गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील १०७ विद्यर्थिनींना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील २० विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोडे येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ३६९ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेत बुधवारी ३५८ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. नेहमी प्रमाणे दुपारी विद्यर्थिनींना मध्यान्ह भोजन देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थीनींना त्रास होऊ लागला. त्यांना काही वेळातच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पुन्हा संध्याकाळी आणखी काही विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली त्यांनाही संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरती करण्यात आले. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.