

हिवाळा हा ऋतू आनंददायी असला तरी या काळात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. हिवाळ्यामध्ये तापमानात अचानक घट होते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस वेगाने पसरतात. याच कारणाने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो म्हणून, शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य आहार देखील तितकाच महत्वाचा असतो, म्हणून निरोगी शरीरासाठी दररोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ते जाणून घेऊयात.
आवळा
आवळा हे व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध आहे. सर्दी आणि खोकला यासारख्या हिवाळ्यातील सामान्य आजारांपासून आवळा संरक्षण करण्यास मदत करतो. आवळा खाल्ल्याने आजारांशी लढण्याची क्षमता वाढते तसेच पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. दररोज एक आवळा किंवा एक चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत प्यायल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
अश्वगंधा
आयुर्वेदात अश्वगंधा खूप फायदेशीर मानली जाते. अश्वगंधा झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. तुम्ही अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत घेऊ शकता. परंतु, गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात अश्वगंधा समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुळस आणि आलं
हिवाळ्यात तुळस आणि आल्याचं मिश्रण एक रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. दरम्यान, आलं शरीराला उबदार ठेवण्यास आणि पचनास मदत करतो. तुळस आणि आल्याचा चहा केवळ घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम देत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास देखील मदत करते. तुम्ही तुळशीची पाने आणि आल्याचा काढा बनवून देखील पिऊ शकता.
तीळ
तीळ हे हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात. तीळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते तसेच हाडे देखील मजबूत होतात. लाडू, तिळाची चिक्की किंवा भाज्यांमध्ये तीळ वापरणे फायदेशीर आहे. दररोज एक चमचा काळे तीळ खाणं त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरु शकते.
हळद
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. तसेच, यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. हिवाळ्यात हळदीचे सेवन केल्याने सांधेदुखी, सूज आणि इन्फेक्शनपासून आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोप तर मिळतेच पण शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता देखील मजबूत होते.