Women Health: लाइफस्टाईलमधील 'हे' पाच बदल पन्नाशीपुढील स्त्रियांना ठरतील लाभदायक!

Women Health After Age of 50: जस जसं वय वाढत जाते, तसतसं स्त्रियांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसू लागतात.
Women Health: लाइफस्टाईलमधील 'हे' पाच बदल पन्नाशीपुढील स्त्रियांना ठरतील लाभदायक!
Freepik

Healthy Lifestyle: वयाची पन्नाशी पार केलेल्या स्त्रियांचे शरीर अनेक प्रकारच्या बदलांमधून जात असते. यात रजोनिवृत्तीचा अनुभव, हाडांची घनता कमी होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे, हृदयाचे ठोके मंदावणे, मूत्राशय कमकुवत होणे, पचनाशी संबंधित समस्या इत्यादींचा समावेश होतो. म्हणूनच या काळात स्वत:ला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे, आरोग्यासाठी उपकारक गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवणे, आहार सांभाळणे इत्यादी गोष्टी अत्यंत महत्त्वाच्‍या ठरतात. याबद्दल फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील इंटर्नल मेडिसीन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे, (डिरेक्टर) यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात.

नियमितपणे सकस आहार घ्या

वय होत जाते, तसतशा तुमच्या पोषणाच्या गरजाही बदलतात आणि अशावेळी तुमच्या शरीराला आवश्यक ती जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर पुरविणा-या पोषक घटकांची रेलचेल असलेले पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. सकस, आरोग्यदायी आहारामुळे हृदयरोग, मधुमेह आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. विविध प्रकारची फळे, भाज्या, निव्वळ प्रथिनं आणि आरोग्यास पोषक स्निग्ध पदार्थ खाणे आणि प्रक्रिया केलेल्या व फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादेत करणे योग्य ठरेल.

नियमित शारीरिक व्यायाम

पन्नाशीपुढील स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यामध्ये व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो. नियमित शारीरिक व्यायाम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, हाडे आणि स्नायू बळकट होतात आणि वजन निरोगी पातळीवर राहते. आठवड्याचे बहुतांश दिवस ब्रिस्क वॉकिंग, पोहणे, सायकलिंग किंवा योगासनांसारखे मध्यम तीव्रतेचे व्यायाम किमान ३० मिनिटे करायला हवेत. तसेच, आपापल्या आरोग्याच्या स्थितीनुसार आपण कोणता व्यायामप्रकार अनुसरावा याचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांशीही बोलता येईल.

पुरेशी झोप घ्या

आपले सर्वांगीण आरोग्य आणि स्वास्थ्य जपण्यासाठी चांगल्या दर्जाची झोप अत्यंत आवश्यक असते आणि जसजसे वय होत जाते तसतशी पुरेशी विश्रांती घेणे अधिकाधिक महत्त्वाचे बनते. वयाची पन्नाशी पार केलेल्या स्त्रियांमध्ये झोपेच्या समस्या सरसकटपणे दिसून येतात, मात्र आपल्या झोपेचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यात झोपेसाठी एक आरामदायी नियमित वेळापत्रक बनविणे, झोपण्यापूर्वी अल्कोहोल आणि कॅफिन टाळणे, झोपण्यासाठी एक सुखकारक वातावरण तयार करणे इत्यादी उपायांचा समावेश होतो.

ताणतणाव कमी करा

खूप काळापासून असलेल्या क्रॉनिक स्वरूपाच्या ताणतणावांमुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तेव्हा वय वाढत असताना मनावरील ताण कमी करण्यासाठी पावले उचलणे अत्यावश्यक आहे. ध्यानधारणा, दीर्घश्वसन, योगासने किंवा प्रियजनांसोबत वेळ घालविणे यांसारख्या मनावरील ताण कमी करणाऱ्या पद्धती तुम्ही आजमावू शकता.

नियमित आरोग्य तपासण्या

वय वाढत जाते तसतसा ब्रेस्ट कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांसारखे गंभीर आजार विकसित होण्याचा धोकाही वाढतो. मॅमोग्राम्स, बोन डेन्सिटी चाचण्या आणि कॉलेस्ट्रोलची तपासणी यांसारख्या आरोग्यतपासण्या नियमितपणे केल्यास अशा आजारांचे निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळच्यावेळी उपचार सुरू करता येतील. आपल्या डॉक्टरांशी याविषयी चर्चा करणे आणि त्यांनी तुमच्या व्यक्तिगत आरोग्य गरजांनुसार केलेल्या शिफारशींनुसार चाचण्या करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

शरीरात होणारे बदल टाळता येत नाहीत हे खरे असले तरीही त्यांचा परिणाम आणि तीव्रता नक्कीच हाताळता येते व आपल्या आयुष्यात वरील काही बदल करून तुम्ही एक निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकता.

logo
marathi.freepressjournal.in