
स्थूलता किंवा लठ्ठपणा ही दिवसेंदिवस अतिशय वेगाने वाढणारी गंभीर समस्या आहे. जगभरातील अनेक लोक या समस्यांमुळे त्रस्त आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात लठ्ठपणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोकांना ते टाळण्याचा सल्ला दिला. जगभरात त्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी ४ मार्च रोजी जागतिक स्थूलता दिन (World Obesity Day 2025) साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणून घेऊ लठ्ठपणामुळे निर्माण होणारे गंभीर आजार कारणे आणि उपाय...
लठ्ठपणा ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार लठ्ठपणा एक पॉलीऑर्गन डिसऑर्डर आहे. अर्थात एका समस्येमुळे अनेक आजार निर्माण होणे. वाढलेल्या वजनामुळे मधुमेहासह फॅटी लिव्हर, हृदयरोग, स्लीप एपनिया, ऑस्टियोआर्थरायटिस इत्यादी जीवघेणे आजार जडू शकतात. मानेमध्ये आणि आजूबाजूला जास्त चरबी जमा झाल्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया होऊ शकतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील कमी होऊ शकते. याशिवाय, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब देखील यामुळे होऊ शकतो. शिवाय, लठ्ठपणामुळे होणाऱ्या हार्मोनल व्यत्ययांमुळे देखील अनेक समस्या उद्भवतात, ज्यांचे मूल्यांकन एंडोक्राइनोलॉजिस्ट किंवा चयापचय आरोग्य तज्ञाने काळजीपूर्वक केले पाहिजे.
लठ्ठपणाची कारणे
लठ्ठपणाची कारणे अनेक असू शकतात. यामध्ये काही वेळा ते अुनवांशिक असते. तर अनेकवेळा चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा होतो. यामध्ये ताण, झोपेचा अभाव, खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, काही आरोग्य समस्या, दीर्घकाळ औषधे घेणे इत्यादी कारणे महत्त्वपूर्ण आहेत.
लठ्ठपणा कसा कमी करता येईल?
लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्यासाठी आतापर्यंत अनेक थेरपी निर्माण झाल्या आहेत. तर आहारतज्ज्ञ वेगवेगळे डाएट प्लॅन सूचवतात. तर अनेक सेलिब्रिटी देखील वेगवेगळे डाएट फोलो करण्याविषयी सांगतात. इथे जीवनशैलीत बदल करून लठ्ठपणा टाळण्याचे काही सोपे उपाय दिले आहेत.
लठ्ठपणा टाळण्यासाठी छोटे बदल करा. नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, कमी कॅलरीज असलेले निरोगी जेवणाचे पर्याय घ्या.
प्रक्रिया केलेले अन्न टाळा, घरी शिजवलेले निरोगी आणि ताजे अन्न खा.
अस्वास्थ्यकर स्नॅक्सऐवजी फळे, सुकामेवा, शेंगदाणे यांसारखे निरोगी पर्याय खा.
आहारासोबतच तुमच्या शारीरिक हालचालींकडेही लक्ष द्या. दररोज काही वेळ व्यायाम, चालणे किंवा योगा करा.
बाजारातून अस्वास्थ्यकर अन्न खरेदी करू नका. तुमच्या स्वयंपाकघरात फक्त निरोगी अन्नपदार्थांनाच स्थान द्या.
तुमचा स्क्रीन वेळ (टीव्ही पाहणे, मोबाईल, लॅपटॉप, टॅब, डेस्कटॉपवर काम करणे) कमी करा, बाहेर जा आणि थोडी ताजी हवा घ्या. तुमचा ताण व्यवस्थापित करा आणि दररोज ७-८ तास झोप घ्या.
एकाजागेवर सातत्याने बसून राहणे कमी करा. तशा पद्धतीचे काम असल्यास किमान काही वेळेचा ब्रेक घ्या.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)