
खगोलप्रेमींसाठी शनिवार (दि.२९) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, त्याच दिवशी भारतातील खगोलप्रेमींचा मूड ऑफही होणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे शनिवारी (दि.29) असणार आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. त्यामुळे ती खगोलप्रेमींसाठी एक पर्वणी असते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिकदृष्टीकोनातून सूर्यग्रहणाचे वेगळे महत्त्व आणि मान्यता असते. जाणून घ्या सूर्यग्रहणाची योग्य वेळ हे ग्रहण भारतात दिसणार का तसेच अन्य महत्त्वाच्या बाबी...
सूर्यग्रहणाची वेळ
वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे शनिवारी २९ मार्चला होणार असून हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी २.२१ मिनिटांनी लागणार असून ते संध्याकाळी ६.१४ मिनिटांपर्यंत असेल.
भारतात सूर्यग्रहण दिसेल का?
नासाच्या मते, २९ मार्च २०२५ रोजी आंशिक सूर्यग्रहण आहे. ते युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरांच्या भागात दिसणार आहे. तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतातील खगोलप्रेमींचा मूड ऑफ होऊ शकतो. मात्र, ते इंटरनेटवर अधिकृत सोर्सद्वारे याचा आनंद घेऊ शकतात.
आंशिक सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते, परंतु सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत नसतात. सूर्याचा फक्त एक भाग झाकलेला दिसेल.
सूतक पाळावा लागेल का?
ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे नकारात्मक मानले गेले आहे. या काळातील हवा, पाणी आणि एकूणच वातावरण हे नकारात्मक असते. त्यामुळे या काळात काहीही अन्नपदार्थांचे सेवन करू नये अशी मान्यता आहे. याशिवाय या काळात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही. पूजा पाठ वर्ज्य असते. तसेच सूतक पाळले जाते. मात्र, यंदा हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने वरील गोष्टी पाळाव्या की पाळू नये याबाबत अनेकांचा संभ्रम आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते हे सूर्यग्रहण आंशिक असून ते भारतात दिसणार नसल्याने ते पाळणे गरजेचे नाही. मात्र, काहीजणांच्या मते शनि अमावस्येला सूर्यग्रहण असल्याने ते पाळले तर चांगले राहणार आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)