
साधारणपणे २५ वर्षांपूर्वीपर्यंत एकट्या महिलांनी कुठे तरी ट्रिपला (सहल) जाणे हे भूवया उंचवणारे होते. मात्र, आता जग बदलत चालले आहे. महिलांनी एकट्या महिल्याने फिरणे, भटकंती करणे हे आता हळूहळू समाजात स्थिरावत आहे. मात्र, तरीही प्रदेशाप्रमाणे हे प्रमाण वेगवेगळे आहे. आजही महिलांनी एकट्याने भटकंती, भ्रमंती करू नये, अशा मताचे लोक समाजात आहेत. त्यातच पुण्यातील स्वारगेटच्या शिवशाहीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा घटनांनी आपले पाऊल मागे न घेता, अधिकाधिक सुरक्षितपणे सोलो ट्रिप कशी करता येईल यासाठी या खास टिप्स...(Women's Day Special )
सोलो ट्रिप का करावी?
घराबाहेर पडून भ्रमंती करताना आपली समज वाढते. जग कुठे चालले आहे याची जाणीव होते. स्वतःला वेळ देता येतो. स्वतःच्या क्षमता ओळखता येतात. आत्मविश्वास वाढतो. संवाद कला शिकता येते. आयुष्यातील कटू प्रसंगांना सामोरे जाताना भावनांचे योग्य व्यवस्थापन करता येते.
पहिल्यांदा सोलो ट्रिप करताना स्थान कसे निवडावे?
तुम्ही पहिल्यांदा सोलो ट्रिप करत असाल तर त्यासाठी तुम्ही भटकंतीचे स्थान निवडताना तुमच्या शहराच्या जवळपास असलेल्या ठिकाणांची निवड करा. तुम्हाला नेमकी कसली आवड आहे याचा विचार करा. तुम्हाला निसर्ग पर्यटन आवडते का ऐतिहासिक स्थळांना भेट देणे की सामाजिक दृष्ट्या महत्वाची असलेली ठिकाणे याविषयी विचार करा. सुरुवातीला अशी ठिकाणे शोधा जिथे तुम्ही एका दिवसात ट्रिप करून पुन्हा परत येऊ शकाल.
एक दिवसापेक्षा अधिक दिवसांची ट्रिप करायची असल्यास
तुम्हाला एक दिवसापेक्षा अधिक दिवसांची ट्रिप करायची असल्यास ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणाची सर्व माहिती इंटरनेटवरून काढून घ्या. हल्ली गुगल मॅप आणि इंटरनेटमुळे एकट्याने फिरायला जाणे खूप सोपे झाले आहे. शक्यतो प्रथम सरकारी गेस्ट हाऊस विषयी माहिती काढून घ्या. काही दिवसांपूर्वीच MTDC ने महिलांना राहण्यासाठी खास सवलत दिली होती. हे तुलनेने स्वस्त पडते. तसेच आसपास कुठे तीर्थक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्रांकडून राहण्याच्या कमी खर्चातील व्यवस्था केलेल्या असतात. त्याची माहिती इंटरनेवरून संपर्क क्रमांक काढून प्रत्यक्ष कॉल करून सर्व तपशीलवार माहिती जाणून घ्या.
वाहन निवड
वाहन निवड करताना तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते किती दूर आहे. तिथे पोहोचण्याचा मार्ग चांगला आहे की खराब रस्ते आहे याची गुगलवरून माहिती करून घ्या. तुम्हाला वाहन चालवण्याचा किती अनुभव आहे. या बाबी लक्षात घेऊन वाहन निवडा.
सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना
स्वतःची गाडी नसल्यास तुम्ही सार्वजनिक वाहने बस, रेल्वेने प्रवास करत असाल तर आधी तिकीट आरक्षित करून घ्या. ऑटोरिक्षा, टॅक्सी निवडताना त्यांचा नंबर फोटो काढून घ्या. आपल्या जवळच्या व्यक्तीला हा फोटो तसेच तुमचे लाइव्ह लोकेशन शेअर करून ठेवा. जेणेकरून ऐनवेळी काही चुकीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीने मदत करता येईल. तसेच रिक्षा किंवा टॅक्सीतून प्रवास करताना कटाक्षाने मोबाईलवर व्हिडिओ बघणे टाळा. त्याऐवजी प्रवासादरम्यान आसपासच्या परिसराचे निरीक्षण करण्यावर लक्ष द्या. यामुळे प्रसंगावधान राखता येईल.
सुरक्षा कशी करावी
ज्या ठिकाणी जात आहात. त्या ठिकाणाच्या पोलीस ठाण्याचे नंबर जवळ ठेवा. तसेच अत्यावश्यकतेवेळी पोलिसांची तातडीने मदत मिळवण्यासाठी १०० नंबर डायल करा. पोलिसांना माहिती देताना तुम्हाला तुमचे अॅक्युरेट लोकेशन माहित असायला हवे. त्यामुळे प्रवास करताना प्रत्येक चौकाचौकात रस्त्यांवरील फेरी विक्रेता, दुकानदार यांच्याकडून संबंधित स्थळाचे नाव माहित असू द्या. याशिवाय स्वयं सुरक्षेचे धडे घेता आले तर तेही उत्तमच.
आवश्यक साहित्य
प्रवास करताना कधीही कुठेही खरचटले किंवा लागले तर त्यासाठी बाम, मलम, स्प्रे असा एक छोटा फर्स्ट एड किट सोबत ठेवा. सोबतच पाण्याची बोटल, खाण्याचे थोडे सामान कॅरी करा. बॅग शक्यतो कमी वचनाची असावी. तुम्ही पर्यटनाला कोणत्या ठिकाणी जात आहात त्यानुसार तुमचा पोशाख असू द्या.