उशिरापर्यंत फोन वापरणे धोकादायक; एपिलेप्सीचा धोका! मोबाइलचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक, आरोग्यतज्ज्ञांचे मत

अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला असून, बहुतांश व्यक्ती हे गरजेपेक्षा जास्त वापर करतात
उशिरापर्यंत फोन वापरणे धोकादायक; एपिलेप्सीचा धोका! मोबाइलचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक, आरोग्यतज्ज्ञांचे मत

जव्हार : हल्ली मोबाईलचा वापर हा मनोरंजनासाठी अधिक होऊ लागला आहे, लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांना या इवल्याशा खेळण्याने खिळवून ठेवले आहे, मात्र रात्र उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे एपिलेप्सी या आजाराचा धोका संभवण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात येत आहे.

अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला असून, बहुतांश व्यक्ती हे गरजेपेक्षा जास्त वापर करतात. उशिरापर्यंत स्क्रीनवर वेबसीरिज पाहणे, रील्स पाहणे यामुळे अपस्मार अर्थात एपिलेप्सीचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या आजाराकडे लक्ष वेधले जात आहे.

वारंवार झटके येणे, कुठेही आणि कधीही झटका येणे हे एपिलेप्सी मेंदूच्या आजाराचे लक्षण आहे. या आजाराची विविध कारणे असून, सुमारे ७० टक्के केसेसमध्ये योग्य आणि वेळेत औषधोपचार घेतले, तर आजार नियंत्रणात राहतो. परंतु, अनेकजण प्रारंभी या आजाराकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, आजार वाढत जातो आणि नंतर संबंधित रुग्ण उपचाराला अपेक्षित प्रतिसाद देत नाही. त्यामुळे एपिलेप्सी आजाराची प्राथमिक स्वरूपात लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच मोबाइलचा वापरही गरजेपुरताच करावा, अतिवापर धोकादायक ठरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

एपिलेप्सी किंवा अपस्मार आजार म्हणजे काय?

कुठेही आणि कधीही झटका येणे, वारंवार झटका येणे ही सर्वसामान्य लक्षणे एपिलेप्सी किंवा अपस्मार आजाराची आहेत. या आजाराची विविध कारणे आहेत आणि सुमारे ७० टक्के केसेसमध्ये योग्य औषधोपचारांनी हा आजार नियंत्रणात राहतो.

कोणती काळजी घ्यावी

झोपेच्या वेळा पाळणे: रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा

पाळणे गरजेचे आहे. तसेच पुरेशी झोप घ्यावी.

स्क्रीनमुळे झोपेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करणे आवश्यक आहे.

रात्री उशिराची वेबसीरिज नको : अलीकडे अनेकजण रात्रीच्या वेळेस वेबसीरिज पाहतात. त्यामुळेही एपिलेप्सी किंवा अपस्मारचा धोका वाढतो.

या सवयी पडू शकतात महाग?

उशिरापर्यंत वेबसीरिज पाहणे : अनेकजण रात्री उशिरापर्यंत वेबसीरिज पाहतात. त्यामुळे झोप पुरेशी होत नाही.

मोबाईल जवळ घेऊन झोपणे :

सध्या बहुतांश जणांना रात्री झोपतानाही मोबाईल जवळच हवा असतो.

हे चुकीचे आहे.

अपुरी झोप घेणे : अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यासाठी झोप पुरेशी घ्यावी.

अलीकडच्या काळात मोबाईलचा अतिवापर होत आहे. काही जण तर रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर वेबसीरिज, रील्स पाहतात. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. परिणामी, एपिलेप्सी आजाराचा धोका वाढतो. वारंवार झटके येणे, कधीही आणि केव्हाही झटके येऊ शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच स्क्रीन टाइम कमी करावा. -डॉ. कल्पेश पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

logo
marathi.freepressjournal.in