विनोदकुमार शुक्ल : कवितेची उंची वाढवणारा महाकवी

कोणत्याही पुरस्काराची उंची वाढवणारा लेखक म्हणजे विनोद कुमार शुक्ल. तिसरा डोळा लाभलेला हा लेखक दैनंदिन वास्तवाचे रूपांतर जादुई वास्तवात करतो आणि वरकरणी निरागस वाटणाऱ्या जगातील क्रूरता दाखवतो. आजच्या वास्तवात त्यांना ज्ञानपीठसारखा सर्वोच्च सन्मान मिळणे महत्त्वाचे आहे.
विनोदकुमार शुक्ल : कवितेची उंची वाढवणारा महाकवी
एक्स @vikas_mani_1
Published on

- दखल

- विकास पालवे

कोणत्याही पुरस्काराची उंची वाढवणारा लेखक म्हणजे विनोद कुमार शुक्ल. तिसरा डोळा लाभलेला हा लेखक दैनंदिन वास्तवाचे रूपांतर जादुई वास्तवात करतो आणि वरकरणी निरागस वाटणाऱ्या जगातील क्रूरता दाखवतो. आजच्या वास्तवात त्यांना ज्ञानपीठसारखा सर्वोच्च सन्मान मिळणे महत्त्वाचे आहे.

आधुनिक हिंदी काव्यविश्वातील विनोद कुमार शुक्ल हे एकमेव असे कवी आहेत ज्यांच्या काव्यात कोणतीही पूर्वपरंपरा थेटपणे दिसून येत नाही. इतकंच नाही तर त्यांनी ज्या अनवट शैलीत कविता लिहिल्या आहेत त्या काव्यशैलीची वेगळी परंपराही रुजलेली दिसत नाही. त्यामुळे स्वत:ची शैली, भाषा, निरीक्षणांतील मार्मिकता असलेली विनोद कुमार शुक्ल यांची कविता हिंदी काव्यविश्वात स्वतंत्र असं स्थान पटकावून आहे, असं म्हणायला हरकत नाही. कन्स्तन्तीन पऊतोव्स्की या लेखकाने त्याच्या ‘अ बुक अबाऊट आर्टिस्ट’ - (A Book About Artists) या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. फ्रेंच चित्रकार क्लॉद मोने जेव्हा लंडनला गेला तेव्हा त्याने आपल्या चित्रांत वेस्टमिन्स्टर ॲबे परिसर हा भाग रंगवला. ही चित्रं प्रदर्शनात मांडली गेली तेव्हा ती पाहून लंडनमधील अनेक नागरिक क्षुब्ध झाले. या भागातील धुकं करड्या रंगाचं असतं अशी त्यांची समजूत होती. पण मोने याने आपल्या चित्रांत ते जांभळ्या रंगांत रंगवलेलं होतं. त्यामुळे काही नागरिक चिडले. त्यातल्या काहींनी नंतर बारकाईने या धुक्याचं निरीक्षण केलं तेव्हा प्रथमच त्यांच्या लक्षात आलं की हे धुकं जांभळ्या रंगाचंच आहे. त्यानंतर प्रत्येकजण मोनेच्या नजरेतून धुक्याकडे पाहू लागला. मोनेच्या चित्रांनी लोकांची धुक्याकडे पाहण्याची नजर बदलून टाकली होती. शुक्ल यांच्या अनेक कवितांत अशाच प्रकारे दैनंदिन जगण्याच्या धबडग्यात ज्या गोष्टी सहज दृष्टिआड होतात किंवा पाहूनही नीट पाहिल्या जात नाहीत अशा गोष्टींची ‘नवी ओळख’ करून दिली जाते.

