
मुंबई : ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ यासाठी टीबीचा मृत्युदर रोखणे, टीबी झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध घेत त्यांच्यावर प्रतिबंधक उपचार करणे अशी १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे. दरम्यान, २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यात राज्यातील निवडक १७ जिल्हे, १२ महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका या क्षेत्रांचा समावेश आहे. या मोहिमेत क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करून नवीन क्षयरोग रुग्णांना शोधण्याची गती वाढविणे, क्षय रोगाचा मृत्युदर कमी करणे आणि नवीन क्षय रुग्ण टाळणे यावर भर दिला आहे.
या मोहिमेचा एक भाग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रौढ बी.सी.जी. लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. तसेच कोमॉर्बीड रुग्ण, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, ६० वर्षांवरील सर्व व्यक्ती यांना त्यांच्या संमतीने प्रौढ बी.सी.जी. लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच पल्मोनरी क्षय रुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (सीवाय–टीबी) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद वाशीमचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, लोकसभा सदस्य संजय देशमुख, लोकसभा सदस्य अनुप धोत्रे, विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांना आमंत्रित केले आहे. सेन्ट्रल टीबी डिव्हिजनचे सहआयुक्त डॉ. संजयकुमार मट्टू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
१७ जिल्हे
अहिल्या नगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम व यवतमाळ येथे मोहीम राबविणार.
१२ महानगरपालिका
अहिल्या नगर मनपा, अमरावती मनपा, धुळे मनपा, जळगाव मनपा, कोल्हापूर मनपा, मालेगाव मनपा, नागपूर मनपा, नांदेड-वाघाळा मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, सोलापूर मनपा, ठाणे मनपा व उल्हासनगर मनपा येथे मोहीम राबविणार.
अतिजोखमीच्या लोकसंख्येचे मॅपिंग
क्षय रुग्ण संख्या असलेल्या कार्य क्षेत्राचे मॅपिंग, त्या कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येचे मॅपिंग, अति जोखमीच्या लोकांची नॅट व एक्स-रे च्या मदतीने क्षय रोगासाठी तपासणी, क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना त्वरित योग्य उपचार देणे, अशा व्यक्तींची डिफरन्शिएटेड टीबी केअर ॲप्रोचनुसार काळजी घेणे, या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच निक्षय मित्र बनवून पोषणासाठी सहाय्य देणे, क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींचा पाठपुरावा करून संनियंत्रण करणे, मृत्यू झालेल्या रुग्णांचे डेथ ऑडिट करणे अशा पद्धतीने टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.