महाराष्ट्रातील ११ कृषी हवामान केंद्रे बंद होणार; निधी उपलब्धतेची अडचण सांगत पाच वर्षांतच निर्णय

हवामान केंद्र बंद झाल्यास जिल्ह्यातील निश्चित हवामान आधारित माहिती बंद होऊन त्यावरील कृषीविषयक सल्लाही बंद होईल.
महाराष्ट्रातील ११ कृषी हवामान केंद्रे बंद होणार; निधी उपलब्धतेची अडचण सांगत पाच वर्षांतच निर्णय

संतोष पाटील/वाडा : जिल्हा कृषी हवामान केंद्र ही कृषी विज्ञान केंद्राच्या ठिकाणी असून केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नियमितपणे हवामान अंदाज आणि हवामान आधारित कृषी सल्ला विविध प्रसारमाध्यमाद्वारे दिला जात असतो. तीव्र हवामान बदलाच्या घटनांमुळे शेती व्यवसायात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्यासाठी व शेती उत्पादनामध्ये स्थैर्यता टिकून राहण्यासाठी विविध हवामान घटकाची माहिती शेतकऱ्यांना हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून वेळेवर प्राप्त होत असते. जिल्हास्तरीय कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (आत्मा), अशासकीय संस्था आदी विभाग सुद्धा जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या सेवांवर अवलंबून असतात. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात आल्याने केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

देशात २०१८-१९ या वर्षात जिल्हा कृषी हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने देशात एकूण १९९ तर महाराष्ट्रात ११ केंद्रे उघडण्यात आली होती. या आधारे शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचे आणि इतर घटकांचे योग्यप्रकारे आणि सुक्ष्मपणे नियोजन केले जात होते.

देशातील १९९ कृषी विज्ञान केंद्रांमध्ये चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक युनिटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची (एक कृषी हवामान तज्ज्ञ आणि एक कृषी हवामान निरीक्षक) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यासाठी निधीची पूर्तता वेळेत न होत असल्यामुळे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे संचालक तथा शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी विविध संदर्भ देत जिल्हा कृषी हवामान केंद्र योजना २०२३-२४ च्या पुढे चालवले जाणार नाहीत असे पत्र विविध ११ विभागाच्या प्रमुखांना १७ जानेवारी २०२४ रोजी पाठवले आहे. त्याचबरोबर त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही व मनुष्यबळाच्या पगाराची सर्व देय रक्कम व इतर खर्चाची तरतूद पूर्ण करण्यात येईल असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ही केंद्रे बंद होणे निश्चित असल्याचे दिसत आहे.

हवामान केंद्र बंद झाल्यास जिल्ह्यातील निश्चित हवामान आधारित माहिती बंद होऊन त्यावरील कृषीविषयक सल्लाही बंद होईल. बदलत्या हवामानानुसार हवामानाची माहिती केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना न मिळाल्यास शेतकऱ्यांची हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अकरा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. हवामानातील असुरक्षिततेचा सामना करत सूक्ष्म पातळीवर पीक व्यवस्थापन, पशुधन आणि संलग्न शेती उद्योग टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आशा बाबींसाठी हवामान केंद्र आवश्यक आहेत.

शेतकरीवर्ग चिंतेत

भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय हवामान विभाग यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या समझोता करारानुसार जिल्हा कृषी हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रसह देशभरातील केंद्र बंद होणार असल्याने कर्मचारीवर्गही बेरोजगार होणार आहेत, ही केंद्रे सुरू ठेवावी, अशी मागणी प्रत्येक केंद्रांमार्फत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि कृषी सल्ला देणारी ही केंद्रे बंद झाल्यास शेतकरी वर्ग चिंतेत पडणार आहे. ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्राची सेवा बंद करण्याच्या हा निर्णय शेतकरी व इतर नगरिकांसाठी चिंताजनक आहे. ही केंद्र बंद झाली तर शेतकऱ्यांना कृषीशी निगडित हवामान व तत्सम नियोजन करणे कठीण होणार आहे.

जिल्हा कृषी हवामान केंद्रामुळे हवामान अंदाज आणि हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त होतो. यामुळे शेती व्यवस्थापन करणे, जमीन मशागत करणे, पीक बियाणे निवड, सिंचन व्यवस्थापन, खंत, औषधे फवारणी, पिकांची काढणी, वाहतूक करणे यासाठी योग्य निर्णय घेणे शक्य होते. तसेच कृषी सल्ल्याने विजेचे कडकडाट, गारपीट, अवकाळी पाऊस, पूरस्थिती, वादळ, वारा आदींचा सावध इशारा आल्यानंतर शेती पीक वाचवण्यास मदत होते. त्यामुळे ही केंद्र टिकणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील बंद होणारी केंद्रे

नागपूर, पालघर, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, वाशिम.

-यज्ञेश वसंत सावे, कृषीभूषण, तलासरी

हवामान केंद्राच्या अचूक मार्गदर्शनामुळे आमच्या शेतीतील पिकांची, फळांचे पूर्व नियोजन करून नुकसान टाळण्यासाठी मदत होत आहे. शेतकऱ्यांना होत असलेला उपयोग लक्षात घेता, जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील हवामान विभाग बंद करू नये.

- चंद्रकांत रामचंद्र पाटील,शेतकरी, डहाणू

logo
marathi.freepressjournal.in