नव्या जगाच्या वेडानं आम्ही पछाडलो आहोत...

कोल्हापुरातील गडहिंग्लज इथे ५ एप्रिलला पहिले जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखकाचा स्वतंत्र अवकाश, त्यावर येणारी विविध सत्तांची बंधनं, स्त्री लेखक म्हणून लिहिताना होणारा कोंडमारा आणि त्यातून काढावी लागणारी वाट, सत्ता आणि संस्कृती, सत्ता आणि विनोद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.
नव्या जगाच्या वेडानं आम्ही पछाडलो आहोत...
नवशक्ति - अक्षररंग
Published on

- नोंद

- डॉ. ऐश्वर्या रेवडकर

कोल्हापुरातील गडहिंग्लज इथे ५ एप्रिलला पहिले जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखकाचा स्वतंत्र अवकाश, त्यावर येणारी विविध सत्तांची बंधनं, स्त्री लेखक म्हणून लिहिताना होणारा कोंडमारा आणि त्यातून काढावी लागणारी वाट, सत्ता आणि संस्कृती, सत्ता आणि विनोद अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. या दीर्घ भाषणाचा संपादित भाग इथे देत आहोत.

जनवादी सांस्कृतिक चळवळीचे हे पहिलेच युवा साहित्य संस्कृती संमेलन आहे. या पहिल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला मिळाला ही समाधान आणि आनंद देणारी गोष्ट आहे. कारण सर्जनतेच्या आरंभाचा क्षण हा अनेक शक्यतांनी उजळलेला असतो आणि मला आज त्याची साक्षीदार होण्याचा सन्मान मिळाला आहे. खरेतर स्त्रीच आदिम सृजनकर्ती आहे. असं सगळं आज जुळून आलंय.

भाषा.. शब्द.. काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठे-कधी-कोणाशी किती वेळ बोलायचं, या गोष्टींसाठी आपली आकलनक्षमता, विचारक्षमता, परिपक्वता, समज, तत्त्व, धारणा, सामाजिक नियम हे सगळं वापरलं जातं. त्यासाठी मेंदूचे वेगवेगळे विभाग कामी येतात. यातील एखादा भाग आजारी असेल तर तुम्ही वेगळं काहीतरी बोलाल. त्यात पुन्हा जर कोणी तुमच्या नरड्यावर पाय देऊन उभं असेल तर तुमचा आवाज, भाषा, बोलण्याचा विषय बदलू शकतो. कोणी तुमच्या पाठीवर काठीने रट्टे देत असेल तर आणखी बदल. एखाद्याला अस्पृश्य म्हणून कायम वस्तीबाहेर ठेवलं असेल तर त्याची भाषा, बोलण्याचे विषय काय असतील? एखादीला उंबरा ओलांडायची परवानगी नसेल तर ती बोलत असेल का? जर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले असाल तर तुम्ही काय लिहाल? तुम्ही विरोधक आहात आणि सत्ताधारी तुमच्यावर नजर रोखून असतील तर तुम्ही काय लिहाल? पोटात भुकेने एकच कल्ला केला असेल तेव्हा तुम्ही काय लिहाल? पाण्याच्या एका थेंबासाठी तुम्हाला बेंबीच्या देठापासून बोंब ठोकावी लागत असेल तर तुमच्यात काही बोलण्याचे अवसान शिल्लक राहील काय? संघर्ष करून थकाल तेव्हा तुम्ही मुके होऊन लेखणी खाली ठेवून द्याल की संघर्षानं तुमच्या लेखणीला आणखी जास्त धार चढेल? नरड्यावर कोणी पाय दिला तर तुम्ही दुप्पट आवाजात आरोळी ठोकाल की एखादं मोठं पद मिळावं म्हणून लालसेने स्वतःहून तुम्ही तोंड शिवून टाकाल?

