Ramzan 2025 : मधुमेहाच्या रुग्णांनी इफ्तार आणि सेहरीत 'हे' पदार्थ खाऊ नये; साखरेची पातळी वाढू शकते

इस्लाम धर्मियांसाठी रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात इस्लाम मानणारे लोक रोजा ठेवत अल्लाहची इबादत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना रोजा ठेवताना विशेष काळजी घ्यावी लागते.
Ramzan 2025 : मधुमेहाच्या रुग्णांनी इफ्तार आणि सेहरीत 'हे' पदार्थ खाऊ नये; साखरेची पातळी वाढू शकते
FreePik
Published on

इस्लाम धर्मियांसाठी रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात इस्लाम मानणारे लोक रोजा ठेवत अल्लाहची इबादत करतात. रोजा ठेवण्याचे विशिष्ट नियम असतात. त्याचे पालन इस्लाम बांधवांकडून केले जाते. रोजा ठेवताना सेहरीच्या वेळी आणि रोजा सोडताना अशा दोनच वेळा जेवण केले जाते. तर पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण काळ अन्न आणि पाण्याचे सेवन करणे वर्जित असते. सामान्यपणे सर्वांनीच रोजा ठेवणे आवश्यक मानले गेले असले तरी गरोदर महिला आणि प्रवास करणाऱ्या व्यक्ती रोजा न ठेवणे हे मान्य आहे. मधुमेहाच्या रुग्णांना रोजा ठेवताना विशेष काळजी घ्यावी लागते.

काय असते सेहरी?

पहाटेच्या वेळी जी नमाज अदा केली जाते. त्यानंतर रोजा सुरू करायचा असतो. या नमाजला सेहरी की नमाज असे म्हणतात. कारण तुम्हाला दिवसभर भूक लागू नये यासाठी तुम्ही या नमाजपूर्वी आवश्यक मात्रेत जेवण करायचे असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर रोजा ठेवताना ऊर्जा कायम राहते.

काय आहे इफ्तार?

इस्लामप्रमाणे सायंकाळी नमाज अदा केल्यानंतर रोजा खोलतात. यावेळी पाणी पिऊन नंतर जेवण केले जाते. त्याला इफ्तार म्हटले जाते. रमजान काळात अनेकदा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते.

मधुमेहाच्या रुग्णांना घ्यावी लागते विशेष काळजी

रमजान हा अल्लाहची इबादत करण्यासाठी इस्लाममध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे आजारी असतानाही अनेक वेळा मधुमेहाच्या रुग्णांकडून पवित्र रोजा ठेवला जातो. मात्र, मधुमेहामुळे त्यांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण दिवसभर रोजा ठेवल्याने अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येण्यासारखा त्रास संभवू शकतो. तसेच यंदा २०२५ चे रमजान हे उन्हाळा सुरु असताना आले आहेत. परिणामी शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेहरीत आणि इफ्तारमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून रोजा ही ठेवता येईल आणि तब्येतही खराब होणार नाही.

सेहरीत काय खावे?

मधुमेहाच्या रुग्णांनी सेहरीत शक्यतो भात खाणे टाळावे. कारण भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. तसेच असे कोणतेही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. याऊलट ज्यामध्ये हाय प्रोटिन असते, असे अन्न खावे. उदाहरणार्थ चने.

इफ्तारमध्ये काय खावे?

मधुमेहाच्या रुग्णांनी इफ्तारमध्ये शक्यतो पोळी किंवा गव्हापासून बनलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण रोजा करताना दिवसभर काहीही खाल्लेले नसते. अशात पोळी किंवा ब्रेड व अन्य गव्हाचे पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी एकदम वाढू शकते. गव्हाच्या ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शक्यतो गव्हाचे पदार्थ टाळावे आणि बाजरीची भाकरी खावी.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in