

उन्हाळा सुरू आहे. सर्वांनाच आपल्या त्वचेची काळजी वाटते. कडक उन्हात थोडे जरी फिरण्याची वेळ आली तरी लगेच त्वचेच्या समस्या सुरू होतात. यामध्ये त्वचेचा दाह होणे, त्वचा काळवंडणे इत्यादी. तसेच उष्णतेच्या त्रासामुळे अनेकांचे आरोग्यही बिघडते. काळजी करू नका. मोसंबी हे फळ निसर्गाने दिलेले वरदान आहे. उन्हाळ्यात मोसंबी खाल्ल्याने त्वचा तर चमकदार होतेच शिवाय आरोग्यालाही मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या आहारात कसा करावा समावेश.
मोसंबीचे गुणधर्म
मोसंबी ही थंड गुणाची असून जीवनसत्त्व क चे फार मोठे भांडार आहे. जीवनसत्त्व क ची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जीवनसत्त्व क च्या अभावाने शरीराला थकवा जाणवतो. केस गळतात. डोळ्यांना त्रास होतो. त्वचाही खराब होते. दातांच्या आरोग्यांचाही जवळचा संबंध आहे. त्यामुळे मोसंबी हे फळ आहारात समाविष्ट केल्यास जीवनसत्त्व क ची उणीव भरून निघेल.
दररोज किमान दोन मोसंबी खाणे फायदेशीर
आहारात दररोज किमान दोन मोसंबी खाणे फायदेशीर राहते. मोसंबी सोलून चावून चावून खाल्ल्याने दातांचे आजार दूर होतात. डोळ्यांची दृष्टी सुधारते. दुपारच्या जेवणानंतर किमान तास दीडतासाच्या अंतराने मोसंबीचे सेवन करावे.
मोसंबीचा ज्यूस
मोसंबीचा ज्यूस करून पिणे देखील फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. तुम्ही कडक उन्हात फिरत असाल किंवा उन्हातून फिरून आल्यावर मोसंबीचा ज्यूस प्यायल्याने लगेच थकवा नाहीसा होतो. याशिवाय मोसंबीचा ज्यूस नियमित घेतल्याने त्वचा चमकदार बनते.
हृदयरोगापासून बचाव
मोसंबीतील क जीवनसत्त्व पॅक्टीन आणि अन्य पोषकतत्वांमुळे कोलेस्ट्रॉलची मात्री कमी करण्यासाठी मदत होते. यामुळे हृदय रोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो.
पचनशक्ती सुधारते
मोसंबीत मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचन शक्ती सुधारते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
वजन नियंत्रणात राहते
वजन कमी करण्यासाठी मोसंबी उपयुक्त आहे. कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्याने उत्तम लाभ होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)