
- पालकत्वात रमले बाबा
- संजय हिरे
मी आणि हर्षदीप, माझा मुलगा, आम्ही दोघे एके दिवशी मॉलमधल्या पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं पाहत होतो. पुस्तक न्याहाळत असताना हर्षदीप एका इंग्रजी पुस्तकाकडे बोट करत म्हणाला, “पप्पा ते बघ, टाटा”. मी त्या पुस्तकाच्या दिशेने पाहिलं तर ते रतन टाटा यांच्यावर लिहिलेलं पुस्तक होतं आणि पुस्तकाचं नाव मोठ्या ठळक अक्षरात लिहिलं होतं ‘द टाटा’. रतन टाटा यांचं चित्र पुस्तकाच्या पृष्ठभागावर होतं. मला आश्चर्य वाटलं. मनात म्हटलं, हर्षदीपने चित्रावरून कसं रतन टाटांना ओळखलं? पण, तोच पुढे म्हणाला, “आपल्या घरातल्या एसीवर लिहिलंय ‘टाटा’, हो ना!” तेव्हा माझ्या लक्षात आलं ‘टाटा’ या शब्दाच्या इंग्रजी स्पेलिंगमुळे त्याचं त्या पुस्तकाकडे लक्ष वेधलं गेलं. मला या गोष्टीची गंमतही वाटली आणि अप्रुपही वाटलं.
मी त्याच्या हातात ते पुस्तक देत म्हटलं, “आपल्या घरी जो एसी आहे ना, तो या चित्रातल्या माणसाच्या कंपनीने बनवलेला आहे. त्यांचे नाव रतन टाटा आहे आणि ‘टाटा’ हे त्यांचं आडनाव आहे.” टाटा हे आडनाव आहे, हे ऐकून त्याला नवल वाटलं. “हो का?” असं म्हणत कुतुहलाने तो ते पुस्तक आणि त्यावरचं टाटा यांचं चित्र न्याहाळू लागला.
माझं शेल्फवरची इतर पुस्तकं चाळणं सुरू होतं. तोही माझ्या मागे ‘सेल्फ हेल्प’ विषयावरची पुस्तकं ठेवलेल्या शेल्फवरची पुस्तकं हातात घेऊन पाहत होता. एवढ्यात त्याला एक पुस्तक मिळालं आणि ते पुस्तक घेऊन पुन्हा माझ्याकडे आला. “पप्पा, हे बघ, हे पुस्तक तुझ्याकडेपण आहे ना… मी पाहिलंय.” मी वळून पाहिलं तर त्याच्या हातात पावोलो कोएल्होचं ‘अल्कमिस्ट’ पुस्तक होतं. केशरी रंगाचं मुखपृष्ठ आणि त्यावर पिरॅमिडचं चित्र असलेलं ‘अल्कमिस्ट’ पुस्तक त्याने अनेकदा घरात मला वाचताना पाहिलं होतं. पुस्तकाचं नाव वाचता येत नसतानाही मुखपृष्ठावरून त्याने ते पुस्तक ओळखलं होतं. मला पुस्तकांची आवड आहे. माझ्या मुलालाही हळुहळु पुस्तकांबद्दल कुतूहल आणि औत्सुक्य वाटतंय हे पाहून मलाही आनंद वाटला.
खरं तर, त्याच्या वयाच्या मुलांचा ओढा खेळण्यांच्या दुकानाकडे जास्त असतो. ते स्वाभाविकच आहे, असं आपणही मानतो. पण त्याचबरोबर जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास आपण मुलांमध्ये इतरही विविध छंद वा खेळांबद्दल रस निर्माण करू शकतो, हेही तितकंच खरं. आपल्याला हवे असलेले बदल मुलांमध्ये ओढूनताणून, जबरदस्तीने किंवा एका रात्रीत घडवून आणता येत नाहीत. छोट्या छोट्या, पण प्रत्यक्ष कृतीतून मुलांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल आवड किंवा आकर्षण निर्माण केलं जाऊ शकतं.
मुलांची सांस्कृतिक वाढ होण्यासाठी तसंच विविध विषयांतील ज्ञान मिळविण्यासाठी वाचन करणं आवश्यक आहे. यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही, असं मला वाटतं. विशेष बाब म्हणजे पुस्तकांशी एकदा का तुमची गट्टी जमली आणि पुस्तक वाचनातला तुमचा इंटरेस्ट वाढू लागला की पुस्तकांशी तुमची मैत्री आयुष्यभर टिकून राहते आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमध्ये पुस्तकांविषयी आवड आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी पालक म्हणून आपल्याकडून तसे प्रयत्न व्हायला हवेत.
मी म्हटलं तसं, मला लहानपणापासून पुस्तक वाचण्याची आवड आहे. आमच्या घरातल्या लाकडी कपाटात माझ्या पुस्तकांचा एक स्वतंत्र कप्पा आहे. हर्षदीप साधारण साडेतीन-चार वर्षांचा झाल्यापासूनच मी माझ्या पुस्तकांचा कप्पा त्याला दाखवून ठेवला होता. त्याच्या मनाला वाटलं, की त्यातली पुस्तकं काढायची, ती घरात पसरवून ठेवायची, पुस्तकांच्या पानावर काही रेघोट्या मारायच्या, हाही त्याच्या खेळाचा एक भाग बनला होता. खेळून झाल्यावर ती पुस्तकं पुन्हा व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं काम मला करावं लागायचं. अर्थात मीही त्याला, ‘पुस्तकाला हात लावू नकोस’ असं म्हणत कधी पुस्तकांपासून लांब सारलं नाही. किंबहुना त्याने पुस्तक हातात घ्यावं म्हणून मीच त्याच्यासमोर पुस्तक वाचत बसायचो. याचा परिणाम असा झाला की, आज पहिलीत शिकत असताना त्याचाही एक छोटासा गोष्टींच्या पुस्तकांचा संग्रह आहे.
