World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

Importance of World Bee Day: दरवर्षी २० मे रोजी संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो.
World Bee Day
Pixabay

- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे 

History of World Bee Day: आज २० मे, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञाचा २० मे १७३४ रोजी स्लोव्हनिया या देशातील गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपात पहीले मधमाशी पालन केंद्र सुरू केले. १७७१ मध्ये त्यांनी मधुमाशीपालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे २०१८ पासून २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला.

का साजरा केला जातो हा दिवस?

या दिवशी मधमाशांचे संवर्धन करण्यासह कीटकांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली जाते. मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे.

मनोरंजक तथ्य

मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मधमाशा इतर किटकांप्रमाणे एकट्या दुकट्या राहत नाही तर त्या समूह करून राहतात. त्यांच्या घराला पोळे असे म्हणतात. एका पोळ्यात हजारो मधमाशा असतात. मधमाशा त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद आणि पराग गोळा करतात. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकणांचे स्थलांतर करतात त्यामुळे फुलांची बीजधारणा व फलधारणा होते त्यालाच परागीभवन असे म्हणतात. परागीभवनामुळे पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यामुळे मधमाशा या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत.

तरीही मधमाशीपालनाबाबत आपल्याकडील शेतकरी अजूनही गंभीर नाहीत उलट मधमाशांचे पोळे जाळून त्यांना शेतातून हाकलून देण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. पूर्वी शेतात, बांधावर, आजूबाजूला सहज नजरेस पडणारी मधमाशांची पोळे आता दिसत नाही. मधासाठी पोळे जाळणे, कीटकनाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयी अज्ञान पसरवणे या कारणांमुळे मधमाशी सारखा उपयुक्त जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील मधमाशा नष्ट झाल्या तर त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी मधमाशांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. मधमाशांची शास्त्रिय माहिती घेऊन तिचे संगोपन करण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेन या बाबीपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्वाचा घटक मानून शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाला अग्रक्रम द्यायला हवा.

सरकारनेही याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करायला हवे. रोजगार निर्मितीला वाव असल्याने मधमाशी पालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचे काम करते. मधमाशांकडून शिकण्यासारखेही खूप आहे. समूहात राहून आदर्श जीवन कसे जगावे हे मधमाशांकडून शिकावे. दीर्घ कष्ट केल्याने मधासारखा गोड पदार्थ निर्माण करता येतो हे मधमाशांनी दाखवून दिले आहे. मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. आपण सर्वांनी मधमाशी वाचवण्याचा पर्यायाने जीवसृष्टी वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरच मधमाशी दिनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in