World Book Day 2025 Special : ‘बेस्ट सेलर’ची भूल नको, भान हवे

वाचन हा सुसंस्कृत समाजाचा पाया आहे. वाचन माणसाला घडवतं आणि असा माणूस समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देतो. समाजपरिवर्तनात वाचनाचा बहुमोल वाटा आहे. म्हणूनच जगभरात पुस्तक प्रकाशनाचं महत्त्व अत्यंत मोलाचं मानलं जातं.
World Book Day 2025 Special : ‘बेस्ट सेलर’ची भूल नको, भान हवे
छायाचित्र सौ. Freepik
Published on

-विशेष

-मोहिनी कारंडे

वाचन हा सुसंस्कृत समाजाचा पाया आहे. वाचन माणसाला घडवतं आणि असा माणूस समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देतो. समाजपरिवर्तनात वाचनाचा बहुमोल वाटा आहे. म्हणूनच जगभरात पुस्तक प्रकाशनाचं महत्त्व अत्यंत मोलाचं मानलं जातं. ज्ञानाचा व माहितीचा प्रसार, नैतिक मूल्यांची जाणीव, संवेदनशीलतेची जपणूक, समाजाशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम, नवीन संशोधनासाठी मार्गदर्शन, सांस्कृतिक जपणूक, समाजशिक्षण असे विविध हेतू चांगल्या पुस्तकांनी साध्य होतात.

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात इतर क्षेत्रांप्रमाणेच प्रकाशन क्षेत्रातही झपाट्याने बदल होत गेले. यातून प्रश्न निर्माण होतो की, आपल्या अवतीभवती असलेली वाचनसंस्कृती खरंच कुठल्या अवस्थेत आहे? अगदी मराठी साहित्यापुरता विचार केला तर - मराठीत कोणते साहित्य प्रकाशित होते? तिचा वाचकवर्ग कोण आहे?

आज जागतिक साहित्य सर्वत्र अनुवादित स्वरूपात पोहचत आहे. एका भाषेतील सांस्कृतिक समृद्धी दुसऱ्या भाषिक समाजाला माहीत व्हावी, तसंच वेगवेगळ्या परंपरा, विचारधारा त्याला माहिती व्हाव्यात यादृष्टीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भाषेतील अनुवाद महत्त्वाचा असतो. वेगवेगळ्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय भाषांतून सहज अनुवाद होत पुस्तकांच्या माध्यमातून एकप्रकारचा भाषिक संवाद जगभर होत आहे. एकीकडे सुखद वाटणारी ही गोष्ट आहे. तरीही हे अनुवाद कुठल्या गुणवत्तेचे आहेत, याकडे कुणाचे लक्ष जातं का? मराठीत ‘बेस्ट सेलर’ नावाची गोष्ट फोफावली आहे. सतत जाहिरातींचा मारा करून, चांगल्या गुणवत्तेचं पुस्तक अशी ‘बेस्ट सेलर’ पुस्तकाची ओळख लोकांपर्यंत पोहोचवली जाते. खरंच ‘बेस्ट सेलर’ असणं ही त्या पुस्तकाची गुणवत्ता असते का? हा दर्जा कोण ठरवतं? त्या पुस्तकांमुळे वाचकांमध्ये वाचन-अभिरुची खरंच विकसित होते का? हे प्रश्न मला एक वाचक व प्रकाशक म्हणून पडतात.

वाचकांना ‘बेस्ट सेलर पुस्तक’ ही भूल न देता त्या त्या भाषेतील तज्ज्ञ अभ्यासक, अनुवादक यांच्या मार्गदर्शनातून जगभरातील चांगलं साहित्य मराठीत आणावं, याकडे माझ्या प्रकाशनाचा कल असतो. एका प्रकाशन संस्थेची किती ‘शीर्षकं’ झाली, यापेक्षा किती दर्जेदार पुस्तकं त्या प्रकाशनाने आणली, हे मला महत्त्वाचं वाटतं. अशा विचारातूनच ‘मातीगारी’, ‘अरण्येर अधिकार’, ‘लोर्काच्या कविता’, ‘असगर वजाहत यांच्या कथा’ अशी पुस्तकं अनुवादित स्वरूपात मराठीत आणली.