सर्वच पालकांना मनापासून वाटत असतं, की आपल्या मुलांनी चांगले छंद जोपासावेत. काहींना हवं असतं, की मुलाने छानपैकी चित्रं काढावीत किंवा क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारखे मैदानी खेळ खेळायला शिकावं, नाहीतर एखादं तालवाद्य वाजवायला शिकावं. याकरिता पालक मुलांना आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करून देत असतात. परंतु खेळाचं साहित्य आणून दिल्याने मुलांमध्ये त्या खेळाची आवड निर्माण होईल, त्या खेळात प्राविण्य मिळवेल असं म्हणता येणार नाही. त्यासाठी आधी त्या खेळाविषयी पोषक वातावरण निर्मिती करणं आवश्यक असतं. मुलाला डझनभर पुस्तकं आणून दिली म्हणून त्याच्यामध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण होईल, असं मानणं हे भाबडेपणाचे ठरेल, असंच म्हणावं लागेल.
मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी पुस्तकं निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पुढे वाढत्या वयानुसार त्यांच्या वाचनाला दिशा मिळत जाते. लहान मुलं टीव्हीवर कार्टून्स पाहत असतात. ते जी कार्टून्स पाहत असतील त्यांची चित्रे असलेली पुस्तकं त्यांना विकत घेऊ द्यात. मला आठवतं, मी लहान असताना टीव्हीवर ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ नावाची विनोदी मालिका दाखवायचे. ती मालिका लहान-मोठ्या सर्वांनाच खूप आवडायची. मला ती इतकी आवडत होती, की मी त्यावेळी दादर इथल्या ‘आयडियल’ या पुस्तकांच्या दुकानातून ‘चिमणरावांचे चऱ्हाट’ हे मोठं पुस्तक विकत घेतलं आणि पुढे अनेकदा वाचलं. नंतरही बरीच वर्षं ते पुस्तक माझ्याकडे होतं.
मुलांसोबत पुस्तकांच्या विविध दुकानांना भेटी दिल्या पाहिजेत. त्यांना पुस्तकं हाताळायला दिली पाहिजेत. मुंबईतील प्रसिद्ध आयडियल दुकान, किताब खाना, क्रॉसवर्ड यांसारखी दुकानं म्हणजे लहान-मोठ्यांसाठी पुस्तकांची मेजवानीच. याशिवाय आपण राहतो त्या शहरात वेळोवेळी पुस्तक प्रदर्शनं भरत असतात. अशा पुस्तक प्रदर्शनांमध्ये एकाच ठिकाणी पुस्तकांची इतकी दुकानं पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे अशा पुस्तक प्रदर्शनांमध्ये फिरून वेगवेगळी पुस्तकं चाळत पुस्तकं खरेदी करण्याचा अनुभव हा वेगळाच म्हणावा लागेल. पुस्तकांच्या एकल दुकानातून खरेदी करण्यापेक्षा अगदी वेगळा. हा अनुभव मुलांना नक्कीच आनंद देऊन जाणारा असतो.
जुन्या नव्या पुस्तकांची विक्री करण्यासाठी रस्त्यांवर पुस्तक विक्रेते पुस्तक विकत बसतात. त्यांच्याकडील दुर्मिळ पुस्तकांची ओळख आणि महत्त्व मुलांना आवर्जून सांगितलं पाहिजे. याशिवाय पुस्तकांची गोडी लागण्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे ग्रंथालयं. आपण राहत असतो त्या परिसरात आसपास एखाद-दुसरं ग्रंथालय असतंच. मुलांना अशा ग्रंथालयांचीही ओळख करून दिली पाहिजे. तिथे आवर्जून नेलं पाहिजे. मुंबई मराठी ग्रंथालय आणि खासगी लायब्रऱ्या ही माझी नेहमीची भेट देण्याची ठिकाणं. खरं तर इथूनच माझ्या पुस्तकांच्या दुनियेतील मुशाफिरीला सुरुवात झाली होती, ती आजतागायत सुरूच आहे.
मुलांना पुस्तकं आणून दिली तरी ती ते वाचत नाहीत, असा नकारात्मक सूर लावण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा पालकांनीच मुलांना सोबत घेऊन पुस्तकांच्या आगळ्या दुनियेची ओळख करून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
मुलांची सांस्कृतिक वाढ होण्यासाठी तसेच विविध विषयांतील ज्ञान मिळविण्यासाठी वाचन करणं आवश्यक आहे. यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही, असं मला वाटतं. विशेष बाब म्हणजे पुस्तकांशी एकदा का तुमची गट्टी जमली आणि पुस्तक वाचनातला तुमचा इंटरेस्ट वाढू लागला की पुस्तकांशी तुमची मैत्री आयुष्यभर टिकून राहते, हा अनेकांना आलेला अनुभव आहे आणि म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमध्ये पुस्तकांविषयी आवड आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी पालक म्हणून आपल्याकडून तसे प्रयत्न व्हायला हवेत.
sanjayhire1@gmail.com