वटवाघूळ झाडांवर उलटी का लटकतात? जाणून घ्या कारण

बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, वटवाघूळ नेहमी उलटी लटकलेली का असतात? चला जाणून घेऊया तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...
वटवाघूळ
वटवाघूळ वटवाघूळ

मुंबई: पृथ्वीवर अनेक प्रजातीचे पशुपक्षी आहेत. प्रत्येक प्रजातीचे काहीना काही वेगळेपण आहे. काही प्राणी पाण्यात राहतात, तर काही जमिनीवर...पक्षी पंखांच्या साहाय्यानं हवेत उडतात. पृथ्वीवर राहणारा असाच एक अनोखा जीव म्हणजे वटवाघूळ.

वटवाघूळ हा हवेत उडू शकणारा स्तनधारी जीव आहे. वटवाघूळांना तुम्ही अनेकदा वीजेच्या तारांना, इमारतींच्या छतावर किंवा इतर ठिकाणी उलटं लटकलेलं पाहिलं असेल. बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, वटवाघूळ नेहमी उलटी लटकलेली का असतात. चला जाणून घेऊया तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

म्हणून वटवाघूळ उलटी लटकतात-

वटवाघूळ उलटं लटकण्यामागं एक खास कारण आहे. ते उलटं लटकल्यामुळं सहजतेने उडू शकतात. वास्तविक वटवाघूळ हे इतर पक्ष्यांप्रमाणे जमीनीवरून उडू शकत नाहीत. जमिनीवरून वर उडण्यासाठी जेवढी ताकद लागते, तेवढी त्यांच्या पंखांमधून त्यांना मिळत नाही. त्यामुळं ते उंच ठिकाणी उलटं लटकतात.

याशिवाय काही लोकांच्या मनात हाही प्रश्न येतो की वटवाघूळं उलटं लटकतात, मग ती जमिनीवर पडत का नाहीत. तर त्याचं कारण त्यांच्या पायाची खास बनावट..त्यांच्या पायांच्या नसांची रचना अशी असते की ते त्यांच्या शरीराचे संपूर्ण वजन मजबूतीनं पकडू शकतात.

वटवाघूळ देत नाहीत अंडी-

वटवाघूळ अन्य पक्ष्यांप्रमाणे अंडी देत नाहीत, तर ते पिल्लांना जन्म देतात. याशिवाय ते आपल्या पिल्लांना स्तनपानही करतात. त्यामुळं त्यांना पक्षांच्या श्रेणीमध्ये ठेवले जात नाही. जगभरात वटवाघूळांच्या सुमारे एक हजारांपेक्षा जास्त प्रजाती उपलब्ध आहेत. ज्यामध्ये फ्लाइंग फॉक्स प्रजातीचे वटवाघूळ सर्वात मोठं असतं.

logo
marathi.freepressjournal.in