

-बालमैफल
-सुरेश वांदिले
मालकीणबाईंच्या सदनिकेला लागूनच जांभळाचं झाडं होतं. त्या झाडावर बरेच पक्षी येत. इकडून तिकडे, तिकडून इकडे उडत. फांदीवरच पंख फडफडवत. पंखात चोच खुपसून बसत. इकडे तिकडे भिरभीर बघून उडून जात. याच झाडावर एक मधमाशांचं पोळं रॉबिन्सन मामाला दिसलं. ते त्याने मार्गारेट मावशीला दाखवलं. या पोळ्याभोवती मधमाश्या गुंजारव करायच्या. मधमाश्यांचं असं गुंजारव करणं रॉबिन्सला आवडायचं. त्यामुळे तो बरेचदा मालकीणबाईंचा डोळा चुकवून झाडावर चढायचा नि एका फांदीच्या आडोशाला राहून हे गुंजारव श्रवण करायचा. त्याची ही गंमत मार्गारेट खिडकीतून बघायची.
मधमाश्यांचं असं गुंजारव ऐकता ऐकता, रॉबिन्सचं लक्ष झाडावरील इतर कीटकांकडेही जाऊ लागलं. मधमाश्या जसा आवाज करतात तसा आवाज हे कीटक करत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. असं कां असेल बरं? त्याला प्रश्न पडला. त्याने आपलं डोकं खराखरा खाजवलं. पण त्याच्या काही लक्षातच येईना. मग काही वेळाने त्याच्या लक्षात आलं नि तो स्वत:शीच पुटपुटला, “गधड्या, तुझ्या इटूकपिटूक मेंदूचं काम फक्त प्रश्न पडण्याचं आहे. उत्तराचं काम करण्यासाठी मार्गेटलीचा मोठूकफोटूक मेंदू असल्याचं विसरलास का?” या पुटपुटण्यानं रॉबिन्सन भानावर आला नि त्याने खिडकीकडे बघितलं. मार्गारेट ब्रेड हादडत बसली होती.
“कसली हावरट ही मार्गी? आपल्याला सोडून एकटीचंच टामटूम खाणं चाललंय.” असं पुटपुटत रॉबिन्सने फांदीवरून खिडकीत उडी घेतली. याचा धक्का बसून मावशीच्या हातातला ब्रेड निसटला. पण रॉबिन्सने तो शिताफीने झेलला. त्याने ब्रेडचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मार्गारेटने चटदिशी ब्रेड हिसकला नि रॉबिन्सनवर ती खेकसली, “रॉबेटल्या, या हावरटपणाला काय म्हणतात माहीत आहे का?”
“मेजवानी!” मामा डोळे मिचकावत म्हणाला. मावशी चिडली. तिने मामावर पंजा उगारला. मामाने समोरचे दोन्ही पाय जोडून तिला ‘सॉरी’ म्हटलं नि तिच्या पायांवर डोकं ठेवलं. मावशीचा राग शांत झाला.
“मावशे, आज या ब्रेडला काहीतरी गोड गोड लागत होतं”
“अरे, ते मध आहे. मालकीणबाईंनीच लावलं होतं. भारी वाटलं रे.”
“ओ वाव! झाडावरच्या त्या मधमाश्याच हे मध तयार करतात ग.”
“हो हो, त्याच करतात. तुला तर, त्या भारीच आवडायला लागलेल्या दिसतात. सारखा तिकडे झाडाच्या फांदीवर जाऊन बघत बसतोस.”
“त्या मधमाश्यांचं गुंजारव करणं मला, लय भारी वाटतं. पण आज एक प्रश्न मला पडला.”
“काय झालं?”
