
- पाऊलखुणा
- राकेश मोरे
गडकिल्ल्यांवर भटकंती करताना हमखास नजरेस पडणारी मारुतीची मूर्ती हा नेहमीचा आकर्षणाचा विषय. रायगड, माहुली, दातेगड यांसारख्या दुर्गांवरील विविध रूपातील मारुती शिल्पे म्हणजे श्रद्धा आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम. गडकोटांवरील मारुती ही केवळ धार्मिक श्रद्धा नसून ती मराठ्यांच्या शौर्य, रक्षण आणि आत्मविश्वासाची साक्ष आहे. येत्या शनिवारी, १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे, त्यानिमित्ताने या लेखातून गडकिल्ल्यांवरील रक्षणकर्त्या मारुतीरायाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न...
महाराष्ट्राची ओळख म्हणजेच सह्याद्री. याच सह्याद्रीत ताठ मानेने उभे आहेत असंख्य गडकोट. महाराष्ट्रात गिरिदुर्ग, वनदुर्ग उदंड आहेत. या गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत असताना आपणास देवदेवतांची मंदिरे पहावयास मिळतात. या देवांमध्ये दोन देवतांचे प्राबल्य आढळते. त्यातील एक देव आहे गिरिशिखरांचा राजा देवाधिदेव शंभुमहादेव, तर दुसरा देव आहे बजरंगबली अर्थात मारुती.
बल, साहस, भव्यसिंदूरलेपना आणि भीमरूपी असे असणारे मारुती हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवर सर्वाधिक आढळणारे दैवत. महाराष्ट्रात मारुतीरायाची असंख्य मंदिरे आहेत. परंतु दुर्गप्रेमींच्या नजरेतून एखाद्या गडकिल्ल्यांवरील तट-बुरूज, कुठे मुख्य प्रवेशद्वारावर तर काही ठिकाणी उभ्या कातळावर, दरवाजा, टाके अगर झाडाझुडपांच्या छायेत विसावलेली व दुर्गभ्रमंतीत हमखास नजरेस पडणारी मारुतीची मूर्ती नेहमीच आकर्षणाचा विषय ठरत असते. अनेक किल्ल्यांवर जिथे पहारेकरी अथक झटत होते, तिथे त्यांना मानसिक आधार देणारा संकटमोचक म्हणजे गडावरचा मारुतीराया! महाराष्ट्रातल्या हर एक गावात आढळणारा मारुती गडावर, डोंगरकपाऱ्यांमध्ये देखील विविध रूपात विराजमान आहे.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे किल्ले केवळ लढाया जिंकण्यासाठी नसून, मराठ्यांच्या शौर्य, रणनीतीचेही प्रतीक होते. या किल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी मारुतीचे अस्तित्व आढळते. कधी भव्य मूर्तीच्या रूपात, कधी छोट्या मंदिराच्या घुमटीत, तर कधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ कोरलेल्या मूर्तींच्या रूपात. गडावरचे मारुतीराया केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे, तर लढाईच्या काळात मानसिक बळ, प्रेरणा आणि संरक्षणाचं प्रतीकही होते.
गडांवर आपल्याला दोन रूपातील मारुतीराया दिसतो, ‘दासमारुती’ आणि ‘प्रतापमारुती’. हात जोडून उभा असतो तो भक्तरूप दासमारुती, तर दक्षिणाभिमुख, युद्धासाठी सज्ज असलेला म्हणजे प्रतापमारुती. दक्षिण दिशा ही यमाची मानली गेल्याने त्या दिशेने तोंड करून बसलेला मारुती संकटांपासून संरक्षण करतो, अशी धारणा आहे.
मारुती हा मूळचा यक्षकुळीचा देव मानला जातो. गावाचा संरक्षक, भूतांचा स्वामी, रोगांपासून वाचवणारा, जलाच्या आणि वेशीच्या सान्निध्यात राहणारा हा देव गडावरही तितक्याच श्रद्धेने वसवला गेला. गडकोटांवरील मारुती ही केवळ धार्मिक श्रद्धा नसून ती मराठ्यांच्या शौर्य, रक्षण आणि आत्मविश्वासाची पवित्र साक्ष आहे. गडावरील हा मारुतीराया म्हणजे केवळ दगडात कोरलेले शिल्प नाही, तर तो काळरात्री पहारा देणाऱ्या मावळ्यांचा, रक्षणकर्ता आणि संकटमोचक आहे. त्याचं बल, त्याचं तेज, त्याचं रूप, त्याचं सौंदर्य आणि त्याच्यावर असलेली लोकांची श्रद्धा हे सगळं ‘सुंदरा जगदांतरा’ या शीर्षकाला सार्थ ठरवणारं आहे.
