
डिजिटल युगात आपण सगळे जगत आहोत. त्यामुळे तासनतास स्क्रीनवर वेळ घालवतो. परिणामी डोळ्यांवर ताण येतो. याला डिजिटल आय स्ट्रेन किंवा डोळ्यांवरील डिजिटल ताण असे म्हणतात. यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यापैकीच एक म्हणजे मायोपिया हा आहे. मायोपिया म्हणजे नेमकं काय? का होत आहे हा आजार वेगाने? काय आहेत उपाय? जाणून घेऊया सविस्तर...
मायोपिया Myopia म्हणजे काय?
मायोपिया ही डोळ्यांची अशी स्थिती आहे. ज्यामध्ये व्यक्तीला लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. तर केवळ जवळची वस्तू त्याला स्पष्ट दिसत होती. विशेष करून हा आजार लहान मुलांना जास्त प्रमाणात होत आहे.
Digital Eye Strain म्हणजे काय?
लॅपटॉप, कॉम्प्यूटर स्क्रीन, मोबाईलवर खूप जास्त वेळ काम केल्याने किंवा स्क्रीनसमोर डोळ्यांचा अतिवापर केल्यामुळे सामान्यपणे डोळ्यांवर निर्माण होणारा ताण याला Digital Eye Strain किंवा कॉम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतात. मंद प्रकाशात किंवा अत्यंत तेजस्वी किंवा चमकदार वातावरणात पाहण्यास अडचण आल्याने देखील डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
कोविडमुळे प्रमाण वाढले
तज्ज्ञांच्या मते कोविडमध्ये सलग लॉकडाऊनमुळे मोठ्यांसहित लहान मुलांचाही स्क्रीन टाईम वाढला आहे. त्यातच कोविडच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण वाढले. परिणामी मुले दीर्घकाळ स्क्रीनवर लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. ज्यामुळे शालेयवयातच मुलांना मायोपिया लवकर सुरू होण्याची समस्या उद्भवत आहे.
तरुण आणि प्रौढांमध्येही वाढत आहे प्रमाण
तरुण आणि प्रौढांमध्येही मायोपियाचे प्रमाण खूप वाढत आहे. कामामुळे किमान ९ तास कॉम्प्यूटर, लॅपटॉपवर घालवले जातात. त्याव्यतिरिक्त मोबाईवर आणखी तीन ते चार तास घालवतात. परिणामी एकूण १३ ते १४ तास सातत्याने स्क्रीनवर पाहत असल्यामुळे डोळ्यांवरील स्नायूंवर ताण पडतो. त्यामुळे हा आजार तरुण आणि प्रौढांमध्येही होत आहे.
काय आहेत उपाय?
मायोपियाचे प्रमाण कमी करायचे असेल तर वेळीच डोळ्यांवरील ताण कमी करणे गरजेचे आहे. यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करू शकतो.
स्क्रीन टाईम कमी करणे
डिजिटल आय स्ट्रेन कमी करण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे डोळ्यांवरील अतिरिक्त ताणाचे नियोजन होईल.
नो स्क्रीनसाठी राखीव वेळ
दिवसभरातील थोडा वेळ नो स्क्रीन म्हणून सेट करा. याचा अर्थ तुम्ही टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल असे कोणतेही डिजिटल उपकरण ठाराविक वेळेसाठी पाहणार नाही. हे करणे अत्यंत गरजेचे आहे. याचा केवळ डोळ्यांसाठीच नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)