टिफिकेट मिळेपर्यंत मला तिथेच फुकट काम करावे लागायचे. ते केअर सेंटर सोडल्यावर एका स्त्रीरोग तज्ज्ञाच्या हॉस्पिटलमध्ये मला काम मिळाले. जेमतेम पगारात मी माझा राहण्याचा, जेवणाचा आणि सोबतच बारावीची बाहेरून परीक्षा दिली. त्यात मी उत्तम मार्कांनी पास झाले. तेव्हा मला पुढे नर्सिंगचा पुढील कोर्स एएनएम व जीएनएम करायचे होते. पण माझ्या पगारात हा कोर्स करणे शक्य नव्हते. त्यामुळे नाइलाजाने मी सहाय्यक नर्सची कमी पगारातील नोकरी करीत होते. स्वतःला चांगले कुटुंब मिळावे, यासाठी ही माझी धडपड एकीकडे चालू होती. जेणेकरून मला पुढे शिकता येईल. पण तिथेही मला सुरुवातीला अपयश आले. नर्सिंगचे काम करून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी डबा करून द्यायचे. त्याचे बरे पैसे मिळायचे. पण मला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतून एक स्थळ आले. तो मुलगा अनाथ पण नातेवाईकांकडे राहिलेला. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मला शिकवायला तो तयार होता. त्यामुळे मी त्याच्याशी लग्न केले आणि कराडजवळील कालेगाव या खेडेगावात आमचा संसार सुरू झाला. आम्ही नातेवाईकांच्या घरी राहायचो. ते घरही स्वतःचे नव्हते. त्यामुळे आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून मी गावात नोकरी शोधत होते, पण मला अत्यंत कमी पगार मिळायचा. माझे पती एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यात आम्हाला मुलगा झाला. त्यामुळे खर्चही हळूहळू वाढत होते. बरीच वर्षं मी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर काम करायला जायचे. शेतातील सगळी कामंही मी त्यावेळी शिकून घेतली. पण मला पुढे शिकायचे होते. त्यासाठी पैसे लागणार होते.

एके दिवशी सहज पेपर वाचताना अनाथ आरक्षणबाबतीत बातमी वाचली. त्यात सनाथ संस्थेचे नाव वाचले. मीही अनाथ आहे तर मीही शासकीय नोकरी मिळवू शकते, ही आशा पल्लवीत झाली. सनाथ संस्थेच्या मदतीने प्रशासनाशी, संस्थेशी झगडून माझे अनाथ ओळखपत्र मिळविले आणि सरळसेवा सहाय्यक नर्सच्या पहिल्याच परीक्षेत मी पास झाले. मला शासकीय नोकरी मिळाली हे मलाही खरं वाटत नव्हतं. माझ्या मिस्टरांनाही खूप आनंद झाला.

आज सोनाली ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये 'स्त्री परिचर' म्हणून काम करतेय. संसार, शासकीय सेवेतील नोकरीबरोबरच सोनालीने पदवी शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण करतेय. सोनालीला बालगृहातील मुलींच्या मानसशास्त्रावर अभ्यास करायचा आहे आणि तिचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे.

मानसशास्त्र हा विषय घेऊन सोनाली शेवटच्या वर्षात शिकत आहे. पहाटे उठून एमपीएससीचा अभ्यास आणि पदवी शिक्षण असा अभ्यास करून सोनाली कामाच्या शिफ्ट सांभाळून अनेक ठिकाणच्या मानसशास्त्र संबंधींच्या कार्यशाळांना हजेरी लावते. त्या ज्ञानाचा उपयोग मला आपल्या कामातही होतोय आणि मीही हळूहळू प्रगल्भ होतेय. आपण प्रत्येकवेळी स्वतःला विकसित केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आमचाच तहसीलदार झालेला संतोष मांडवे म्हणून दादा आहे तो करतो, असे सोनाली आवर्जून सांगते. सोनालीच्या प्रत्येक कामात, शिक्षणात, संसारात तिला समर्थ साथ देणारा तिचा नवरा कंपनीतील नोकरी सोडून ठाण्यात स्वतंत्रपणे वाहतूक व्यवसाय करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in