व्यक्त व्हायला, लिहायला काय काय लागतं? सशक्त मन, विचारी मेंदू, निरोगी शरीर. सुरक्षित अवकाश. चांगल्या विचारांनी झालेलं भरणपोषण. व्यक्त व्हायची संधी. का लिहिण्याची प्रेरणा मिळावी म्हणून वाट्याला यावा नुसताच रणरणता संघर्ष? संघर्ष इतका पण नको हा की त्यानं जीवनेच्छाच संपवून टाकावी किंवा एखादीची अभिव्यक्तीच मारून टाकावी. व्यक्त होता येणं, तुम्ही लिहिलेलं कोणी वाचणं हेही प्रिव्हिलेजच.

मला वाटतं की युवावस्था म्हणजे या आपल्या आवाजाचा, ‘स्व’च्या स्वतंत्र भाषेचा, स्वतःच्या खास वैयक्तिक अभिव्यक्तीचा शोध घेणं असतं. व्यवस्था आणि संघर्ष समजून घेत, स्वतःला व्यक्त करायची, लसलसती, जीवघेणी धडपड. लहानपणी संस्कार, नीतिमत्ता, नियम, शिष्टाचार, जात, धर्म, वर्ग, लिंग या सगळ्याच्या नावाखाली आपल्या मनाला विशिष्ट प्रकारे विचार करण्याची सवय जाणीवपूर्वक लावली गेलेली असते. समाजाने लावलेल्या या सवयी तोडणं म्हणजे खरा स्व शोधणं. जगण्यासोबत प्रयोग करत, कृत्रिम आवरणे फोडत, मनाचं कंडिशनिंग तोडत, मानवीय सीमारेखांच्या पलीकडे विचार करायला शिकणं म्हणजे युवावस्था.

ज्ञान घेत, कौशल्ये विकसित करत स्वतःची भवतालाकडे पाहण्याची दृष्टी सजग करायची. सोबतच स्वतःचे इथे तिथे विखुरलेले तुकडे गोळा करत, स्वतःला नव्याने सांधत जायचे. एकीकडे पोटापाण्याचा व्यवसाय करत असताना, आजूबाजूला पसरलेली अक्राळविक्राळ व्यवस्था समजून घेत राहायचं, तर दुसरीकडे हीच व्यवस्था आपलंही टिचभर अस्तित्व गिळू पाहते, तेव्हा जमेल त्या पद्धतीनं संघर्ष करत राहायचं. हा संघर्ष हाच युवावस्थेचा खऱ्या अर्थाने खुणेचा बिंदू असतो. प्रचंड तगमग, अस्थिरता, धडपड, साहस, उत्सुकता, प्रेम, बेफामपणा, उत्स्फूर्तपणा, निराशा, संताप, दुःख, हतबलता आणि या सगळ्यासोबत जगण्यातला अस्सलपणा आणि मग जगण्यातला हा अस्सलपणा लिखाणातही किंवा कलेच्या अभिव्यक्तीतही जसाच्या तसा उतरावा ही असोशी. एकेक शब्द कागदावर उतरवायचा म्हणजे आपल्याच ओल्या कच्च्या जखमा नखांनी सोलून काढायच्या. उत्तम लेखन हे अजून आपलं ताबेदार झालेलं नसतं. अजून शब्दांवर ज्येष्ठपणाची पकड आलेली नसते. अजून समज अर्धी कच्ची असते आणि कदाचित लेखनही. परंतु म्हणूनच युवांच्या या अर्ध्या कच्च्या लेखनात एक सच्चेपण असतं. प्रामाणिक अ-परिपूर्णता असते. रॉ-नेस असतो. युवा लेखनाचं हे जे निखळ प्रामाणिक सौंदर्य आहे, त्यातच वाचकाला मोहवून टाकण्याचं सामर्थ्य असतं आणि हाच युवावस्थेचा काळ पुढचा रस्ता ठरवतो. खाचखळगे असतात. मोह असतात. कुठे दरीत स्वतःला ढकलून द्यायचं असतं, तर कुठे पायघड्या असतात. आपली मूल्यव्यवस्था निवडण्याचा हाच काळ असतो.