“अगं, या मधमाश्या जसा आवाज करतात, तसा आवाज इतर कीटक का बरं करत नसतील? तुला तर जगातलं सगळंच काही ठाऊक असताना. मेरे मावशी के पास हर सवाल का है जवाब, सांग याचं उत्तर आणि तुझ्यासाठी कुठून तरी हराभरा कबाब!” मामाने मस्का मारला. कबाबचं नाव कानी पडताच मावशीच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने डोळे मिटले. मेंदूला ताण दिला. हसतहसत डोळे उघडून, मामाला चिमटा घेत म्हणाली,
“मामू, मामू, मिळालं रे उत्तर!” मामा सावरून बसला. मावशी सांगू लागली, “रॉबू अरे, मधमाश्यांचा जो आवाज येतोना, तो त्यांच्या तोंडातून निघणारा नसतो.”
“मग?”
“तो त्यांच्या पंखांच्या फडफडवण्याचा असतो.”
“अगं पण मावशे, इतर कीटकही पंख फडफडवतात. मग, त्यांचा आवाज का ऐकू येत नाही?”
“तीच तर खरी गंमत!”
“गंमत की भानगड!”
“नो नो, ती शास्त्रीय गंमतच न्यारी.”
“हे शास्त्र काय बरं सांगतं?”
“अरे, पंख फडकावून कीटकांना उडावं लागतं. पंखांच्या फडफडवण्यामुळं हवेत कंपनं सुरू होऊन ध्वनी निर्माण होतो. त्यामुळे पंखांच्या फडफडाटाचं रूपांतर आवाजात होतं.”
“मग, आपल्याला सर्व किटकांचा आवाज का मोठ्याने ऐकायला येत नाही. फक्त मधमाश्यांचाच का?”
“अरे, कंपनाचा वेग आणि त्यात असणारी ऊर्जा यावर त्या आवाजाचं ऐकू येणं अवलंबून असतं.”
“म्हणजे?”
“अरे, वेगवेगळया किटकांच्या पंखांच्या फडफडवण्याचा वेग वेगवेगळा असतो. फुलपाखरं उडतात, तेव्हा त्यांचा वेग फार कमी असतो. एका सेकंदात ते सहासात वेळाच पंख फडकवतात. त्यामुळे हवेच्या कंपनामुळे कानाला ऐकू येईल एवढा आवाज काही निर्माण होत नाही. मच्छर वेगाने पंख फडफडवतात. पण ते फारच इटुकले असल्याने, हवेच्या कंपनाचा आवाज ते आपल्या कानाजवळ असतील तरच ऐकायला येतो.”
“मग मधमाश्यांना काही वेगळं वरदान आहे की काय?”
“राबू, मधमाश्यांचे पंख मोठे असतात. त्या एका सेंकदात ३०० ते ४०० वेळा पंख फडफडवतात. त्यामुळे हवेत जोराने कंपनं उठतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या रूपात कानी पडतो.
“याचा अर्थ, मधमाश्यांच्या तोंडातून आवाज निघत नाही म्हणायचा.”
“अगदी बरोबर. या मधमाश्या जेव्हा एकत्र मोहोळात राहून काम करतात तेव्हा त्या स्थिर असतात. त्यामुळे त्यांचा गुंजारव ऐकायला येत नाही. पण त्या जेव्हा उडतात, तेव्हा पंखांचं फडफडणं सुरू होतं. त्यातून आवाज निर्माण होतो.”
“वाव! मावशे, या पंखांच्या उडण्यातलं गणित आणि शास्त्र किती छान समजावलंस ग. पण मावशे…”
“आता काय?”
“तुला पंख मिळाले नि तू सुद्धा उडायला लागलीस तर असाच गुंजारव निर्माण होईल का ग?” मामाने, मार्गारेट मावशीला डिवचलं.
“रॉब्या, आता एक शब्द जरी बडबडलास तर कानाखाली आवाज काढीन हं.” मावशीने तंबी दिली. पण ही तंबी ऐकायला मामा कुठे तिथे होता. मावशीला डिवचल्याबरोबर तिला गुंगारा देऊन, मध लावलेला ब्रेड घेऊन पटदिशी रॉबिन्सन बिळात शिरला नि मजेत त्यावर ताव मारू लागला.
ज्येष्ठ बाल साहित्यिक