
चंदनाचे झाड हे भारतीय तसेच जगातही अनेक संस्कृतीत पूजनीय मानले गेले आहे. चंदनाच्या लाकडाचा गंध, लेपन, पावडर बनवणे, धूप तयार करणे इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तर दुसरीकडे सापांना देखील भारतीय संस्कृतीत पूजले जाते. त्यामुळे अनेक वेळा चंदनाच्या झाडाचा सापांसोबत सांस्कृतिक किंवा धार्मिक संबंध जोडला जातो. मात्र, साप चंदनाच्या झाडावर राहण्याची कारणे धार्मिक नाही तर पर्यावरणीय आहेत. चला जाणून घेऊया अखेर का साप चंदनाच्या झाडाला लिपटून राहतात.
जीवो जीवस्य जीवनम् या तत्वावरच पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. चंदनाचे झाड आणि साप यांचाही संबंध पर्यावरणीय संतुलनाशी आहे. चंदनाचे झाड सुगंधी असते. मात्र, साप या सुगंधामुळे चंदनाच्या झाडापाशी नसतात. तर चंदनाचे झाड हे नैसर्गिकरित्या सापांना जगण्यासाठी पोषक वातावरण देते. त्यामुळे चंदनाच्या झाडाजवळ साप आढळून येतात. (Sandalwood Tree & Snakes)
थंडपणा आणि सावली
चंदनाचे झाड त्याच्या दाट पानांसाठी आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते. सापांना थंड आणि ओलसर जागा आवडतात, कारण त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. चंदनाच्या झाडाची सावली आणि थंडपणा यामुळे ते सापांसाठी एक परिपूर्ण ठिकाण बनते, विशेषतः उन्हाळ्यात.
शिकार उपलब्धता
चंदनाच्या झाडांभोवती उंदीर, सरडे आणि कीटक यांसारखे छोटे प्राणी सहज आढळतात. या प्राण्यांना साप शिकार करतात. म्हणून, साप चंदनाच्या झाडांभोवती राहणे पसंत करतात, कारण त्यांना येथे सहज शिकार मिळते.
सुरक्षित जागा
चंदनाच्या झाडाची मुळे आणि दाट पाने सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करतात. त्यांच्या भक्षकांपासून वाचण्यासाठी, साप अशा जागा निवडतात जिथे ते सहज लपू शकतील. चंदनाच्या झाडाची रचना त्यांना ही सुविधा प्रदान करते.
छद्मवेश
चंदनाच्या झाडांच्या दाट पानांमुळे सापांना सहजरित्या लपणे शक्य होते. किंबहुना ते या पानांच्या आडोशाने छद्मवेश धारण करू शकतात. त्यामुळे उंदीर आणि अन्य किटकांना सापाचे अस्तित्व ताबडतोब समजत नाही. याचा फायदा सापाला शिकार करताना होतो.
परिसंस्थेचा समतोल
चंदनाची झाडे आणि साप यांच्यातील संबंध हा पर्यावरणाचा एक भाग आहे. चंदनाच्या झाडाभोवतीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यास साप मदत करतात. ते लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित करतात, ज्यामुळे झाड आणि आजूबाजूच्या वनस्पतींना होणारे नुकसान टाळता येते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)