अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये चहाबरोबर बिस्किट्स खाण्याची सवय असते. ग्लुकोज बिस्किट्स असो की जिरे बिस्किट, काहींच्या मते, बिस्किट्स खाणे हा आरोग्यदायी पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते, ही सामान्य वाटणारी गोष्ट आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चहा आणि बिस्किट्स एकत्र खाल्ल्याने पचनसंस्था, ब्लड शुगर लेव्हल आणि मेटाबॉलिजम रेटवर परिणाम होतो. यामुळे आरोग्याशी संबधित अनेक समस्या उद्भवू शकतात. दररोज चहाबरोबर बिस्किट्स खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घेऊयात.
बाजारात उपलब्ध असलेले बिस्किट्स हे मैदा, साखर, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह्जपासून बनवलेले असतात. या बिस्किटांमध्ये फायबर आणि पोषक घटकांचे प्रमाण कमी असते . म्हणूनच यांना एम्प्टी कॅलरीज (Empty Calories) असेही म्हणतात.
मधुमेहाचा धोका
बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. विशेषतः जर तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल तर टाइप २ मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
पचनसंस्थेवर परिणाम
बिस्किटांमध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते. त्यात असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि मैदा यामुळे पचनक्रिया मंदावते. दररोज चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटात सतत जडपणा जाणवू शकतो आणि भूक कमी लागू शकते.
हृदयरोगाचा धोका
बाजारात उपलब्ध असलेल्या बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असते, जे कोलेस्ट्रॉल वाढवते. हे फॅट हळूहळू तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करते . यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. जर तुम्हाला आधीच उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर ही सवय आणखी धोकादायक ठरू शकते.
त्वचा आणि केसांच्या समस्या
तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिस्किटे खाण्याचा तुमच्या त्वचेशी काय संबंध आहे? पण साखर आणि ट्रान्स फॅटचा त्वचेच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त प्रमाणात बिस्किट्स खाल्ल्याने मुरुम येणे, त्वचा तेलकट होणे, सुरकुत्या येणे आणि केस गळणे अशा समस्या उद्भवू शकतात.
हे पर्याय ठरतील आरोग्यदायी
तुम्ही बिस्किटांऐवजी मखाना, शेंगदाणे, भाजलेले चणे किंवा ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. तुम्ही ओट्स, बाजरी किंवा नाचणीपासून बनवलेले हेल्दी बिस्किट्स घरी देखील बेक करू शकता.