१०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार; बोट ॲम्ब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश

सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. यामध्ये आणखी वाढ होऊन यापुढे १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे
१०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार; बोट ॲम्ब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश

कराड : राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲम्ब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲम्ब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. यामध्ये आणखी वाढ होऊन यापुढे १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे, अशी माहिती सदर ॲम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या ठेकेदार बीव्हीजी कंपनीने पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांत राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरली आहे. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट ॲम्ब्युलन्स विविध अपघाती समुद्रकिनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे. विशेषबाब म्हणजे जलदगतीने ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचणार आहे. दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नवीन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागणार आहे. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. १०८ रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागत होते. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रतीमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या

  • ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३

  • बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४

  • बाइक ॲम्ब्युलन्स : ३३

    नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या

  • ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २२

  • बेसिक लाईफ सपोर्ट : ५७०

  • बाइक ॲम्ब्युलन्स : १६३

  • नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५

  • बोट ॲम्ब्युलन्स : ३६

logo
marathi.freepressjournal.in