World Book Day 2025 Special : वर्तमान वास्तवाचा अंतर्वेध : नेटपर्णी

आपल्या आकर्षक रंगगंधाने भक्ष्याला आकर्षित करणारी नेटपर्णी ही वनस्पती आणि आंतरजालावरच्या माध्यमांचं मायाजाल याची तुलना करणारी सुनीता बोर्डे यांची नेटपर्णी ही कादंबरी लक्ष्यवेधी आहे. आजच्या दुखण्यावर ती नेमकेपणानं बोट ठेवते आणि बदलत्या वर्तमानाला भिडण्याचा प्रयत्न करते. सेक्सटॉर्शन या महत्त्वाच्या विषयाला ही कादंबरी हात घालते.
World Book Day 2025 Special : वर्तमान वास्तवाचा अंतर्वेध : नेटपर्णी
नवशक्ति अक्षररंग
Published on

- नोंद

- प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर

आपल्या आकर्षक रंगगंधाने भक्ष्याला आकर्षित करणारी नेटपर्णी ही वनस्पती आणि आंतरजालावरच्या माध्यमांचं मायाजाल याची तुलना करणारी सुनीता बोर्डे यांची नेटपर्णी ही कादंबरी लक्ष्यवेधी आहे. आजच्या दुखण्यावर ती नेमकेपणानं बोट ठेवते आणि बदलत्या वर्तमानाला भिडण्याचा प्रयत्न करते. सेक्सटॉर्शन या महत्त्वाच्या विषयाला ही कादंबरी हात घालते.

सुनीता बोर्डे यांच्या बहुचर्चित आत्मकथनपर ‘फिन्द्री’ या कादंबरीनंतर ‘नेटपर्णी’ ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या ‘फिन्द्री’ या पहिल्या कादंबरीप्रमाणेच ‘नेटपर्णी’ ही कादंबरी देखील सामाजिक प्रश्नांचा अंतर्वेध घेणारी कादंबरी आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील माणसांच्या जगण्याचं वास्तव त्यांनी ‘फिन्द्री’मधून साकारलं आहे. कमालीचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक शोषण झालेल्या असंख्य समाज घटकांच्या जीवन संघर्षाची मांडणी ‘फिन्द्री’ने केलेली आहे. विषम व्यवस्थेची पहिली बळी स्त्री असते. भेदा-भेदाचा जाळ अगोदर त्यांनाच भाजून काढतो, तरीही आपल्या अंत:प्रेरणेने समस्यांना सामोरं जाणाऱ्या स्त्रीची ही संघर्ष गाथा जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, पुरुषसत्ताक व्यवस्थेतील लिंगभेद यासह अनेक भेदभावांची विविध रूपं साकार करते. ‘फिन्द्री’ म्हणजे ‘नकोशी’ या अर्थाची अनेकविध रूपं या कादंबरीतून वाचकाला अस्वस्थ करतात. मायलेकींची ही संघर्षगाथा आहे.

सुनीता बोर्डे यांची ‘नेटपर्णी’ ही अशीच अस्वस्थ करणारी, वर्तमान वास्तवाचा वेध घेणारी दुसरी कादंबरी आहे. समाजाच्या सर्व घटकांच्या वर्तमानाला स्पर्श करणारी आणि देशभर पसरलेल्या समस्यांच्या भोवऱ्यात समाजाला अडकवणाऱ्या इंटरनेटच्या महाजालात माणसाची होणारी दुर्दशा.. हा या कादंबरीचा विषय आहे. इंटरनेटनं आपलं संपूर्ण जीवन व्यापलं आहे. आपल्या जीवनाचा अमर्याद भाग या इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. इंटरनेटमुळे आपण साऱ्या जगाशी सहज कनेक्ट झालो आहोत आणि या तंत्रज्ञानाने सारं जग आपल्या मुठीत आलं आहे. नानाविध ॲप्स आपण सहज वापरतो, अशा अविर्भावात लोक वावरत असतात. गुगल, फेसबुक, ॲमेझॉन, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम यासह अनेकविध ॲप्स आपल्या मोबाइलवर आपणाला खुणावत असतात. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथपर्यंत तंत्रज्ञानाची मजल गेलेली आहे. हे सारं तंत्रज्ञान आपल्या जगण्याचा अवकाश संपवत आहे. एवढंच नाही, तर तंत्रज्ञानाच्या अफाट वापरामुळे आपलं सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्वास्थ्य संपुष्टात आलं आहे. यातूनच मानवी सहजीवन, पर्यायाने मानवी अस्तित्वच धोक्यात येत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नासंबंधीचे चिंतन ‘नेटपर्णी’मधून आलं आहे.