मैत्री पब्लिकेशनने अनुवादित केलेल्या साहित्यात वैविध्य आहे. प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय भाषांतून अनुवाद केलेला आहे. फ्रांझ काफ्काच्या कथांचा जर्मन भाषेतून, अरण्येर अधिकारचा बंगालीतून, लोर्काच्या कवितांचा स्पॅनिश भाषेतून असा थेट एका भाषेतून मराठीत अनुवाद आहे. यात मध्यस्थ म्हणून तिसरी भाषा नसल्यामुळे अनुवाद जसाच्या तसा मराठीत आला आहे.

प्रकाशकाला जशा भूमिका असतात तशाच भूमिका अनुवादकाच्याही असाव्यात. व्यावसायिक अनुवादक निव्वळ पैशासाठी अनुवाद करतात. मैत्री प्रकाशनाच्या अनुवादकांच्या सामाजिक जाणिवा प्रबळ असल्याने त्यांच्या अनुवादाची पार्श्वभूमी ही व्यावसायिक नाही, तर ज्या साहित्याचा अनुवाद करायचा त्या साहित्याच्या भूमिकेशी तो संलग्न असतो.

एखाद्या नववसाहतवाद्याला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीची काय अवस्था होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मातीगारी’ ही कादंबरी आहे. केनियन जनतेला वसाहतविरोधी संघर्षाच्या दृष्टीने जागरूक बनविण्यात या कादंबरीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. कादंबरीतल्या एखाद्या पात्राला देशातले सत्ताधीश इतके घाबरले की, त्यांनी त्याच्या अटकेचं वॉरंट काढलं होतं, अशी एक अभूतपूर्व घटना या कादंबरीच्या निमित्ताने त्या देशात घडली. कादंबरी वाचताना केनिया हा भूप्रदेश विसरून आपण आपल्या देशाचीच कादंबरी वाचतो आहोत की काय, असं वाटायला लागतं.

फ्रान्झ काफ्का हे नाव आधुनिक साहित्यावर आपल्या कलाकृतीद्वारा मूलगामी प्रभाव टाकणाऱ्या साहित्यिकांमध्ये अग्रगण्य आहे. जीवन असंगत आहे, निरर्थक आहे. मानवाच्या कृतींनी, विशेषतः लेखनाने त्यास अर्थपूर्णता देण्याचा प्रयत्न करत राहणं, हीच जीवनाची इतिकर्त्यव्यता आहे, असं मानणाऱ्या अस्तित्ववाद्यांमध्ये काफ्काची गणना केली जाते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी त्यांच्या महत्त्वाच्या तीन कथांचा मूळ जर्मन भाषेतून अनुवाद केला आहे.

बिरसा मुंडा यांनी सामाजिक, वैचारिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीला झुगारून आदिवासी जनसमूहांना लढण्यास सज्ज राहण्याचा संदेश दिला. बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन अशा सर्व नैसर्गिक संसाधनावर आदिवासींचा पारंपरिक, सामूहिक हक्क आहे, ही भूमिका घेत लढा उभारला. निसर्गाला ओरबाडणारी नफाकेंद्रित भांडवली व्यवस्था नाकारली. बिरसा मुंडा ‘मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही’ या बाण्याने लढले. बिरसाने आदिवासी समाजाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढायला शिकवलं. त्यातूनच आदिवासी जगणं हे अधिक प्रखर झालं.

आदिवासींच्या लढ्याचा इतिहास तथाकथित मुख्य धारेने कायम अनुल्लेखाने मारला आहे. परंतु चळवळीने आदिवासींचा हा इतिहास लुप्त होऊ दिलेला नाही. त्यामुळेच महाश्वेतादेवी या संवेदनशील लेखिकेने बिरसा मुंडाच्या जीवनावर लिहिलेली ‘अरण्येर अधिकार’ ही कादंबरी मराठीत आणणं महत्त्वाचं वाटलं.

असगर वजाहतांच्या कथा या अतिशय कमी शब्दांत उपरोध मांडतात. त्यातील उपरोध तीव्र आहे, ज्याला ‘ब्लॅक कॉमेडी’ म्हणतात तसा. त्या कथा आजच्या काळाशी, जगण्याशी निगडित आहेत. म्हणूनच अनुवादक श्रीधर चैतन्य यांना असगर वजाहतांच्या कथांचा मराठी अनुवाद करावा वाटला. अनुवादित साहित्यामधून नवी दृष्टी मिळावी, वाचकांनी त्यावर विचार करावा अशी एक भूमिका अनुवादामागे आहे. ज्या साहित्याचा अनुवाद करायचा आहे ते साहित्य अनुवादकाला सामाजिक आशयाच्या अनुषंगाने आवडले पाहिजे.

