
डोळ्यांमुळे आपण या सुंदर सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो. मात्र, आजच्या जीवनशैलीत सातत्याने लॅपटॉप, कॉम्प्यूटरवर बसून काम करणे त्यानंतर मनोरंजनासाठी टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनवर सातत्याने काही ना काही पाहत राहणे यामुळे डोळ्यांना गंभीर थकवा जाणवू शकतो. तसेच दृष्टीदोष संभवू शकतात. काही अभ्यासानुसार लहानांपासून प्रौढांपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक Digital Eye Strain ने ग्रस्त आहेत. जाणून घेऊया काय आहे Digital Eye Strain, कारणे आणि उपाय...
Digital Eye Strain म्हणजे काय?
लॅपटॉप, कॉम्प्यूटर स्क्रीन, मोबाईलवर खूप जास्त वेळ काम केल्याने किंवा स्क्रीनसमोर डोळ्यांचा अतिवापर केल्यामुळे सामान्यपणे डोळ्यांवर निर्माण होणारा ताण याला Digital Eye Strain किंवा कॉम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतात. मंद प्रकाशात किंवा अत्यंत तेजस्वी किंवा चमकदार वातावरणात पाहण्यास अडचण आल्याने देखील डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
Digital Eye Strain कोणकोणते त्रास होतात
Digital Eye Strain मुळे डोळ्यांवर ताण तर येतोच यामुळे तुमचे डोळे खूप जास्त थकल्यासारखे जाणवते. डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना जळजळ होणे डोकेदुखी, मानदुखी आणि सांधेदुखी असे त्रास देखील होतात. याशिवाय बायनोक्युलर व्हिजन डिसफंक्शन (BVD) सारखी गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकते.
Digital Eye Strain डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?
स्क्रीन टाईम सेट करा
डिजिटल आय स्ट्रेनपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी स्क्रीन टाईम सेट करणे सर्वोत्तम उपाय आहे. दिवसातील काही वेळ असा द्या जेव्हा तुम्ही स्क्रीनपासून लांब राहाल. जितका जास्त वेळ तुम्ही स्क्रीनवर द्याल तेवढा जास्त डोळ्यांवर ताण येणार. त्यासाठी स्क्रीन टाईम सेट करणे, हे सगळ्यात प्रभावी असू शकते.
२०-२०-२० चा नियम पाळा
आत्ताचे युग डिजिटल युग आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनला पाहावेच लागते. मात्र यावर २०-२०-२० चा चांगला प्रभावी उपाय आहे. सामान्यपणे दर २० मिनिटांनी स्क्रीनवरून नजरा काढून २० फूट अंतरावर किमान २० सेकांदासाठी पाहा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
डोळे मिचकावणे
स्क्रीनकडे एकटक न पाहता पापण्याची हालचाल करणे चांगले असते किंवा डोळ्यांना मिचकावणे चांगले असते. स्क्रीनसमोर काम करताना डोळे मिचकावल्याने डोळे कोरडे पडत नाही. डोळ्यांमध्ये ओलसरपणा टिकून राहतो. त्यामुळे डोळे निरोगी राहतात.
स्क्रीन आणि डोळ्यांमध्ये अंतर ठेवा
अनेक जणांना मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन खूप जवळ घेऊन पाहायला आवडते. सामान्यपणे तुमचे डोळे स्क्रीनपासून किमान १८ ते २४ इंच अंतरावर असायला हवे.
बसण्याची स्थिती
कॉम्प्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनसमोर बसताना योग्य ते आसन घेऊन बसावे. तुमच्या मानेची, कंबरेची आणि पाठीची पोझिशन ही ताठ असावी. यामुळे मान, कंबर आणि पाठीवर ताण पडणार नाही.
नेत्ररोगतज्ज्ञांशी संपर्क साधा
डोळ्यांना खूप जास्त त्रास होत असेल तर लवकरात लवकर नेत्ररोगतज्ज्ञांकडून डोळ्यांची चिकित्सा करून घेणे योग्य राहील.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)