काम करणं म्हणजे काय इथपासून ते नाती, संवाद, हितसंबंध, नैतिकता या सगळ्याचे अर्थ शोधणे, जुन्या न पटणाऱ्या व्याख्या टाकून देऊन नवीन व्याख्या तयार करणं, नव्या संकल्पना आत्मसात करणं आणि हे सगळं आपल्या अभिव्यक्तीत सामावून घेणं... यादृष्टीने मला ही युवावस्था माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाची संक्रमणावस्था वाटते.

आपण लिहितोय ते का लिहितोय आणि कोणासाठी लिहितोय या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने पुन्हा पुन्हा तपासत रहायचे असते. कदाचित वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर याचे उत्तर बदलूही शकेल. पण जशी आपण कायम भवतालाची चिकित्सा करत असतो, तशीच ती स्वतःचीही करत रहावी लागते.

माझ्या स्वतःच्या बाबतीत उदाहरण द्यायचे म्हटले तर ‘बिजापूर डायरी’ या माझ्या पहिल्या पुस्तकाचं लेखन करत असताना त्यात एक भाबडा भाव होता. पुढे तो भाबडेपणा गेला, पण तटस्थपणा राहिला. खरेतर त्यातील तटस्थपणासाठी खूप कौतुक झालं. पण आता मी जेव्हा विचार करते तेव्हा मला वाटतं की तटस्थ भूमिकेत राहिल्यानं मी आदिवासींची उपेक्षा जास्त ठळकपणे मांडू शकले नाही. आजच्या ज्या प्रकारच्या वास्तवात आपण जगत आहोत, ते पाहून तर तटस्थ हा शब्दच नकारात्मक ठरतोय का, इतका काळ भेसूर झाला आहे.

मला वाटतं, आजचा काळ हा तुमची विचारसरणी जास्त ठळकपणे मांडण्याचा काळ आहे. याचा अर्थ फक्त विरोधी बाजूवर तुटून पडायचे, असेही नाही. विरोधकांचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे. त्यांची बाजू ऐकली तर त्यांची बलस्थाने आणि कृती आराखडा कळेल. सोबत त्यांच्या चुका कळतील आणि आपण स्वतः त्या चुका कशा टाळू हेही शिकता येईल. सोबतच आपल्या सहकाऱ्यांची, मित्रांचीही चिकित्सा केली पाहिजे. यातून आपलाच मार्ग जास्त स्पष्ट होत जाईल. तटस्थपणाला मात्र सध्याच्या काळात थारा नाही. कोणतीही भूमिका न घेणे हीही शेवटी एक भूमिका असते हे साधं वाटणारं वाक्य कळायला मला अनेक मित्र आणि ज्येष्ठ लोकांची मदत झाली आहे.

तुम्ही कोणती भूमिका घेता आहात, ते तुम्ही कोणत्या समूहातून आलेले आहात, यावरही अवलंबून असतं. मग त्यात स्थळ-काळ-लिंग-जात-धर्म-वर्ग हे सगळं आलं. आपल्याला ही आंतरछेदिता समजून घ्यावी लागेल आणि मगच ती समज लेखनात मांडता येईल.