काही समीक्षक ‘हा भाषिक चमत्कृती करणारा आणि कल्पनेच्या जगात वावरणारा कवी आहे’ अशी जी टीका करतात ती काही तितकीशी योग्य वाटत नाही. पुढे त्यांच्या कवितांचं केलेलं विश्लेषण वाचून हा कवी भूमीवर पाय घट्ट रोवून उभा आहे आणि आपल्या कवितांतून अवतीभोवतीच्या वास्तवालाही प्रतिसाद देतो, हे लक्षात येईल. भाषिक चमत्कृतीच्या बाबतीत त्यांनीच एका मुलाखतीत म्हटलं होतं, की ‘कोणत्याही लेखकाचा शब्दांशी खेळण्याचा संबंध प्रस्थापित होतच नाही, संघर्ष करण्याचा संबंध मात्र प्रस्थापित होतो.’ त्यांच्यावर हे जे आरोप केले जातात त्यांची मुख्य कारणं म्हणजे शुक्ल कोणत्याही साहित्यिक राजकारणात तसेच रस्त्यावर उतरून विरोध करण्याच्या फंदात पडत नाहीत, आपल्या कवितांतून कधीही आक्रमक सूर लावत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की, ‘साहित्याला साहित्यच राहू द्या... लेखकाने झेंडा घेऊन रस्त्यावर उतरावं अशी अपेक्षा त्याच्याकडून करू नये. त्याचा झेंडा साहित्यात आहे... मी डॉट पेन उचलू शकतो, झेंडा उचलून काय करणार?’

‘लाऊड कवितांच्या’बाबतीतही त्यांचं स्वत:चं असं खास निरीक्षण आहे, की ‘तुम्ही कितीही लाऊड झालात तरी जो बहिरा आहे तो बहिराच राहणार आहे. त्याला तर काही ऐकू जाणार नाही. ज्यांना थोडं तरी ऐकू येतंय आणि जे ऐकू इच्छितात ते साधं पुटपुटणंही ऐकतील.’ त्यांच्या समग्र कविता या एखाद्या माणसाशी केलेल्या आत्मीय हितगुजासारख्या आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या काही कविता आकलनास अगदी कठीण वाटाव्यात अशा होत्या. त्यांच्या कवितांतील दुर्बोधता त्यांतील आशय वा प्रतिमाविश्वामुळे निर्माण होत नसे, तर हा आशय ते ज्या तिरकस शैलीत मांडत त्यामुळे त्या वाचकाला आव्हानात्मक वाटत असत. अतिपरिचित, नेहमीच्या घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहणं आणि त्या निरनिराळ्या पद्धतीने कवितेतून आविष्कृत करणं हे त्यांच्या काव्याचं खास वैशिष्ट्य आहे. ते ‘आकाश की तरफ’ या कवितेत लिहितात, ‘आकाशाच्या दिशेने चाव्यांचा जुडगा फेकला तर आकाश उघडलं.’ त्यांना या उघडलेल्या आकाशात बॉम्ब फेकणारी पाच विमानं दिसतात. ही कविता १९६५ साली लिहिली आहे. त्या काळच्या युद्धग्रस्त वास्तवाला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ‘बहुत आसान है...’ या कवितेत रात्रीचं वर्णन करताना लिहितात, की सबंध रात्र बाहेर फक्त अंधारच असतो. दिवसासारखे त्यात ऊन, मग थोड्या वेळाने सावली असे विविधरूपी टप्पे नसतात, तर फक्त काळोखच पसरलेला असतो. हे रात्र या विषयीचं वर्णन इतर कोणत्याही कवितांतील वर्णनांपेक्षा निश्चितच वेगळं आहे. पॅलेस्टाइनमधील कवी महमूद दारविश याने त्याच्या ‘अ रिव्हर डाईज् ऑफ थस्ट’ (A River Dies of Thirst) या डायरीत एके ठिकाणी लिहिलं आहे की, ‘कवी जर आकाश निरभ्र आणि बगीचा हिरवागार आहे असं म्हणत असेल तर आपल्याला कवितेची काय गरज आहे?’ ‘अतिरिक्त स्पष्टपणा’ हा कवितेचा मुख्य दोष आहे असं त्याला वाटतं. कवितेने प्रतिमा, रूपकं यांच्या सहाय्याने बऱ्याच गोष्टी सुचवायच्या असतात. शुक्ल यांच्या समग्र कविता याच कोटीतील आहेत. कोणतीही गोष्ट वेगळे प्रतिमाविश्व आणि शब्दसंयोजनातून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे, याचा प्रत्यय त्यांची कोणतीही कविता वाचली तरी येतो. आपलं घर आणि शेजारपाजारची माणसं यांविषयी त्यांना इतकी आत्मियता वाटते की, ‘आपण कधीही संन्यास घेणार नाही’ असं ते ‘घर-बार छोड़ कर...’ या कवितेत लिहितात. आपल्या आसपासच्या लोकांशी जडलेली ही आपलेपणाची भावना आणि समूहात राहण्याची ओढ ते ‘अब कभी मिलना’, ‘अपने असीम में’, ‘संसार छोड़ दूँगा...’, ‘रहा’, ‘यहाँ सभी’, ‘बहुत रह लिया...’ ‘हम सब एक...’, ‘जब बाढ़ आई’ अशा अनेक कवितांत व्यक्त करतात. आपल्या मृत्यूनंतरही जीवनाचा प्रवाह आटणार नाही आणि ही पृथ्वी पुढच्या पिढ्यांना सुंदर जीवन जगता यावं अशा पद्धतीने सुपूर्द करून निघून जायचंय अशी नम्र जाणीव बाळगून जगण्याचा आग्रह त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतो.

