कोल्हापूर : २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यानिमित्त कोल्हापुरात सकल हिंदू समाजातर्फे प्रभू श्रीरामांचं १०८ फुटी कटआऊट दसरा चौकात उभारण्यात आलंय. या कटआऊटचं उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं. प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्यदिव्य पोस्टर पाहण्यासाठी आणि सेल्फी खेचण्यासाठी सकाळपासूनच शहरवासियांनी प्रचंड गर्दी केली होती.
२२ जानेवारीला संपूर्ण देशवासिय अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातर्फे २१ आणि २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी कोल्हापुरात १०८ फुट उंचीचं प्रभू श्रीरामांचं कटआऊट ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानावर उभारण्यात आले आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, सत्यजीत कदम, प्रा. जयंत पाटील, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गजानन तोडकर, उदय भोसले, आशिष लोखंडे यांच्यासह २१ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शनिवारी सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य कटआऊटचं उद्घाटन करण्यात आले.
देशभरात न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडणार आहे. कोल्हापुरात देखील या सोहळ्याची जय्यत तयारी झाल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोल्हापुरात या सोहळ्याचं उत्तम नियोजन करण्यात आलंय. भव्य शोभा यात्रा, भव्य स्क्रीनद्वारे सोहळ्याचं दर्शन, दसरा चौकातील मैदानावर गीतरामायण हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. उद्घाटनानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.