स्त्री म्हणून मला व्यक्त व्हायला सुरक्षित अवकाश नव्हता. वाढत्या वयात या सगळ्याला कसं तोंड द्यायचं हे समजत नव्हतं. स्त्रीचं तारुण्य म्हणजे पितृसत्ताक समाजाच्या अधिपत्याखाली तुमचं स्वतंत्र व्यक्तित्व चिरडलं जाणं. कुटुंब, जात, घराण्याची इज्जत, धार्मिक परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली तुमच्या इच्छा-आकांक्षाचं दमन केलं जाणं... स्त्री म्हणून सन्मानाने जगायचं असेल तर लाजेचं पांघरूण जखमांवर ओढून घेत, मूकपणे सगळं सहन करत रहाणं..हे असं माझ्यावरही माझ्या इच्छेविरुद्ध लादलं गेलं होतं. ग्रामीण भागातील, मराठा जातीतील मुलीच्या वाटेला जे भोग येतात ते माझ्याही वाटेला व्यवस्थित येत होते. कमी वयातील लैंगिक अत्याचारापासून ते पळून जाऊन लग्न केलं म्हणून लोकांनी नावं ठेवणं. त्यात पुन्हा मी नकोशा झालेल्या लग्नातून घटस्फोट घेतला, तेव्हा तर जसं काही मी पुरुषाशिवाय किती असहाय्य आहे किंवा आता माझं आयुष्यच संपलं असं लोक मला जाणवून देऊ लागले.

एकीकडे माझं डॉक्टर बनणं मला आयुष्यात खूप काही मिळवून देत होतं. आनंद, समाधान, यश, कौतुक, कौशल्ये, आत्मविश्वास. तर दुसरीकडे केवळ मी मुलगी आहे म्हणून व्यक्तिगत आयुष्यात मला प्रचंड दुःखाचा, नैराश्याचा सामना करावा लागत होता. माझ्या स्वतंत्र बुद्धीमुळे जणू मी वाईट स्त्री आहे, मी शोषणाच्या लायक आहे असं मला भासवलं जात होतं. यातून मी आत्महत्येचाही प्रयत्न केला. कारण स्त्री म्हणून होणारी घुसमटच इतकी प्रचंड होती की मृत्यूशिवाय दुसरा रस्ता सापडत नव्हता. त्या दुःखातून बाहेर पडायला, मग मी २०११ मध्ये ब्लॉग लेखन सुरू केलं. ‘मातीची मुलगी’ या नावानं. कारण तेव्हा माझ्यात खऱ्या नावानं ब्लॉग लिहिण्याएवढी हिंमत नव्हती. पण निनावी लिहिण्याच्या ऑनलाइन अवकाशामुळं मी लिहिती झाले. ब्लॉगवर लोकांच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया यायच्या आणि मला आश्चर्य वाटायचं की टोकाच्या वैयक्तिक दुःखातून लिहिलेलं लोकांना भावतं आहे. तुम्ही जितकं जास्त खासगी लिहाल, तितकं ते जास्त वैश्विक बनत जातं, असा काहीसा तो पहिल्यावहिल्या लेखनाचा अनुभव. त्यातही एक जाणीव आली की, मी डॉक्टर असून इतकी घुसमट, तर ज्या असंख्य मुलींना याही संधी मिळत नाहीत, त्यांचं काय होत असेल?

माझ्या या व्यवसायानं खरेतर मला जास्त स्त्रीवादी बनवलं. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून विविध राज्यांत काम करताना, तेथील भूभागानुसार स्त्रियांच्या समस्या कशा बदलतात, सोबतच पुरुषासत्ताक व्यवस्था मात्र सगळ्याच प्रदेशांत स्त्रियांच्या शरीरावर कशी नियंत्रण ठेवू पाहते हे पाहून आश्चर्य वाटायला व्हायचं. धर्म, जाती, आर्थिक स्तर, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष डॉक्टरांच्या आणि नर्सेसच्या मनातील पुरुषसत्ताकता कशी चुकीच्या सामाजिक धारणांसोबत हातमिळवणी करत, स्त्रीच्या शोषणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी होते हेही मी सारे अनुभवत होते. सोबतच ही व्यवस्था मलाही तसेच बनायला प्रोत्साहन देत होती. व्यवस्थेला शरण जाण्याचे आर्थिक फायदे देऊ करत होती. ते न मानता, मी बंडखोरी करू पाहत होते, त्याचे परिणामही भोगत होते. आज त्या सगळ्या संघर्षाकडे मी पाहते, तेव्हा जाणवतं की त्या सगळ्यातून मला दोन गोष्टींनी जगवलं, एक म्हणजे लेखन व दुसरं म्हणजे स्त्रीवाद.

