श्रावण महिन्याला सोमवार ५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. अनेकजण श्रावण महिन्यात धार्मिक कारणांमुळे मांसाहाराचा त्याग करतात. हिंदू धर्मात या महिन्यात जेवणासंबंधित अनेक नियम पाळले जातात. हिंदू लोक या महिन्यात शक्यतो मांसाहार करणं टाळतात. मात्र यामागचं नेमकं वैज्ञानिक कारण खूप कमी जणांना माहित असतं.
श्रावण महिन्यात मांसाहार पचण्यास लागतो वेळ :
श्रावण महिना म्हणजे पावसाळी महिना. या महिन्यात सूर्याची किरण खूप कमी वेळ असतात, पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते. यामुळे पाचन अग्नि मंद होते. परिणामी मांसाहार पदार्थ पचण्यास जास्त वेळ लागतो. पाचन अग्निमध्ये सम आणि मंद अशा २ प्रकारच्या अग्नि असतात. सम अग्निमध्ये शरीर जेवण पचवण्यास ५ ते ६ तास घेते. तर मंद अग्नि असल्यावर जेवण पचवण्यास ७ ते ८ तासांचा वेळ लागतो. श्रावण महिन्यात पचनक्रिया मंद झाल्याने मांसाहारी पदार्थ हे आतड्यांमध्ये जाऊन बसतात. परिणामी जेवण लवकर न पचल्यामुळे आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, श्रावण महिन्यात या कारणांमुळे मांसाहार टाळून शाकाहारी पदार्थांचेच सेवन करावे.
श्रावण महिन्यात पाण्याचे स्रोत हे जास्त प्रमाणात प्रदूषित आणि संक्रमित होतात. त्यामुळे या दिवसात मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रदूषित पाण्यात असणाऱ्या माशांचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच वातावरणात आर्द्रता असल्याने संसर्ग पसरण्याची जास्त भीती असते. हा संसर्ग जनावरांना सुद्धा होऊ शकतो त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो.
माशांचा प्रजनन काळ :
पावसाळा हा जलचर जीवांचा प्रजनन काळ असतो. जर तुम्ही या ऋतूमध्ये जलचर जीवांचे सेवन केले तर त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात माणसांची पचनक्रिया ही मंद होते, अशावेळी मांसाहार पचण्यास अडचण निर्माण होते. तसेच मांसाहारासोबतच श्रावण महिन्यात कारल, वांग, मुळा, दही आणि सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)