‘नेटपर्णी’ या मांसाहारी वनस्पतीशी अर्थानुबंध निर्मिणारी ‘नेटपर्णी’ ही नवी अर्थपूर्ण संकल्पना शीर्षकातून आली आहे. ही घटपर्णी वनस्पती आपल्या आकर्षक रंग व सुगंधाच्या साह्याने भक्ष्याला स्वतःकडे आकर्षित करून क्षणार्धात गिळंकृत करते, अगदी त्याचप्रमाणे इंटरनेटच्या महाजालावर पसरलेली ‘नेटपर्णी’ म्हणजेच सोशल मीडियावरील भक्ष्यासाठी सापळा लावून बसलेल्या टोळ्या एखाद्या व्यक्तीला सहज आपल्या जाळ्यात ओढून शेवटी गिळंकृत करतात, ही नोंद अर्थपूर्ण आहे. ‘नेटपर्णी’ ही नवी समर्पक संज्ञा निर्माण करून कादंबरीचं अर्थसूचक नामकरण करत लेखिकेनं हे सृजन साधलं आहे.

आज प्रत्येकजण मोबाइल वापरतो आणि तेही इंटरनेटच्या भरपूर वापरासह. या तंत्रज्ञानाने जगच लहान केलं आहे. सहज संपर्क आणि सहज संवाद यामुळे सगळी माहिती काही क्षणांत सहज उपलब्ध होते. आपल्या फोटोसह विविध रील्सचा महापूर सगळ्या ॲप्सवर आलेला दिसतो. नानाविध रंग-ढंग, इच्छा असो वा नसो, आपल्यासमोर दर्शन देत राहतात. हे पाहताना आपण आपल्या भोवतीचे, कौटुंबिक नात्यातील सारे भावनिक जग विसरतो आणि आपल्याही नकळत त्या मोबाइलमध्ये दिसणाऱ्या जगात हरवून जातो. तात्कालिक आनंद देणारं हे साधन, दीर्घकालीनदृष्ट्या आपलं मानसिक, भावनिक स्वास्थ्य बिघडवून टाकतंच, सोबतच सर्व पातळीवरील समाजभान आणि समाजमन यांचं स्वास्थ्य देखील संपवून टाकतं. याचा नित्य अनुभव जगभरातील हजारो लोक घेत आहेत. यातून केवायसी करण्यासाठी, फसव्या लिंक क्लिक केल्याने होणारी अफरातफर आणि फेक फोटोंचं भय दाखवून होणारी आर्थिक लूट ही गंभीर समस्या बनली आहे. सेक्सटॉर्शन अर्थात लैंगिक चित्रफितींचं भय दाखवून होणारी आर्थिक लूट ही आज घडीला गंभीर समस्या बनली आहे. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोचा, अनवधानाने ओपन केलेल्या लिंकचा, व्हिडिओ कॉल्सचा गैरवापर करून, मित्र-नातेवाईक आणि एकूणच समाजामध्ये बदनामी करण्याची भीती दाखवून सेक्सटॉर्शन मोठ्या प्रमाणात केलं जातं. आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, मित्र-नातेवाईक आणि एकूणच समाजामध्ये बदनामी होऊ नये, आपली पत जाऊ नये, या भीतीतून कित्येक मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आपली होणारी आर्थिक लूट मुकाट्याने सहन करत राहतात. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणातून आलेला चंगळवाद माणसाला एकाकी पाडतो आहे. मोबाइल या साधनाने एकीकडे जग जवळ आलं असलं तरी माणसाच्या आयुष्यातील जवळची नाती माणसापासून दूर गेल्याने माणूस कमालीचा एकाकी झाला आहे. वित्तीय हव्यास आणि चंगळवादी हौस यांचा गैरफायदा घेणाऱ्यांनी अशा एकाकी माणसांना सहजच सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढलेलं दिसून येतं. आर्थिक लाभाचं प्रलोभन देऊन किंवा सुंदर तरुणींच्या सहवासाचं आमिष दाखवून या आभासी मोहजालात माणसं ओढली जातात आणि नंतर त्यातून त्यांची आर्थिक लूट केली जाते. यातून फक्त आर्थिक लूट होते असं नाही, तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात. ऑनलाइन दिसणाऱ्या मोहक फसव्या जगातून आलेल्या वर्तमान वास्तवाचे यथार्थ चित्रण म्हणजे सुनीता बोर्डे यांची ‘नेटपर्णी’ ही कादंबरी होय.