अनेक महिने चाललेली माझी कादंबरी लेखनाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा मला एक नवीन जाणीव झाली. या कादंबरी लेखनाच्या प्रक्रियेने मला आतून बरेच बदलवले होते. जो स्त्रीवाद मी पूर्वी समजू घेऊ पाहत होते, तो या लिखाणातून मला आणखी जास्त उमगला होता. माझ्या आत आणखी मुरला होता. कारण माझ्या नायिकेचे वागणे, बोलणे मी पुन्हा पुन्हा तपासले होते. एकेक शब्द, वाक्य घासून पुसून लिहिले होते. याने झालं काय की माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मला जे प्रश्न पडले होते, त्यांची मला आपोआपच उत्तरे मिळून गेली. भूतकाळात जे घडलं ते का घडलं, मी जीवन एका विशिष्ट प्रकारे का जगले असे अनेक प्रश्न. तेव्हा कुठे मी जगाला फाट्यावर मारत, स्वतःला माणूस म्हणून स्वत:ला चांगल्या-वाईटासकट स्वीकारू शकले. माझ्या मनातील नैराश्याचं आभाळ हटून मन मोकळं, निरभ्र झालं. ‘विहिरीची मुलगी’ या कादंबरीचं मला हे मोठं देणं आहे.

यानंतर मी अधिक धाडसाने स्त्री-जाणिवा असलेल्या कथा लिहू लागले. मला वाटतं ही लेखनाची ताकद आहे. स्वतःला आंतरबाह्य बदलवून टाकण्याचे सामर्थ्य लेखनात आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही की तरुण मुलींना आणि स्त्रियांना ही कादंबरी खूप जवळची वाटते आहे. त्यावरही मी खूप विचार केला. पौगंडावस्थेबद्दल किंवा तरुणाईबद्दलच्या आत्तापर्यंतच्या ज्या कादंबऱ्या आहेत, त्या बहुतेक करून पुरुष नायकांच्या आहेत. त्यात आम्हा स्त्रियांना आमचे भावविश्व सापडत नाही ही वस्तुस्थिती आहे. पुरुष लिखित साहित्यात पुरुषी जग इतकं ठळक असतं की मला अनेकदा ते वाचवलं जात नाही. लिंगभावाच्या पलीकडे जात लिहिणारे पुरुष साहित्यिक खूप कमी आहेत. अनेकदा लेखन पुरुषी असतं, म्हणजे त्यात पुरुषी देहभान, जाणिवा, स्वप्ने यांनाच मुख्य स्थान असतं. त्यातील विश्वाचा केंद्रबिंदू पुरुष नायक असतो. कधी त्यात स्त्रिया आल्याच तर त्या पुरुषी नजरेतून आलेल्या असतात. पुरुषाला हव्या तशा.

माझा मुद्दा हा आहे की साहित्यात मुलींना त्यांचं भावविश्व, त्यांच्या शरीर जाणिवा, त्यांची स्वप्नं, निराशा, आत्मसन्मान हे सारं सापडतं का? आणि सापडावं का? मुलींना दर महिन्याला पाळी येते. गर्भपात होतो तेव्हा मांसाचे गोळे बाहेर पडतात, त्याचा त्यांच्या मानसिक स्थितीवर, नात्यावर, सामाजिक आयुष्यावर परिणाम होत नसेल का? मातृत्व हे नेहमीच सुखकारक नसतं. अनेकवेळा ते मनाविरुद्ध लादलेलं असतं. हे सगळं साहित्यात यावं की नाही? पुरुषांनी साहित्याचा मक्ता स्वतःकडे घेऊन केलंय काय, तर स्त्रीच्या सुखदुःखाच्या आणि सन्मानाच्या त्यांना हव्या तशा परिभाषा घडवून टाकल्या आहेत. मातृत्वाचं गौरवीकरण, स्त्रीच्या नाजूक आणि गोऱ्या शरीराच्या कल्पना, स्त्री सहनशील असते, पुरुष बेबंद असतो, स्त्री लाजरीबुजरी असते आणि जी निर्लज्ज असते ती रांड असते, भोगवस्तू बनायच्या लायकीची असते हे सगळं पुरुषांनी त्यांच्या साहित्यात लिहिलं आहे. पुरुष साहित्यिकांनी कल्पनाविलासाचा वापर करून स्त्रियांबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. भाषेतील ही पुरुषी वृत्ती आणि पुरुषसत्ताकता साहित्यिक शिष्टाचारातही दिसते.

