
- दखल
- अभिषेक धनगर
हा लेख लिहायला सुरुवात करतानाच माझ्या लक्षात आलं की, वॉल्डन पब्लिकेशनला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. बरोबर एक वर्षापूर्वी वॉल्डनकडून ‘भटकंती’ हे पुस्तक प्रकाशित होऊ घातलं होतं. कुठल्याही नव्या व्यवसायाच्या सुरुवातीला असते तशीच थोडीशी हुरहुर, भीती तेव्हा मनात होती. प्रकाशनाचा कुठलाही पूर्वानुभव नसताना, मोठं भांडवल सोबत नसताना, चांगली नोकरी सोडून लहानशा खेड्यातून पुण्यासारख्या शहरात येऊन पुस्तक प्रकाशनासारखा बेभरवशाचा उद्योग करणं हा कुणालाही वेडेपणाच वाटला असता. पण पुस्तकांवरील आणि वाचनावरील अकृत्रिम प्रेमाने हे धाडस करायला मी आणि माझी पत्नी प्रियंका तयार झालो.
आज बरोबर एका वर्षानंतर मला जाणवतंय, की आज जे काम आपण करत आहोत नेमकं तेच आपल्याला करायचं होतं. त्यादृष्टीने आम्ही यशस्वी प्रकाशक आहोत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अर्थात केवळ एका वर्षात आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर स्वत:ला यशस्वी म्हणवून घेणं थोडं धाडसाचं होईल, पण प्रकाशनाच्या सुरुवातीलाच जो एक रोडमॅप आमच्या डोळ्यांसमोर होता, जागतिक साहित्यातील जी उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत आणण्याचा आमचा मानस होता आणि पुस्तकांसाठी ज्याप्रकारचं निर्मितीमूल्य आपण राखायला हवं अशी आमची कल्पना होती, त्या आमच्या उद्दिष्टांमध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत, असं वाटतं.
आज आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या जवळजवळ १०० पुस्तकांचे हक्क मिळवून त्यावर काम सुरू केलं आहे. यात नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकांची पुस्तकं, मॅन बुकर, पुलित्झर इ. पुरस्कारांनी सन्मानित पुस्तकांचाही समावेश आहे. ही पुस्तकं मराठीत आणताना थेट त्या त्या मूळ भाषांमधून मराठीत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो; पण चिनी, जपानी, कोरियन, ग्रीक, स्पॅनिश इत्यादी भाषेतील भाषांतरकारांची वानवा असल्याने काही पुस्तकं इंग्रजीद्वारे मराठीत आणावी लागतात. आज मराठीच काय, पण अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत आहे, पण यामध्ये बव्हंशी व्यक्तिमत्त्व विकास, विशिष्ट कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तकं, थिंक ॲण्ड ग्रो रिच प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असतो. पण गंभीर फिक्शन प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांची संख्या अगदीच नगण्य आहे. अशा परिस्थितीत आमच्यासमोर मुख्य आव्हान होतं ते गंभीर पुस्तकांच्या वाचकवर्गापर्यंत पोहोचण्याचं. यात सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा गंभीर फिक्शनलाही वाचकांचा मिळत असलेला भरभरून प्रतिसाद. त्याबरोबरच उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या पुस्तकांविषयी मराठी वाचक अत्यंत सजग असल्याचाही आमचा अनुभव आहे.
प्रकाशन व्यवसायातील एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विक्री व्यवस्था. सुदैवाने आम्ही पुस्तक व्यवहाराची सुरुवात केली ती दुर्मीळ पुस्तकांचे विक्रेते म्हणून. जवळजवळ पाच वर्षं दुर्मीळ पुस्तकांचं महाराष्ट्रभर वितरण केलेलं असल्याने वॉल्डनचं अतिशय चांगलं नेटवर्क महाराष्ट्रभर तयार झालं आहे. या नेटवर्कचा फायदा आम्हाला वॉल्डन पब्लिकेशनच्या पुस्तकांसाठी झाला. पुस्तक वितरणासाठी विक्रेते, वितरक, शासकीय व्यवस्था या कशावरही अवलंबून न राहता अगदी पहिल्याच पुस्तकापासून वॉल्डनच्या पुस्तकांची उत्तम विक्री होत आहे. पूर्णपणे पारंपरिक वितरण व्यवस्थांवर अवलंबून न राहिल्याने वॉल्डन पब्लिकेशनच्या पुस्तकांचं निर्मितीमूल्य सांभाळणं, किमती निश्चित करणं इत्यादी अनेक गोष्टींमध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्याचा प्रामुख्याने उपयोग झाला आणि मनासारखं काम करण्याची मुभा मिळाली. अर्थात यामागे पाच वर्षं वितरक म्हणून केलेल्या मेहनतीचा मोठा भाग आहे हे वेगळं सांगायला नको.
वॉल्डन पब्लिकेशनकडून मुख्यत: भाषांतरित पुस्तकं मराठीत प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. पण उत्तम गुणवत्तेची मराठी पुस्तकंही आम्ही प्रकाशित करत आहोत. विविध भारतीय भाषांमधील साहित्याची भाषांतरंही वॉल्डनकडून प्रकाशित होणार आहेत. हे करतानाच वॉल्डन पब्लिकेशनकडून प्रकाशित होणारी मूळ मराठी पुस्तकं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषेत नेण्याचाही आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अगदी प्राथमिक स्तरावर असले तरी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
प्रकाशक, वॉल्डन पब्लिकेशन.