रायगड, विसापूर, सुवर्णदुर्ग, तिकोना, त्रिंगलवाडी, सुरगड, वासोटा, हरिहर, महिमानगड अशा काही प्रमुख किल्ल्यांवरची देखणी हनुमान शिल्पे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. याच सर्व किल्ल्यांच्या मांदियाळीत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेले सुंदरगड हे नाव सार्थ ठरवत गडाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दातेगड उर्फ सुंदरगडावरील मारुतीरायाचे शिल्प. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर असलेल्या हनुमान शिल्पांमध्ये आकर्षक आणि अतिशय खास रचनेचं असून, गडकिल्ल्यांवर असलेल्या मारुतीरायाच्या सर्वात सुबक आणि आकर्षक शिल्पांमध्ये त्याचे नाव अग्रस्थानीच घ्यावे लागेल इतके ते देखणे आहे.
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील एका दगडी चौकटीत कोरलेला अतिशय भव्य रचनेचा मारुतीराया दातेगडाची खास ओळख असून, या शिल्पाने या किल्ल्याच्या वैभवात विलक्षण अशी भरच घातली आहे. बजरंगबली या नावाला साजेशी अशीच बलदंड बाहू, भुजा आणि संपूर्ण शरीर काया. अतिशय लयबद्ध आणि तितकाच रुबाबदार असा आवेग. पनवती अथवा राक्षसाला आपल्या पायाशी दडपून शेपटीला दिलेला रुबाबदार असा पिळ आणि तितक्याच आवेशात कमरेवर ठेवलेला डावा हात ही या सुंदरगडावरच्या मारुतीरायाच्या शिल्पाची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. डोईवरील सुवर्ण मुकुट, कानातील कुंडले, गळ्यातील आणि बाहू-भुजांमधील सुवर्ण आभूषणांनी या मूर्तीच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे.
ठाणे जिल्ह्यातील आसनगावाच्या मागे माहुली किल्ला पसरला आहे, लांबरुंद व उंच, बुलंद असलेला आणि असंख्य सरळसोट सुळक्यांनी वेढलेला हा किल्ला. किल्ल्यावर महा दरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा अशा तीन वेगवेगळ्या मार्गे जाता येते. किल्ल्यावर चढाई करताना हनुमान दरवाजाच्या मार्गावर मारुतीरायाचे एक अप्रतिम शिल्प दिसते, मारुतीने राक्षसाला पायाखाली धरून हातामध्ये गदेऐवजी खंजीर धरलेला आढळतो. बाजूला छोटे गणपतीचे शिल्प आहे. हे शिल्प गडावरील देवतेच्या युद्धप्रिय रूपाचे उत्तम उदाहरण आहे.
रायगडावर तर विविध ठिकाणी मारुतीरायाच्या मूर्ती आढळतात. जगदीश्वर मंदिरात, हिरकणी बुरुजावर, हनुमान टाक्यावर व नाना दरवाजात. जगदीश्वर मंदिरातील मूर्ती पूर्वी स्वतंत्र मंदिरात असावी; पेशवे काळात तिच्या पूजेसाठी तेल-शेंदूर वापराचा उल्लेख पेशवे दप्तरातील कागदपत्रात आहे. टाक्याजवळील हनुमंत मूर्ती स्त्रियांचे रक्षण करणारी आहे, तर हिरकणी बुरुजावरची मूर्ती सैनिकांसाठी आधाररूप होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या जावळीच्या जंगलातील रसाळगड. या गडाचे पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर डाव्या हातास एक दगडी घुमटी लागते. या घुमटीतील मारुतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मारुतीस चक्क पिळदार मिशा कोरण्यात आल्या आहेत. सहसा मारुतीच्या मूर्तीस मिशा कोरलेल्या नसतात. पण येथे चक्क मारुतीरायास मिशा कोरल्याने मूर्ती रुबाबदार वाटते.
मराठ्यांच्या इतिहासात लोहगड, विसापूर या दुर्गजोडीस विशेष स्थान असून, यातील लोहगडावर खूप दुर्गप्रेमी जात-येत असतात. पण विसापूर किल्ल्यावर फारसे कोणी जात नाहीत. विसापूर किल्ल्यावर मारुतीरायाच्या अनेक मूर्ती असून, प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. यातील पहिली मूर्ती गडवाटेवर असणाऱ्या धान्यकोठाराच्या गुहेच्या बाहेरील कातळावर कोरलेली आहे. या मारुतीच्या मूर्तीस शेंडी असून, विशेष म्हणजे या शेंडीस गाठ मारलेली आहे. या मारुतीच्या हातात मराठ्यांचे ‘भाला’ हे शस्त्र आहे.
आज या किल्ल्यांना भेटी देताना, भटकंती करताना जर आपण मारुतीरायाच्या मूर्तीसमोर थांबलो, तर केवळ इतिहास नव्हे, तर त्या काळातल्या मावळ्यांची निष्ठा, शौर्य आणि आत्मबल देखील जाणवू लागतं.
rakeshvijaymore@gmail.com