आपलं सर्वस्व गमावलेल्यांचं, नेटपर्णीचं भक्ष्य ठरलेल्यांच्या उद्ध्वस्तीकरणाचं हे विदारक आणि वास्तव चित्र आहे. या कादंबरीतून ऑनलाइन होणाऱ्या आर्थिक लुटीच्या प्रकरणांचे गंभीर परिणाम विविध घटितांमधून आले आहेत. अक्षरा, सावली, समिता, आनंद, निशांत, सागर अशा पात्रांभोवती हे कथानक फिरतं. अक्षरा आणि निशांत यांच्या नातेसंबंधांमधील ताणतणाव घटस्फोटापर्यंत कसे पोहोचतात याचं विवेचन करत असताना सावली आणि आनंद यांच्या सुखी संसारातील वेदना ही कादंबरी दाखवून देते. संवेदनशील लेखिका आणि शिक्षिका असणारी अक्षरा आपला नवरा निशांतशी सुखनैव संसार करत असताना त्यांच्या आयुष्यात प्रिया नावाचं आलेलं वादळ, निशांतच्या मोबाइलवरील विविध मेसेज, नग्न फोटो आणि व्हिडीओ कॉल पाहून, नात्यातील या विश्वासघाताने संतापलेल्या अक्षराने सोडलेलं घर, सावलीशी तिची झालेली भेट..हा सारा घटनाक्रम अक्षराच्या निवेदनातून प्रकट झाला आहे. श्रद्धाशी बोलताना निशांतच्या वर्तनातून आपली फसवणूक झाल्याचं अक्षरा बोलून दाखवते. पुढे ऑनलाइन दिसणाऱ्या मोहक फसव्या जगाकडून होणाऱ्या आर्थिक लुटीचे आणि सेक्सटॉर्शनच्या प्रकरणाचे गंभीर परिणाम कादंबरीतून प्रभावी स्वरूपात साकार झाले आहेत. नवमध्यमवर्गीय समाजात स्त्री-पुरुष संबंधांचं वाढतं खुलं आकर्षण, त्यात अडकणारी अनेक सरळसाधी माणसं आणि त्यांना अडकवणारे समाजकंटक यांची गोष्ट नेटपर्णी सांगते. सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून केली जाणारी आर्थिक लूट ही केवळ एका व्यक्तीच्या नव्हे, तर अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आहे, हे वास्तव या कादंबरीने उलगडून दाखवलं आहे. नेटपर्णी फक्त प्रश्न मांडून थांबत नाही, तर सेक्सटॉर्शन करणाऱ्या लुटारू टोळ्यांचं काम कसं चालतं यावर काहीएक प्रकाश टाकण्याचं, तसंच मॉर्फिंग, फिशिंग, सेक्सटॉर्शन, डीप फेक, डीप न्यूड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तांत्रिक संकल्पनांविषयी वाचकांना अगदी सोप्या पद्धतीने माहिती देण्याचं कामही करते. हा शोध घेणाऱ्या समिताचं बौद्धिक चातुर्य, तिचं धाडस आणि तिचा राजस्थान प्रवास, हा सर्वच घटनाक्रम थरारक आहे. पुढे समिताचं नेमकं काय झालं? मानवी जीवनासाठी एकीकडे आवश्यक असणाऱ्या इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून त्यावर पसरलेली ही नेटपर्णी छाटून टाकण्यासाठी शेवटी अक्षरा, समिता, सागर, निशांत आणि आनंद यांनी कोणता निर्णय घेतला, हे सारे तपशील या कादंबरीत वाचणं हा एक समृद्ध अनुभव आहे.

नेटपर्णीमधून आलेलं निसर्ग विश्लेषण, खानपानाचं वर्णन, राजस्थानमधील खानपानाचे नवे संदर्भ, तेथील जगण्याच्या रीती, मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीच्या वसतिगृहातील जीवनाचं वर्णन, मित्र-मैत्रिणींचे संवाद, इंटरनेटवरील विविध ॲप्सवर होणारे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषेतील संदेश संवाद, या संवादातून निर्माण केलं जाणारं सेक्सचं आकर्षण आणि पुढील काळात त्याचे होणारे दुष्परिणाम हे सगळं प्रभावीपणे समोर आलं आहे. समाजाचं बदलतं स्वरूप, बदलणारी संपर्क माध्यमं आणि या परिवर्तनाचा स्वीकार करण्याचं अपुरेपण याचं सूचन नेटपर्णी सहज करून जाते.

या विषयाची गुंतावळ परिपूर्णपणे समजून घेत लिहिलेली ही कादंबरी आशयघनतेसह साकारली आहे. सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून आर्थिक लूट होत असताना होणारी मानसिक, भावनिक ओढाताण आणि ताण-तणाव आणि तणावातून निर्माण होणारा संघर्ष याचं वर्तमान वास्तव मांडणारी ही कादंबरी आहे.

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक

logo
marathi.freepressjournal.in