

राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने उष्णतेशी संबंधित त्रास आणि आजारांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. विशेषतः डिहायड्रेशन, चक्कर येणे, अशक्तपणा, बेशुद्ध पडणे, डोकेदुखी, अतिशय थकवा आणि उष्माघात (Heat Stroke) यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. काही रुग्णांमध्ये भूक न लागणे, ॲसिडिटी, उलट्या आणि पचनसंस्थेशी संबंधित तक्रारीदेखील वाढताना दिसत आहेत.
सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या अतिरिक्त संचालक डॉ. दिव्या गोपाळ यांच्या मते, वातावरणातील तापमान सतत ३९ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान राहिल्यास आणि त्यासोबत आर्द्रता अधिक असल्यास शरीराची नैसर्गिक थंड ठेवण्याची क्षमता कमी पडू लागते. विशेषतः कमी हवेशीर जागांमध्ये राहणाऱ्या लोकांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. परिणामी, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडणे, निर्जलीकरण, उष्णतेमुळे थकवा आणि गंभीर परिस्थितीत उष्माघातासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
लहान मुलांमध्ये धोका अधिक
लहान मुलं आणि मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे त्यांना उष्णतेचा फटका अधिक बसतो. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये डिहायड्रेशन वेगाने होण्याची शक्यता असते. चिडचिडेपणा, व्यवस्थित अन्न न घेणे, सुस्ती, लघवीचे प्रमाण कमी होणे, उलट्या, खूप घाम येणे किंवा अत्यल्प घाम येणे यांसारखी लक्षणे मुलांमध्ये दिसून येऊ शकतात.
उच्च तापमानामुळे काही मुलांमध्ये तापासोबत झटके (Febrile Seizure), अतिसार आणि उष्णतेमुळे होणारा थकवाही दिसून येतो. दिवसातील सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत बाहेर खेळणे, प्रवास करणे किंवा जास्त शारीरिक हालचाल केल्यास मुलांना स्नायूंमध्ये गोळे येणे (Heat Cramps), चक्कर येणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे आणि निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो.
किशोरवयीन आणि तरुणांनाही वाढता धोका
दीर्घकाळ उष्ण हवामानाचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होताना दिसतो. झोप न लागणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, चिडचिडेपणा, सुस्ती आणि सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे अनेकांमध्ये आढळतात. विशेषतः खेळाडू, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणारे तरुण आणि जास्त शारीरिक मेहनत घेणाऱ्यांनी पुरेसे पाणी न घेतल्यास त्यांना गंभीर त्रास होऊ शकतो.
बाहेर काम करणारे कर्मचारी अधिक असुरक्षित
प्रौढांमध्ये उष्णतेमुळे होणारा ताण (Heat Stress) हा थकवा, डोकेदुखी, स्नायूंमध्ये गोळे येणे, कमी रक्तदाब, मूत्रपिंडांवर ताण, निर्जलीकरण आणि अशक्तपणा यांसारख्या लक्षणांमधून दिसून येतो. वाहतूक कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी, बांधकाम कामगार आणि खेळाडू यांसारखे सतत बाहेर काम करणारे लोक अधिक धोक्यात असतात.
याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडांचे आजार, हृदयरोग किंवा लठ्ठपणा असलेल्या रुग्णांची प्रकृती उष्णतेच्या लाटेदरम्यान अधिक वेगाने खालावू शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
मानसिक आरोग्यावरही परिणाम
उच्च तापमानाचा सतत संपर्क मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. झोपेचा अभाव, मनःस्थिती खराब होणे, कामातील उत्पादकता कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे यांसारख्या समस्या वाढू शकतात.
ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे
उष्णतेच्या लाटेदरम्यान ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक धोक्याच्या गटांपैकी एक मानले जातात. वाढत्या वयानुसार तहान जाणवण्याची क्षमता आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. अनेक ज्येष्ठ नागरिक रक्तदाबावरील औषधे आणि लघवी वाढवणारी औषधे (Diuretics) घेत असल्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो.
तीव्र उष्णतेमुळे हृदयविकार, मूत्रपिंडांचे विकार, श्वसनाचे त्रास, गोंधळ आणि भ्रम (Delirium) वाढू शकतात. काहीवेळा ज्येष्ठांमध्ये उष्माघाताची लक्षणे सूक्ष्म स्वरूपात दिसून येतात. विशेषतः घाम न येणे ही गंभीर लक्षणे असू शकतात, त्यामुळे वेळेत निदान करणे कठीण ठरते.
'या' गोष्टींची घ्या काळजी
तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत शरीरात पुरेसे पाणी राखणे (Hydration) अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय सैल आणि हवेशीर कपडे वापरणे, दिवसातील सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि हलका व पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. पालकांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, कारण या दोन्ही गटांमध्ये आरोग्याशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो.