Blood Donation: रक्तदान करायचे आहे? आधी 'या' गोष्टी जाणून घ्या

रक्तदान करण्यासाठी पात्र असलेल्या १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकसंख्येतील कमीत कमी एक टक्का लोकांनी जरी रक्तदान केले तरी भारत रक्ताच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकेल.
Blood Donation: रक्तदान करायचे आहे? आधी 'या' गोष्टी जाणून घ्या

गरज असेल तेव्हा तातडीने रक्त व रक्तातील घटक उपलब्ध होणे किती महत्त्वाचे असते हे आपण सर्वजण जाणतो. सुरक्षित रक्त आणि रक्तातील घटकांचा पुरेसा पुरवठा नसणे ही भारतासह अनेक विकसनशील देशांची खूप मोठी समस्या आहे. रक्तदान करण्यासाठी पात्र असलेल्या १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकसंख्येतील कमीत कमी एक टक्का लोकांनी जरी रक्तदान केले तरी भारत रक्ताच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकेल. देशभरातील स्वयंसेवी संस्था आणि रुग्णालये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात पण तरीही भारतामध्ये सेंट्रलाइज्ड रजिस्ट्री किंवा राष्ट्रीय व राज्य स्तरावर दुर्मिळ रक्तगटांची माहिती उपलब्ध नाही हे एक खूप मोठे आव्हान आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे कन्सल्टन्ट, ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी व इम्युनोजेनेटिक्स, डॉ राजेश सावंत यांच्याकडून...

रक्ताची सुरक्षितता दोन गोष्टींवरून निश्चित केली जाते, त्यापैकी एक म्हणजे रक्ताच्या सुरक्षिततेविषयी दात्याला असलेली माहिती आणि जागरूकता. हे जाणून घेण्यासाठी रक्तदात्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाते, त्यामध्ये रक्तदाता आपली वैद्यकीय माहिती, आरोग्यासाठी धोकादायक अशा सवयी आणि अवैधपणे सुई टोचून घेतली आहे का अशी वेगवेगळी माहिती देतो. दान करण्यात आलेल्या रक्तामार्फत संसर्ग पसरण्याचा धोका दूर केला जावा हा यामागचा उद्देश असतो. दान करण्यात आलेल्या रक्ताची तपासणी करणारी व्यवस्था देखील महत्त्वाची असते कारण दान करण्यात आलेल्या रक्तामधून पसरणारे आजार ही आपल्या देशासमोरील एक मोठी समस्या असून आपल्या देशाच्या एकंदरीत आरोग्यासाठी धोका आहेत.

बहुसंख्य लोकसंख्येचे रक्तगट ए, बी आणि ओ असतात, ते एकतर आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात. ए, बी आणि आरएच व्यतिरिक्त माहिती असलेल्या ४५ ब्लड ग्रुप सिस्टिम्स आणि ३६० अँटीजेन आहेत. रक्तगट हे वेगवेगळ्या वांशिक गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वितरित करण्यात आलेले असतात त्यामुळे एकसमान रक्त प्रकारचा रक्तदाता मिळणे हे खूप मोठे आव्हान असते. दुर्मिळ रक्त दाता फेनोटाईप १००० मध्ये १ असतो आणि यामध्ये हाय-फ्रिक्वेन्सी-अँटीजेन-निगेटिव्ह व मल्टिपल-कॉमन-अँटीजेन-निगेटिव्ह रक्तगटांचा समावेश असतो. आरएच नल (Rhnull), बॉम्बे (ओएच) आणि कोल्टन नल फेनोटाईप हे काही दुर्मिळ रक्तगट आहेत. दुर्मिळ दाता रक्त युनिट्सची कमतरता पडू नये यासाठी दान करण्यात आलेल्या लाल रक्तपेशी भविष्यात उपयोगात आणण्यासाठी गोठवून ठेवता येतात. दुर्मिळ रक्त दात्यांची बिनचूक माहिती उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून दुर्मिळ रक्त गट असलेल्या रुग्णांना रक्त तातडीने उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांचे प्राण वाचू शकतील.

थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग, हिमोफिलिया इत्यादी आजारांनी त्रस्त व्यक्तींना दर १५ दिवसांनी रक्त चढवणे गरजेचे असते. अशा रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत/हेमोलिटिक रिऍक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि फक्त बेसिक रक्त गट जुळवणी करण्याबरोबरीनेच आरबीसी फेनोटाईप खूप महत्त्वाचे असते.

फेनोटाईप निगेटिव्ह रक्त मिळवण्यासाठी रुग्णांना वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागण्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या टर्शरी केयर संस्थांमध्ये सर्व दात्यांचे फेनोटाइप करणे व त्यांची माहिती नोंदवून ठेवणे खूप आवश्यक आहे. असे केलेले असल्यास, ज्या रुग्णांना या रक्ताची गरज आहे त्यांना तातडीने रक्त पुरवता येऊ शकते.

नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल (NBTC) ही समर्पित संस्था आणि रक्तदानाविषयी एकीकृत धोरण असलेला भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक देश आहे. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलनुसार, आपल्या देशामध्ये रक्त बँकिंग व्यवस्थेला हानिकारक ठरणारी मोठी समस्या म्हणजे तिचे विस्कळीत व्यवस्थापन आहे. या व्यवस्थेचा दर्जा राज्याराज्यांमध्ये, शहराशहरांमध्ये आणि एकाच शहरातील वेगवेगळ्या केंद्रांमध्ये वेगवेगळा आहे. ही व्यवस्था मजबूत करणे ही व्यावसायिकांची आणि सर्वसामान्य जनतेची देखील जबाबदारी आहे. रक्तदानाचा उद्देश आणि प्रक्रिया समजून घेणे हा या जबाबदारीचा मोठा भाग आहे. रक्तदानासंबंधीच्या काही सर्वोत्तम प्रथांची चर्चा वर करण्यात आली आहे, व्यवस्थेमध्ये सेंट्रलाइज्ड स्तरावर त्यांचा समावेश करून रुग्णांना रक्तसंक्रमणात मदत प्रदान करणे शक्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in