ते एकाच कवितेत अनेक शक्यतांनी भरलेल्या बहुरंगी आयुष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे परस्परविरोधी वाटाव्यात अशा ओळी बऱ्याचदा कवितांत येतात. उदाहरणार्थ, ‘जहाँ पहाड़ है...’ या कवितेत ते लिहितात की, ‘एक शिखर वहाँ कहीं पहुँचने की इच्छा का है/एक शिखर वहाँ कहीं नहीं पहुँच सकूँगा का है.’ कवी अनेक शिखरं पाहतोय. त्यांपैकी एखाद्या शिखरावर जाण्याची इच्छा आहे, तर एखाद्या शिखरावर कधीच जाऊ शकणार नाही याची जाणीव आहे. जीवनात अनेक गोष्टी आपण प्राप्त करतो, काहींची इच्छा असूनही त्या दुष्प्राप्य राहतात तर ते स्वीकारण्याचा समंजसपणा उपरोक्त ओळींतून सुचवलेला आहे. जेव्हा परस्परविरोधी, परस्परांना छेद देणाऱ्या ओळी येतात तेव्हा त्यामागे कवीचा अनिश्चित, अतर्क्य गोष्टींनी भरलेल्या जीवनाचा परिचय करून देण्याचा हेतू असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशाच प्रकारची आणखी एक कविता आहे, ‘पंजाब के किसी...’ या कवितेत शुक्ल लिहितात की, ‘पंजाबमधल्या कोणत्याही गावात/कोणी ना कोणी येतच असतं/ खून करणारे आधी कधी नव्हते आले/ तर तेही आले/ सरतेशेवटी नाही येणार.’ यातल्या शेवटच्या दोन ओळी अर्थदृष्ट्या एकमेकांना छेदणाऱ्या आहेत. पहिल्या ओळीत भीषण वास्तव आहे आणि पुढल्याच ओळीत चांगलं घडण्याचा आशावादही आहे.

ते नेहमीच्या साध्यासुध्या वाटणाऱ्या घटनांना समाज, संस्कृती यांच्या हजारो वर्षांच्या इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून पाहतात. त्यामुळे काळाच्या अफाटतेची जाणीव होऊन आपण स्तब्ध होतो. ‘इतिहास बीता...’, ‘आदिम रंग’ या कविता या दृष्टीने पाहता येतील. इतरही कवितांतील ‘आठव्या शतकातल्या अंधारासारखाच/अंधार पडलेला आहे’ (‘उस अधूरे...’) किंवा ‘हजार वर्षांपासून या नद्यांचे पाणी वाहते आहे’ (‘हजार वर्ष...’) अशा काही ओळींतून लक्षात येतं की या कवीच्या जाणिवांत निरंतर वाहत राहणाऱ्या जीवनप्रवाहाची, सातत्याची जाणीव सदैव जागृत असते. आपण आधीच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अनेकानेक गोष्टींशी संबद्ध आहोत हे हा कवी कधीही विसरत नाही.

सर्वसाधारण माणसं, कष्टकरी समुदाय यांचं रोज नव्या आकांक्षा मनात घेऊन संघर्ष करत जगणं शुक्ल यांनी आपल्या कवितांमध्ये नोंदलेलं आहे. ‘मजदुरो उस तरफ’ ही कविता मजुरांच्या दयनीय स्थितीचं निराळ्या पद्धतीने एका घटनेच्या अनुषंगाने चित्रण करते. ‘लगभग जयहिन्द’ या कवितेत निम्न मध्यमवर्गीय परिवारातील बेरोजगार असलेल्या एकतीस वर्षांच्या तरुणाचं चित्र रेखाटलं आहे आणि त्याच्या निमित्ताने या वर्गातील माणसांच्या जगण्यातील अभावग्रस्तता, गरिबी तसेच वरच्या वर्गातील माणसांचं सुखासीन जगणं चित्रित केलं आहे.