मला पूर्वी वाटायचं की स्त्रीवाद हा शब्द आणि त्याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. पण मग लक्षात आलं की शेवटी समाजाचंच प्रतिबिंब साहित्यातही उमटतं. समाजासारखेच, साहित्यिक क्षेत्रातही स्त्रीवादाचा चुकीचा अर्थ लावणारे, या शब्दाची मस्करी उडवणारे स्त्री-पुरुष आहेत. बाईचं शरीर हे लैंगिक आणि प्रजननदृष्ट्या पुरुषापेक्षा वेगळं असल्याने तिचे अनुभव आणि जाणिवा वेगळ्या असणार. तिच्या वेगळ्या अनुभूतीसकट स्त्रीला व्यक्त व्हायला अवकाश मिळायला हवा. तिची अभिव्यक्ती मानवतेच्या वैश्विक पटावर समजून घ्यायला हवी आणि खरेतर हा प्रश्न आता फक्त स्त्रियांपुरता मर्यादित राहिलेला नाहीए. पुरुष आणि स्त्री या विरुद्धलिंगी लैंगिकतेच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तींना आपल्या साहित्याच्या अवकाशात सामावून घेण्याचा हा काळ आहे. LGBTQIA या मोठ्या समूहाला लेखनात सामावून घेता येईल, अशी भाषा आपण घडवायला हवी. मला भाषेची ही खूप मोठी मर्यादा वाटते की स्त्री-पुरुष अशा फक्त दोनच लिंगांचा संदर्भ देत आपण आपली भाषा वापरतो. या मर्यादांवर काम व्हायला हवं.

मला हे नमूद करायला आवडेल की समाजातील अन्यायकारक पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध एक स्त्री जेव्हा संघर्षाला उभी राहते, तेव्हा तो तिचा एकटीचा संघर्ष नसतो. त्या संघर्षाला इतिहासातील अनेकांनी बळ पुरवलेले असते. वर्तमानात तिचा संघर्ष इतर अनेकींना प्रेरणा देत असतो, तर तिचा आजचा संघर्ष भविष्यातील पिढीसाठी नवीन वाटा निर्माण करत असतो. १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना’ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी त्या दीर्घनिबंधात अनेक पुरुषी काव्यांचा पर्दाफाश करत स्त्रीवादाची संकल्पना मांडली आहे. सगळ्याच धर्मांमध्ये स्त्रीचे शरीर हे मोहाचे, पापाचे द्वार मानले गेले आहे. ताराबाई मात्र धार्मिक काव्यात न अडकता, व्यावहारिक पातळीवर सोप्या भाषेत, निवडक शब्दांत समाजातील स्त्रियांच्या स्थानाची चिकित्सा करतात. जोतिबा फुले तर समाजाच्या पुरुषी वर्चस्वाच्या मान्यतांना धुडकावून लावत, सवित्रीबाईंची साथ निभावतात. स्त्री शिक्षणाला सुरुवात करणारे, विधवा स्त्रियांची बाळंतपणे करणारे हे जोडपे अगदी आजच्या काळातही आदर्श समोर ठेवते. आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर. या महाराष्ट्रातील असाव्यात हा मग योगायोग मुळीच वाटत नाही. बालविवाह झालेल्या नवऱ्याला नाकारणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत, आपल्या निर्णयावर ठाम रहात कैदही स्वीकारतात. किती मोठी हिंमत आहे ही. मेलेल्या नवऱ्याच्या चितेवर सती जायचा तो काळ आणि ही बाई चक्क जिवंत नवऱ्याला नाकारते आहे. महाराष्ट्रातील पहिला घटस्फोट, तोही एका बाईने जिद्दीने घेतलेला. लग्नासाठी मुलीचे संमती वय कायद्याने दहावरून बारा वर्षे असे वाढवावे, यासाठी आंदोलन उभं करणाऱ्या अठराव्या शतकातील स्त्रिया. पुढे मग आंबेडकरांनी संविधानातच हिंदू कोड बिल आणून स्त्रियांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी अनेक अधिकार दिले.

