रस्सा भाजीत मीठ जास्त झालं? काळजी करू नका, असा करा रस्सा पुन्हा नीट

तुमच्याकडे पाककलेचं कौशल्य असेल तर तुम्ही असा खारट पदार्थही पुन्हा खाण्यायोग्य बनवू शकता. यासाठी वापरा या काही टिप्स
रस्सा भाजीत मीठ जास्त झालं? काळजी करू नका, असा करा रस्सा पुन्हा नीट

जेवनात मिठ हे नेहमी बरोबरच असायला हवं, मीठ कमी-जास्त झालं की जेवणाची चव बिघडते. स्वयंपाकात मीठ हे नेहमी प्रमाणातच पडायला हवं! पण बऱ्याचदा स्वयंपाक करताना एखाद्या पदार्थात मीठ जास्त पडतं, कधी लक्ष नसल्यामुळे एकाच पदार्थांत दोन वेळा ही मीठ टाकलं जातं. त्यामुळे मीठाचं प्रमाण वाढलं की पदार्थ खारट झाला की जेवणाची मज्जा जाते. पण जर तुमच्याकडे पाककलेचं कौशल्य असेल तर तुम्ही असा खारट पदार्थही पुन्हा खाण्यायोग्य बनवू शकता. यासाठी वापरा या काही टिप्स

कणकेचे गोळे टाका

भाजी अथवा डाळ अति खारट झाली असेल तर तुम्ही त्या ग्रेव्हीत मळलेल्या कणकेचे लहान गोळे टाकू शकता. पीठाचे गोळे तुमच्या भाजी अथवा डाळीतून जास्तीचे मीठ शोषून घेतील. मीठाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमची ग्रेव्ही अथवा डाळ पुन्हा खाण्यासाठी योग्य होईल. मात्र वीस ते तीस मिनीटांनी पीठाचे गोळे पुन्हा बाहेर काढण्यास विसरू नका.

उकडलेला बटाटा टाका

भाजी अथवा डाळीतील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा हा सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. अशा भाजी अथवा डाळीत एक उकडलेला बटाटा सोडून द्या. तुम्ही बटाटा सोडून त्याचे कच्चे तुकडेदेखील भाजीत सोडू शकता. बटाटा तुमच्या भाजीतील मीठ ओढून घेईल आणि भाजी पुन्हा नीट होईल. कच्चा बटाटा वापरला असेल तर तो वीस मिनीटांनी भाजीतून बाहेर काढा.

लिंबाचा रस 

भाजीचा अथवा डाळीचा खारटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ग्रेव्हीमध्ये लिंबाचा रस टाकू शकता. लिंबाच्या रसामुळे भाजीचा खारटपणा कमी होईल. भाजी काही प्रमाणात आंबट लागेल पण अति खारट नक्कीच लागणार नाही. पदार्थांमध्ये लिंबाचा रस टाकून खाण्यामुळे पदार्थ शुद्ध होतो आणि पचनासाठी योग्य होतो. त्यामुळे लिंबाचा रस टाकणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.

कोमट पाणी

पातळ रस्सा भाजी करणार असाल अथवा डाळ असेल तर त्यातील मीठाचे प्रमाण संतुलित करण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे त्यात कोमट पाणी टाकणे. असं केल्याने भाजी अथवा डाळीचं प्रमाण वाढेल पण खारटपणा नक्कीच कमी होईल. 

ब्रेडचे तुकडे

भाजी अथवा डाळीतील खारटपणा कमी करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकू शकता. कारण ब्रेड त्या भाजी अथवा डाळीतील मीठ ओढून घेईल आणि ग्रेव्हीचा खारटपणा कमी होईल.

भाजलेलं बेसन

सुकी भाजी असेल तर अशा वेळी वर दिलेले उपाय करणं शक्य नाही. मात्र जर तुम्ही भाजीत वरून भाजलेले बेसन पेरलं तर भाजीची चव वाढेल शिवाय तिचा खारटपणा कमी होईल. तुम्ही ग्रेव्हीमध्येही रोस्ट केलेलं बेसन वापरू शकता. 

दही 

दही टाकून तुम्ही कोणत्याही पदार्थामधील खारटपणा कमी करू शकता. मीठच नाही तर भाजी अति तिखट असेल तर तिखटपणाही यामुळे कमी होतो. यासाठी भाजीत अशा वेळी एक ते दोन चमचे दही मिसळा. 

logo
marathi.freepressjournal.in