‘शरारतन मैंने...’ ही दीर्घकविता केवळ आकाराने मोठी आहे असं नाही, तर मुक्तिबोधांनी ज्या काही चांगल्या दीर्घ कविता लिहिल्या आहेत त्यानंतरची हिंदी कवितेतील ही सर्वश्रेष्ठ दीर्घकविता आहे. या कवितेतील दृश्यचित्रण, प्रतिमाविश्व, सामान्य मजुरांविषयीची संवेदनशीलता, त्यांच्या जीवनातील संघर्ष, अनंत अडचणींनी घेरलेलं असतानाही त्यांच्या मनात त्यांनी टिकवून धरलेला ओलावा, कवीचं हताश न होता पुन्हा उभं राहणं हे सारं संमोहित करणाऱ्या ‘शुक्लीय’ शैलीत समोर येतं. कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांविषयी लिहिताना तो उपरोधिकपणे लिहितो की, ‘कामगारांकडे खायला काही असो वा नसो, पण खाण्याची सुट्टी मात्र रोज होते.’ धोबिणींचं काम करणारी कामगाराची पत्नी बराच वेळ रडत असणाऱ्या बाळाला दूध पाजायला बसते तेव्हा ते बाळ ‘आईच्या स्तनाग्रावर ओघळणाऱ्या घामाचा स्वाद आधी चाखतं आणि मग दुधाची चव घेतं’ असं लिहून त्यांच्या गरीब, कष्टदायी जगण्याचा परिचय कवी घडवतो. आजच्या काळात कविता लिहिणारा कोणताही कवी हा जातीय-धार्मिक दंगलींवर व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. बाबरी मशीद विध्वंस व नंतर उसळलेल्या दंगली तसेच २००२ साली गुजरात राज्यातील नरसंहार या घटनांवर हिंदीत अनेक चांगल्या कविता लिहिल्या गेल्या आहेत. शुक्ल यांच्या ‘अगर रोज कर्फ्यू...’, ‘गुजराती मुझे नहीं आती’ अशा काही कविता अप्रत्यक्षपणे गुजरातमधील घटनेवरच बेतलेल्या आहेत. ‘दंगे के दिन...’ ही कविता परधर्मीयांचा द्वेष आणि हत्या करण्याची जी खुनशी मानसिकता समाजमनात रुजवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला छेद देणारी आहे. दंगलीत ‘आपण जर मुसलमानाच्या हाती मारले गेलो तर आपल्याला हिंदू समजू नये मुसलमानच समजावं आणि हिंदूंच्या हाती मारले गेलो तर हिंदूच समजावं’ असं लिहून कवी आपल्या अभिव्यक्तीतील निराळेपणाचा प्रत्यय देतो.

लेखाच्या सुरुवातीला महमूद दारविश यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, त्यात ते एके ठिकाणी लिहितात की, ‘A great poet is one who makes me small when I write, and great when I read.’ विनोद कुमार शुक्ल हे असे कवी आहेत ज्यांच्या कवितांच्या अस्तित्वामुळे आपण लिहायला बसल्यावर आपल्याला आपल्या ‘लघुत्वाची’ जाणीव होते आणि त्यांच्या कविता वाचल्यावर आपण ‘समृद्ध’ होतो. त्यांच्या बहुतांश कविता वाचताना आपण एखाद्या स्वप्नप्रदेशात भटकतो आहोत असं वाटतं. एखादी कविता वाचून संपते तेव्हा त्या स्वप्नप्रदेशातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटून अगदी एकटं, ओकंबोकं वाटू लागतं. मनाला पुन्हा पुन्हा त्या स्वप्नप्रदेशात शिरण्याची ओढ लागते.

त्यांच्या थोड्याफार कविता जरी चांगल्या अनुवादातून अहिंदी भाषिकांपर्यंत त्यांच्या त्यांच्या भाषांत पोहोचल्या तरी ‘सजग’ वाचक त्यांच्या इतर कवितांचा शोध घ्यायला सुरुवात करतील. अशा सकस कविता लिहिणाऱ्या प्रतिभावान कवीचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान होणं हे एका प्रकारे त्यांच्या लेखकीय कारकीर्दीची यथोचित नोंद घेणं आहे.

साहित्याचे अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in