मी व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. मिठालासुद्धा सूचकपणा मला परवडत नाही. उलट सूचकपणाच्या नादात एखाद्या व्यक्तीचा जीव जायचा. रुग्णाला व्यवस्थित स्पष्टपणे समजावून सांगणं हे चांगलं डॉक्टर असण्याचं महत्त्वाचं लक्षण. मी शाळेत मासिक पाळी, लैंगिक शिक्षण याबद्दल सेशन घ्यायला जाते तेव्हा मुला-मुलींना सुरुवातीलाच सांगते की तुमची जी काय लाज आहे, ती चपलेसारखी दारात सोडून या. सरकारी रुग्णालयात नोकरी करताना, बलात्कार झालेली अल्पवयीन मुलगी किंवा स्त्री यांना मी जेव्हा तपासते, तेव्हा ते व्यवस्थित सखोलपणे मला कागदपत्रावर नोंदवून ठेवावे लागते. स्त्रीच्या प्रत्येक लैंगिक अवयवाचे नाव आणि वर्णनासकट. पुन्हा कोर्टात जाऊन, जजसमोर ते जसेच्या तसे वाचून दाखवावे लागते, त्यावर उलट तपासणी होते. यात नोंदलेला एकेक शब्द पीडित व्यक्तीला न्याय देण्यासाठी किंवा तिच्यावर अन्याय होण्यासाठी जबाबदार असतो. न्यायव्यवस्थेमध्ये इतकी मोठी जबाबदारी माझ्या शब्दांवर तोललेली असते आणि मग त्याच जबाबदारीने मी साहित्यसुद्धा का बरं लिहू नये? साहित्यात वास्तवाचे प्रतिबिंब उमटलं पाहिजे ना? अभिजनवादी साहित्यिकांनी तिथेही सोवळेओवळे निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे आजच्या काळाची ही गरज आहे की फक्त स्त्रीच नाही, तर भिन्न लिंग आणि भिन्न लैंगिकता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साहित्यात सन्मानपूर्वक स्थान मिळण्यासाठी युवा लेखकांनी भाषा, शब्द यांचा जबाबदारीने आणि हक्काने उपयोग करत, महत्त्वाची भूमिका बजावायला हवी.

आज गरज आहे ती सशक्त, बेधडक, स्पष्ट अभिव्यक्तीची. अभिजन वर्गाला धक्का देणाऱ्या विद्रोही अभिव्यक्तीची. सध्या टीनेजर असलेली जी पिढी आहे, ती आपल्या दहा पावलं पुढं आहे. तिने आत्ताच इंटरनेटवर वेगवेगळ्या देशातल्या प्रसिद्ध सीरिज, डॉक्युमेंटरी, सिनेमे पाहिलेले आहेत. बहुतांश इंग्लिश मीडियममध्ये शिकत असल्याने त्यांचे इंग्लिश वाचन अफाट आहे. वेगवेगळ्या देशातील घडामोडी त्यांना माहिती असतात. यांना वाचू वाटेल असे साहित्य आपण लिहू शकतो का? हा आता युवा लेखकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना ज्ञान मिळतं आहे. पण समजेबद्दल त्यांचे प्रचंड घोळ आहेत. कारण एकीकडे शाळेत ते लोकशाही, हुकूमशाही, विज्ञान, खगोलशास्त्र हे सारे वाचत आहेत, तर आजूबाजूला समाजात ते धार्मिक ध्रुवीकरण, पौराणिक कथांचं पीक पाहत आहेत. सोबत त्यांच्या वाढत्या वयाचे, लैंगिकतेचे प्रश्न त्यांना सतावत असतात, ज्याबाबत आपल्या समाजात अजून मोकळेपणाने बोलले जात नाही. या वयातील मुलांमध्ये मानसिक आजार, व्यसने, हिंसा, आत्महत्या याचे प्रमाण वाढत चालले आहे.

