World Eye Donation Day 2024: कधी करावे नेत्रदान? जाणून घ्या महत्त्व
Freepik

World Eye Donation Day 2024: कधी करावे नेत्रदान? जाणून घ्या महत्त्व

International Eye Donation Day 2024: सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो.
Published on

- श्याम ठाणेदार

Significance of Eye Donation Day: आज १० जून, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करणारे सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो.

डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे याची प्रचिती देण्याची प्रेरणा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ भालचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून नेत्र विशारद पदवी मिळवून  ८० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. १० जून १९७९ ला त्यांचे निधन झाले.  या दिवसाचे औचित्य साधून लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्यास प्रवृत्त करणे हे या दिवसाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

आपल्या आयुष्यात डोळ्यांचे किती महत्व आहे हे आपण जाणतोच. जगातील सर्व सुंदर गोष्टी आणि सुंदर जगाचा आनंद आपण डोळ्यांमुळेच घेऊ शकतो. डोळ्यांशीवाय जगण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.  डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांद्वारे आपल्याला ७५ टक्के ज्ञान मिळते. सध्याचा काळात बदलणारी जीवनशैली, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि वाढलेला मानसिक तणाव यामुळे बहुतेक लोकांना डोळ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काहींना हा त्रास लहानवयातच होतो तर काहींना वयाच्या मध्यकाळात होतो. काही असेही दुर्दैवी असतात की ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधार असतो. त्यांना दृष्टीच नसते. जन्मतःच ते दृष्टिहीन असतात. तर काही जण अपघातात आपले डोळे गमावतात. जगभरात दृष्टिहीन लोकांची संख्या जास्त आहे. अशा अंधारलेल्या लोकांच्या आयुष्यात नेत्रदानाने प्रकाश आणता येतो. त्यासाठी नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन जग न पाहिलेल्या व्यक्तींना नेत्रदान करुन त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देणे ही काळाची गरज आहे.

भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार नेत्रदान हे मरणोत्तर करावे. हे नेत्रदान चष्मा असणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले तसेच मधुमेह आणि मानसिक त्रास असलेले व्यक्तीही करू शकतात. नेत्रदान करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी  जवळच्या नेत्रपेढीत जाऊन नेत्रदानाची नोंद करावी. मृत व्यक्तीने नेत्रदानाची नोंद केली नसली तरी त्या व्यक्तीच्या वारसदारांनी इच्छा व्यक्त केली तरी त्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. मृत्यूनंतर जास्तीतजास्त सहा तासाच्या आत नेत्रदान होऊ शकते. ज्या व्यक्तीला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे त्याला चोवीस तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपण करणे गरजेचे असते.

नेत्रदानाचा अर्थ शरीरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे एका  नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे जीवन तर  प्रकाशमान होतेच पण मृत व्यक्ती मृत्यूनंतरही हे सुंदर जग पाहू शकते.  आज जागतिक नेत्रदानाच्या दिवशी नेत्रदानाचा संकल्प करूया, मृत्यूनंतरही हे सुंदर जग पाहूया. 

logo
marathi.freepressjournal.in