World Tuberculosis Day 2025 : क्षयरोग नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे उपचार आणि गैरसमज

जागतिक स्तरावर क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेनंतर याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यातही यश आले आहे. दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day 2025) साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणून घ्या क्षय रोगाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी.
World Tuberculosis Day 2025 : क्षयरोग नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे उपचार आणि गैरसमज
Gerhard Jörén/ UNITAID Addressing TB in Myanmar (WHO)
Published on

अमुक एखाद्याला क्षयरोग झाला आहे, असे ऐकले तरी आपल्याला धडकी भरते. काही काळापूर्वीपर्यंत क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय होते. मात्र, जागतिक स्तरावर क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेनंतर याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यातही यश आले आहे. दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day 2025) साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणून घ्या क्षय रोगाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी.

क्षयरोग नेमका काय आहे?

क्षयरोग हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हवेद्वारे पसरतो. हा आजार सहसा फुफ्फुसांमध्ये होतो. मात्र, शरिराच्या इतर अवयवांमध्ये देखील हा रोग जडू शकतो. यामध्ये गर्भाशय, तोंड, यकृत, मूत्रपिंड, घसा, हाड इत्यादी... क्षयरोगाचे जीवाणू हवेतून पसरतात. खोकताना आणि शिंकताना तोंडातून आणि नाकातून बाहेर पडणाऱ्या लहान थेंबांद्वारे हा संसर्ग पसरतो. जर तुम्ही क्षयरोगाच्या रुग्णाच्या अगदी जवळ बसलात आणि त्याच्याशी बोललात आणि तो खोकला नसेल, तरीही संसर्गाचा धोका असू शकतो. (World Tuberculosis Day 2025)

शरिराच्या कोणत्याही भागात क्षयरोगाचे जीवाणू असले तरी ते त्याच्या ऊतींना पूर्णपणे नष्ट करतात आणि त्यामुळे त्या अवयवाच्या कार्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर फुफ्फुसात क्षयरोगाचे जीवाणू पसरले असेल तर तो हळूहळू फुफ्फुसांना निरुपयोगी बनवतो, जर गर्भाशयात असेल तर वंध्यत्व निर्माण होऊ शकते, जर हे जीवाणू हाडांमध्ये असेल तर ते हाडे विरघळवतात, जर हे जीवाणू मेंदूमध्ये असेल तर रुग्णाला झटके येऊ शकतात, जर यकृतात असेल तर पोटात पाणी साचू शकते, इत्यादी.

काय आहेत क्षयरोगाची लक्षणे?

सामान्यपणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येत असेल किंवा खोकल्यासोबत रक्त पडत असेल. तर ते क्षयरोगाचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे, सतत वजन कमी होणे, संध्याकाळी किंवा रात्री ताप येणे, थंडीतही घाम येणे, श्वास घेताना छातीत दुखणे इत्यादी क्षयरोगाची लक्षणे आहेत.

लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य निदानासाठी चाचण्या करणे आवश्यक आहे. या आजाराच्या निर्मुलनासाठी सरकार अनेक मोहिमा राबवत असते. त्यामुळे त्याद्वारे दिलेल्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

क्षयरोगावर पूर्णपणे उपचार शक्य (World Tuberculosis Day 2025)

क्षयरोगावर पूर्णपणे उपचार शक्य आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये त्याचे उपचार मोफत आहेत. क्षयरोग पूर्णपणे बरा होईपर्यंत उपचार चालू ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. ते अर्ध्यावर सोडल्याने, बॅक्टेरिया औषधांविरुद्ध प्रतिकार विकसित करतात आणि उपचार खूप कठीण होतात कारण सामान्य औषधे काम करत नाहीत. या स्थितीला MDR/XDR म्हणजेच मल्टी ड्रग्ज रेझिस्टंट/एक्सटेन्सिव्हली ड्रग्ज रेझिस्टंट म्हणतात.

क्षयरोग बरा होण्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. क्षयरोग निर्मूलनाच्या जागतिक प्रयत्नांमुळे २००० पासून आतापर्यंत ७९ दशलक्ष लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे. या कालावधीत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती खबरदारी आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in