
रविकिरण देशमुख/मुंबई
राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. याच ‘कुंभा’च्या भरभक्कम निधीमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रिपद आपल्यालाच हवे, असा भाजपचा हट्ट आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली होती. मात्र, महायुतीत वाद झाल्यानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
पालकमंत्रिपदाचा वाद सुरू झाला, तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. त्यामुळे भाजपला त्यात रस आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की, कुंभमेळ्याच्या आयोजनाचे काम प्रशासन पाहत असताना तेथे मंत्र्याचे काम काय?
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी कोकाटे हे इच्छुक होते. तर शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भूसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. कोकाटे व भुसे हे दोघेही नाशिक जिल्ह्यातील आहेत.
या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, जिल्हा पालकमंत्रिपदाचा वाद कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आहे. कारण त्याचे बजेट मोठे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी "एक्स" या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, "नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदाचा झालेला वाद कुंभमेळ्यामुळे आहे. हा मेळा २०२७ मध्ये होणार आहे. यासाठी १० हजार कोटींपेक्षा जास्त बजेट आहे.
दरम्यान, पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार वगळता कोणालाही त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही. पवार यांना पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिले गेले. तर त्यांच्या पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघांपासून दूरचे जिल्हे दिले आहेत. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या सात मंत्र्यांना त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले.
शिवसेना रायगड जिल्ह्यात आक्रमक आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या या दबावाविरोधात तीव्र आक्षेप घेतला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले हे अडून बसले आहेत.
कुंभमेळा आयोजनात पालकमंत्र्यांना विशेष अधिकार
या मेळ्याच्या आयोजन प्रक्रियेत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना असलेला अधिकार अनेक इच्छुकांच्या आकर्षणाचे कारण होऊ शकतो. हा वाद टाळण्यासाठी ही जबाबदारी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणालाही दिली जाऊ शकते.