राज्यात १०० नवीन कौशल्य विकास केंद्रे स्थापन होणार - मंगलप्रभात लोढा

केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांचे असेल.
राज्यात १०० नवीन कौशल्य विकास केंद्रे स्थापन होणार - मंगलप्रभात लोढा
Published on

प्रतिनिधी/मुंबई : महाराष्ट्रातील १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेने महायुती सरकारने नवीन वर्षात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कौशल्य विकास ग्रामीण भागात केंद्रित असावा, हे मंगलप्रभात लोढा यांचे उद्दिष्ट होते. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात प्रथमच ५११ कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी उद्घाटन करण्यात आले. या कौशल्य विकास केंद्रांमार्फत गावातील नागरिकांना रोजगार कमावण्याची, नवे कौशल्य शिकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रोजगारासाठी गावातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल. त्याचप्रमाणे आता येत्या नवीन वर्षात सुद्धा सुरू होणाऱ्या १०० कौशल्य विकास केंद्रांमुळे महाराष्ट्राची कौशल्य संपन्न पिढी तयार करणे अधिक जलद गतीने होणार आहे. या केंद्रांद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य महाविद्यालयांचे असेल.

logo
marathi.freepressjournal.in