
मुंबई : भारतीय समाजातील पारंपरिक दृष्टिकोनाला धक्का देत, टाटा ट्रस्ट्सने मासिक पाळीबाबत समाजाचा समज बदलण्यासाठी एक अनोखी आणि धाडसी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी लोकांना मासिक पाळी होते, पण तरीही ही बाब अजूनही लज्जास्पद, अपवित्र समजली जाते आणि अनेक जुने गैरसमज आजही तग धरून आहेत. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक परिपक्वतेचं, किंवा लग्नासाठी तयार असल्याचं लक्षण मानली जाते. ७१% मुलींना पहिल्यांदा पाळी आली तेव्हाच तिची माहिती मिळते, या मोहिमेतून टाटा ट्रस्ट्स मासिक पाळी ही आरोग्याचं लक्षण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
ही मोहिम झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ग्रामीण भागात सखोल सांस्कृतिक व सामाजिक अभ्यासावर आधारित आहे. यातून समोर आले की, अनेक स्त्रिया व तरुण मुली स्वच्छता, खाजगीपणा आणि मासिक पाळीच्या व्यवस्थापनात अडचणीत आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक निर्बंध हे सामाजिक रूढींचे परिणाम आहेत.
बहुतेक आई मुलींशी पाळीबाबत संवाद करत नाहीत, कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.
ही मोहिम ‘सोशल अॅन्ड बिहेविअरल चेंज कम्युनिकेशन’ (SBCC) च्या माध्यमातून सात राज्यांमध्ये राबवली जात आहे, आणि त्याचबरोबर डिजिटल माध्यमांवरही तिची प्रभावी उपस्थिती आहे. मोहिमेचा केंद्रबिंदू आहे एक गोड, संस्मरणीय जिंगल – ‘महिना आला’, जेथे "महिना" म्हणजे पाळी. या गाण्याच्या माध्यमातून पुरुष आणि महिला दोघेही पाळीची लक्षणं – थकवा, पोटदुखी, चिडचिड – सहजपणे स्वीकारतात आणि ती आरोग्याचं लक्षण मानतात, लपवायचं किंवा लाजायचं काहीच नसतं. या मोहिमेचा उद्देश आहे की, मुलींनी पहिल्यांदा पाळी आली तरीही त्या अजूनही बालपणातच आहेत, हे त्यांना जाणवावं. आणि स्त्रियांनीही पाळीबाबत माहितीपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि लज्जारहित अनुभव घ्यावा.
"साफ पाणी आणि खाजगी जागेचा अभाव अंघोळीसाठी, पॅड बदलण्यासाठी, किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या सगळ्यामुळे मुलींना पाळीच्या काळात सुरक्षित आणि सन्मानाने वागणं अवघड होतं. या अडथळ्यांमागे केवळ पायाभूत सुविधांचा अभावच नाही, तर मानसिक, सामाजिक बंधनंही आहेत. ही मोहिम या सगळ्या अडथळ्यांवर मात करत, मासिक पाळीला "लाजेची गोष्ट" न बनवता, आरोग्याचं साधं लक्षण मानायला शिकवते." - दिव्यांग वाघेला, प्रमुख – वॉटर, सॅनिटेशन अॅन्ड हायजीन (WASH), टाटा ट्रस्ट्स