वाचकांना काय द्यावं याची समज प्रकाशकाला असेल तर त्या प्रकाशन संस्थेतील लेखकांना कमी दिवसांत खोट्या आवृत्त्यांची संख्या जाहीर करणं, खोट्या नावांनी स्वतःच परीक्षणं लिहिणं यासारखं दुःसाहस करावं लागणार नाही. चांगलं साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी प्रकाशकाने स्वीकारावी.

प्रकाशन व्यवसायाला काही शतकांचा इतिहास आहे. नामवंत प्रकाशकांच्या दोन-चार पिढ्या अद्याप कार्यरत आहेत. पुस्तक विक्रीचे गमक त्यांना सापडलं आहे. नवोदित प्रकाशकाला ते अद्याप सापडलेलं नाही. त्यामुळे चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोहचविण्याची नवोदित प्रकाशकाची कसरत चालूच आहे.

या व्यवसायात महिला प्रकाशकांची संख्या नगण्य आहे. एकतर प्रकाशक बनण्याचे कुठलंही तांत्रिक प्रशिक्षण नसल्यामुळे लोक आधीच या व्यवसायापासून थोडे दूर आहेत. आता हळूहळू संख्या वाढतेय. त्या तुलनेत महिला या व्यवसायात स्वतंत्रपणे फारशा नाहीत.

आज प्रकाशन क्षेत्रात अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. सोशल मीडियावर पुस्तकाच्या जाहिरातींचा मारा होत असताना वाचक काय वाचावं हे कसं ठरवतात? चांगलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचतं का? लोक वाचनाला प्राधान्य देत पुस्तकाच्या दुकानापर्यंत जातात का? ठरावीक लोक वगळता किती लोक पुस्तकं खरेदी करतात? पुस्तकं त्यांच्या जीवनाचा आवश्यक भाग असतात का? हे प्रश्न पडत असतानाच दुसरीकडे पुस्तक प्रदर्शनातील पुस्तक विक्रीचे मोठमोठे आकडे कोटींमध्ये जाहीर होतात. खरंच, हे आकडे कुठल्या परिमाणातून शोधले जातात, हा प्रश्नच आहे. लोक किती वाचतात, कोणत्या गुणवत्तेचे पुस्तक वाचतात, याचा अदमास अशा कोटीच्या कोटी आकड्यांतून बांधता येतो का?

नुकतंच दिल्लीत अ.भा. मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. तसंच राज्याच्या विविध भागात वेगवेगळी साहित्य संमेलनं पार पडत असतात. या आयोजनांनी मराठी साहित्यात काय मोलाची भर पडत असेल, याचाही धांडोळा घेतला जावा. पुस्तक, वाचन संस्कृती, साहित्य संस्था जर राजकीय डावपेचांपासून मुक्त राहिल्या, तरच वाचनसंस्कृती जतन होईल व अधिक विकसित होईल, असं आजचं राजकीय वातावरण पाहता वाटतं.

काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये एक व्हिडीओ वारंवार समोर येत होता; एक सात-आठ वर्षांची मुलगी आग लागलेल्या आपल्या घरातून आपली वह्या-पुस्तकं घेऊन घराच्या बाहेरच्या दिशेने पळत आहे. एकीकडे आग लागलेलं भीषण चित्र, तर दुसरीकडे वह्या-पुस्तकांचं महत्त्व असलेली चिमुकली हे आशादायक चित्रं. यामुळे मनात कालवाकालव होत होती.

पुस्तकांचं महत्त्व जाणणारा, पुस्तकांना उराशी कवटाळणारा विवेकी समाज निर्माण होवो, हीच जागतिक वाचक दिनाच्या निमित्ताने अभिलाषा.

प्रकाशकाला भूमिका हवी!

‘वाचकाला काय द्यायला हवं, हे प्रकाशकाला माहिती हवं. त्यासाठी प्रकाशकही स्वतः चौफेर वाचक, साहित्याचा व्यासंग असलेला जाणकार हवा. याशिवाय प्रकाशकाला स्वतःच्या भूमिका हव्यात, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण एखादं पुस्तक वाचकांच्या काही पिढ्यांसाठी छापत असतो. प्रकाशन हा फक्त आर्थिक उलाढालीचा व्यवसाय नाही. प्रकाशक एक सांस्कृतिक पर्यावरण घडवत असतो. सांस्कृतिक पर्यावरणाला पोषक असंच साहित्य यायला हवं.’

प्रकाशक, मैत्री पब्लिकेशन

logo
marathi.freepressjournal.in