युवा लेखक म्हणून आमच्या पिढीची मला मोठी जबाबदारी जाणवते की या वयोगटासाठी आपण लिहायला हवं.

मी ‘बिजापूर डायरी’ लिहीत होते तेव्हा सरकारी अधिकाऱ्याला आदिवासींच्या बाजूने काही प्रश्न विचारला की तुम्ही मानवी हक्कवाले दिसताय, असा टोमणा ऐकू यायचा. मला आता वाटतंय की सगळा देशच सध्या बस्तरसारखा झालाय. तुम्ही सरकारच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशविरोधी आहात, असा ठपका तुमच्यावर ठेवला जाऊ शकतो. आता असं वाटतंय, पूर्ण देशातच बस्तरमधली विचित्र परिस्थिती अवतरली आहे. कुणाल कामरा याचे ताजे उदाहरण. त्याच्यासोबत काय घडलं. तरीही त्याने ठणकावून सांगितलं की मी माफी मागणार नाही.

स्टॅण्डअप कॉमेडी हा अभिव्यक्तीचा एक वेगळा प्रकार आहे. त्याची तुलना कोणीही साहित्यासोबत, कवितेसोबत वगैरे करू नये. भारतात अनेक प्रकारचे कॉमेडियन आहेत. त्यातले बहुसंख्य लोक हे जाणूनबुजून राजकीय भूमिका टाळून शो करत राहतात. फार कमी लोक काही भूमिका घेत, शो करतात. बस्तरमधील एक तरुण आहे, मनू, तो आपल्या देशातील जातीयतेबद्दल उपहासात्मक बोलतो, असे बोलणे उच्च वर्णीय लोकांच्या कसे डोक्यावरून जाते, त्याबद्दलही तो बोलतो. स्टॅण्डअप कॉमेडीचा एक मुख्य प्रकार म्हणजे पॉलिटिकल सटायर.

‘ऐसी तैसी डेमोक्रसी’ नावाचा एक शो आहे. वरुण ग्रोव्हर, राहुल राम आणि संजय राजोंरा या तिघांचा हा शो. सॉफ्ट हिंदुत्व, गोदी मीडियापासून भारतीय मर्द, कन्सेन्ट- संमती या सगळ्या आजच्या काळातील गोष्टींवर उपहासात्मक पद्धतीने भाष्य करणारा हा कार्यक्रम. याप्रकारची कॉमेडी सत्तेत असलेल्या सामर्थ्यशाली लोकांची खिल्ली उडवते.

सामान्य माणूस जेव्हा या विनोदांवर हसतो तेव्हा त्याची हतबलता जाऊन, त्याला थोडे मानसिक बळ मिळते. स्टॅण्डअप कॉमेडी अशाप्रकारे बळाचे मानसिक हस्तांतरण करते. मूठभर पॉवरफुल लोकांची शक्ती कमी करून, ती सामान्य माणसाला ताकदवान बनवते, की सामान्य माणूस सत्तेचा, संपत्तीचा उपहास करत त्यावर हसू शकतो. हे स्टॅण्डअप कॉमेडीचे सामर्थ्य आहे.

युवा लेखिका, कादंबरीकार.

logo
marathi.freepressjournal.in